लाईफस्टाईल

आई, आज तू हवी होतीस …

Trupti Paradkar  |  May 9, 2019
आई, आज तू हवी होतीस …

Mother’s day हा जगातील प्रत्येक आईसाठी आणि तिच्या प्रत्येक बाळासाठी खास दिवस. जिच्यातून आपली निर्मिती झाली त्या मातृत्वाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मदर्स डे कोट्स किंवा शुभेच्छा देऊन आपण साजरा करतो. पण आज मदर्स डे साजरा करण्यासाठी प्रत्येकाजवळ त्यांची आई असेलच असं नाही. माझ्या आयुष्यात देखील असा दिवस असेल असं वाटलं नव्हतं. म्हणूनच या भावना अशा पद्धतीने व्यक्त कराव्याशा वाटल्या. आई गेल्यावर आईशी मनातून साधलेला संवाद

आई तुझं लेकरू, येडं गं कोकरू, रानात अडकलंय, रस्ता भटकलंय… आई, तू आता अनंतात विलीन झाली आहेस त्यामुळे माझे हे शब्द तू आता नक्कीच ऐकत असशील? हे गाणं मला लहानपणी तुझ्याकडूनच ऐकायला मिळालं होतं पण त्याचा खरा अर्थ आज समजतोय.

तू हे जग सोडून तुझ्या पुढच्या प्रवासाला गेलीस तो क्षण माझ्यासाठी कसा होता हे आठवताना खूप त्रास होतो. त्या क्षणी मी काय अनुभवलं, मला काय वाटलं कसं सांगणार शब्दात. पण तो क्षण धैर्याने सामोरा जाण्याचं बळ मात्र तूच मला दिलं होतंस. माझ्यामध्ये असलेला आत्मविश्वास, स्पष्टवक्तेपणा, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याची वृत्ती तूच लहानपणापासून दिलेल्या शिकवणीतून आली आहे. तू मला नेहमी पुढेच जायला शिकवलंस.

खरंतर तू गेलीस त्या क्षणी मला काहीच समजत नव्हतं. तू आता काही क्षणानंतर या जगात नसणार या भितीने पोटात गलबलून आलं होतं. आदल्या दिवशी ताप आलाय म्हणून तुला अॅडमीट केलं होतं. रात्रभर मी तुझ्याजवळ होते. तुला हॉस्पिटलमध्ये सोडून सकाळी निघताना माझे पाय अचानक जड झाले होते. पण काहीच मिनीटांमध्ये तू मला पुन्हा बोलावून घेतलंस. तुला त्रास होतोय हे ऐकल्यावर अचानक वीज संचारावी तशी मी तडक हॉस्पिटलकडे धाव घेतली. जेव्हा तो क्षण आला तेव्हा तूच माझ्या मनाची तयारीही केलीस. आय.सी.यू.च्या बाहेर क्षणभर गेले पटकन डोळे कोरडे केले आणि मी तुझा पुढचा प्रवास सुखकर करण्यासाठी सज्ज झाले. तू जाताना तुला क्षणभरासाठी एकटं सोडलं नाही. काही गोष्टी माझ्याकडून अजाणतेपणी योग्यच घडल्या. तुझी माझी नाळ निसर्गत:च जोडलेली असल्यामुळे असे घडलं असेल कदाचित. सारं काही मिनीटांच्या अवधीत घडलं होतं. आता फक्त निसर्गाने तुला माझ्या कुशीत सदगती दिली यात समाधान आहे. त्रास फक्त एवढाच होतोय की ज्या कुशीत मी जन्माला आले, ज्या कुशीतून मी हे जग पाहू शकले त्या कुशीने माझ्या कुशीत शेवटचा श्वास घ्यावा हे भाग्य की दुर्भाग्य हे मात्र कळंत नाही.

एखाद्याच्या जीवनात आईविना एखादा दिवस येण्यासारखं दुसरं दुःख नाही. तू गेलीस त्यानंतर माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. असं म्हणतात की, बाळाला जन्म दिल्यावरच खरं आईपण कळतं पण मला तर तू तूझ्या जाण्यातूनच आईपण शिकवून गेलीस. मला जन्म देताना तूला जितक्या वेदना झाल्या तितक्याच वेदना मला तूला निरोप देताना झाल्या. फरक फक्त इतकाच तुझ्या आनंदकळा होत्या आणि माझ्या विरहकळा. तुझ्या अस्थींना निसर्गाच्या ताब्यात देताना पाण्यावर तरंगणाऱ्या अस्थीकडे पाहून मनात प्रश्नांचा भडीमार झाला होता.  तुझ्या अस्थीचा तो भाग नेमका कोणता असेल ? कधीकाळी मी या भागाला स्पर्शून जन्माला आली असेन का ? मला जन्म देणारा हा शेवटचा अवयववजा भाग आता निसर्गाच्या स्वाधीन करायचा हा विचारच माझ्यासाठी त्रासदायक होता.

