बाळाचा वाढ आणि विकास जस जसा होत जातो तस तशा त्याच्या शारीरिक हालचाली वाढू लागतात. बाळाची प्रत्येक पहिली कृती पाहण्यासाठी त्याचे आईबाबा उत्सुक असतात. एवढंच नाही तर सर्वात पहिला शब्द बाळाने आई किंवा बाबा असा उच्चारावा असा त्यांचा अट्टाहास असतो. पण काही मुलं खूप उशीरा बोलू लागतात. ज्यामुळे मग पालकांना बाळाच्या बोलण्याविषयी चिंता सतावू लागते. बाळाचं अबोल असणं त्यांच्या मनात अनेक शंका निर्माण करू शकतं. पण असं असेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण प्रत्येक बाळाचा विकास निरनिराळ्या पद्धतीने होत असतो. यासाठीच तुमच्या बाळाला उच्चार शिकवण्यासाठी फॉलो करा या टिप्स
बाळ उशीरा का बोलायला शिकतं
बाळाच्या उशीरा बोलणे शिकण्याबाबत असं सांगितलं जातं की जी मुलं जन्मानंतर लगेच रडत नाहीत ती मुलं उशीरा बोलायला शिकतात. बाळ जन्माला आल्यानंतर सर्वात पहिली कृती करतं ते म्हणजे रडणे. पण काही मुलं रडत नाहीत तेव्हा त्यांना वैदकीय उपचार करून रडवलं जातं. अशी मुलं भविष्यात थोडी उशीरा बोलायला शिकण्याची शक्यता असते. शिवाय जर बाळ पोटात असताना आईला जर एखादी आरोग्य समस्या झाली तर बाळाच्या विकासावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. याचप्रमाणे नैसर्गिक पद्धतीने प्रसूती होताना जर बाळाला दुखापत झाली तर त्यांच्या ऐकण्याच्या आणि बोलण्याच्या क्षमतेवर थोडा परिणाम होऊ शकतो. कारण जी मुलं नीट ऐकू शकत नाहीत त्यांना बोलताना अडचणी येतात. तज्ञांच्या माहितीनुसार बाळ जन्मानंतर सहा महिन्यांनी निरनिराळे ध्वनी समजू लागते. एकदा त्यांना या ध्वनीचे म्हणजेच बाहेरून येणाऱ्या आवाजाबद्दल ज्ञान झाले की त्यांची बोलण्याची क्षमता विकसित होत जाते.
बाळाने लवकर बोलावं यासाठी करा हे उपाय
बाळाने लवकर बोलण्यासाठी त्याची श्रवणशक्ती आधी विकसित व्हावी लागते. जर तुम्ही तुमच्या बाळाशी काहीच संवाद केला नाही अथवा घरात अती शांतता असेल तरी तुमचे बाळ उशीरा बोलण्यास शिकु शकते. बाळाने लवकर बोलणे शिकावे असं वाटत असेल तर त्याच्यासोबत मोकळेपणाने संवाद साधा. यासाठी काही सोप्या टिप्स
- तुमचे बाळ जे आवाज अथवा उच्चार करेल ते तुम्ही पुन्हा तुमच्या तोंडातून काढा. ज्यामुळे बाळाला ते पुन्हा पुन्हा करण्याची प्रेरणा मिळेल.
- एकमेकांची नक्कल करणं किंवा एकमेकांसारखं वागणं यातून बाळाची श्रवण शक्ती विकसित होईल.
- जेव्हा बाळ त्याने उच्चारलेले आणि तुम्ही पुन्हा बोललेले शब्द उच्चारू लागेल तेव्हा तुम्ही त्याला एखादा नवा शब्द ऐकवा. ज्यामुळे त्याला नवा शब्दांचे ज्ञान मिळेल.
बाळ तुटक तुटक बोलू लागले की त्याला अखंड वाक्य बोलून दाखवा आणि ते पुन्हा बोलण्यास शिकवा. जरी बाळ पूर्ण वाक्य बोलू शकले नाही तरी तुम्ही त्याच्यासोबत हा प्रयोग करत राहा.
बाळाला सतत एखादे चांगले संगीत अथवा गाणे ऐकवा. ज्यामुळे त्याच्या श्रवणकेंद्रांचा विकास होईल.- गाणं गुणगुणणे हा उच्चार शिकण्याचा एक चांगला मार्ग ठरेल.
- दिवसभरातू ठराविक वेळेत बाळाशी संवाद साधा, त्याला मंत्र, श्लोक, प्रार्थना म्हणून दाखवा. भारतीय संस्कृतीमधील सर्व मंत्र, श्लोक, प्रार्थना उच्चार स्प्ट करण्यासाठी उत्तम आहेत. शिवाय यामुळे तुमच्या बाळावर चांगले संस्कारदेखील होतील.
फोटोसौजन्य –
अधिक वाचा –
कसा असावा बाळाचा आहार, तज्ज्ञांचा सल्ला
लहान बाळाला कधीच भरवू नका हे खाद्यपदार्थ
कुटुंबासोबत घरीच बसून खेळता येणारे सोपे खेळ (Indoor Games To Play With Your Family)