तू जाताना मला घट्ट मिठी मारुन माझ्या गालावर जेव्हा प्रेमाने पापा घेतलास तो क्षण मी कधीच विसरु शकणार नाही. कारण तो माझ्या आयुष्यातील एक वेगळाच क्षण होता. आता या क्षणी देखील मी तुझी जाणिवपूर्वक आठवण काढत नसून तू माझ्या सदैव स्मरणात अाहेस याचीच जाणिव मला होतेय.

मदर्स डे साठी खास कविता

तूझं बाबांवर एवढं प्रेम होतं की तुझ्यानंतर फक्त आठ महिन्यातच त्यांनीदेखील या जगाचा  निरोप घेतला. तू आयुष्यभर त्यांच्यावर असं प्रेम केलं होतंस की तुझ्याशिवाय जगणं त्यांना शक्यच झालं नाही. नवरा-बायकोच्या नात्याचं एक अजब रसायन होतात तुम्ही दोघं. तुम्ही दोघांनी आम्हा भावंडावर जे संस्कार केले, प्रामाणिक आणि समानतेची शिकवण दिली त्यामुळे आज माणूस म्हणून अभिनानाने जगता येत आहे. तुझ्यासाठी मला जे जे करायचं होतं ते मी खरंच नाही करू शकले. पण माझ्यापरीने मी जे थोडंफार करण्याचा प्रयत्न केला त्याचं तुला खूप कौतूक होतं. कुणी आपल्यासाठी कणभर जरी केलं तरी त्याचं आभाळभर कौतूक करणं आता मला तुझ्याकडून शिकायला मिळतंय. आयुष्यभर तू सर्वांवर मोठ्या मनाने सतत प्रेमाची पखरण केलीस. तू जोडलेली नाती आज आमच्या पाठीवरून तोच मायेचा हात फिरवत आहेत.

तू माझ्या आवडी-निवडींची खास काळजी घ्यायचीस. मला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या नेहमी माझ्यापासून दूर ठेवायचीस. मला मटकीची भाजी आवडते म्हणून तू ती आवर्जून करायचीस. लग्नानंतर तुला न कळवता जरी माहेरी आले तरी तू माझ्यासाठी मटकीची भाजी केलेली असायचीस. तुला न सांगता पण सारं काही कसं कळायचं हे मला आताही समजत नाही. तू गेल्यावर कितीतरी दिवस मी मटकीची भाजी खाणं सोडून दिलं होतं. एकदा सहज एका मैत्रिणीच्या घरी गेले जेवणाची वेळ झाली म्हणून तिच्या आईने मला जेवायला बसण्याचा आग्रह केला. नाईलाजाने मी जेवायला बसले. पानात तिच्या आईने मटकीची भाजी वाढली आणि कोणासोबतही मन मोकळं न करणारी मी ढसाढसा रडू लागले. त्या क्षणी लहानपणापासून ते अगदी तू गेलीस तो क्षण असं सारं आयुष्यच भरभर डोळ्यासमोरून झरझरू लागलं होतं. आई मृत्यूनंतरही सूक्ष्म रूपात येऊन पिलांची पखरण करते हा विश्वास त्यावेळी दृढ झाला. माझी आई माझ्या पाठीशी सदैव आहे या एका विश्वासाने मी आयुष्यात आनंदात जगत आहे. पण तरीही तू मला हवी होतीस कारण रानात भरकटल्यावर, वाट चुकल्यावर, हबंरडा फोडल्यावर वासराला फक्त त्याची मायच हवी असते. कारण दुसरं कोणीच ती जागा कधीच घेऊ शकत नाही.

आई,  आय लव्ह यू….मिस यू…

देखील वाचा – 

आई तुला Thanks म्हणायचं राहूनच जातं…

म्हणून यंदा नक्की साजरा करा ‘मातृदिन’, द्या हे अमूल्य गिफ्ट

आईसाठी स्टेटस (Marathi Status For Mother)

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम 

Read More From लाईफस्टाईल