Periods

काम मिळवण्यासाठी त्यांना करावा लागतोय गर्भाशयाचा त्याग

Aaditi Datar  |  Apr 11, 2019
काम मिळवण्यासाठी त्यांना करावा लागतोय गर्भाशयाचा त्याग

प्रत्येक महिलेच्या आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंगांना सामोर जावं लागतं. काही प्रसंगाबाबत तर आपण विचारही करू शकत नाही. आम्ही तुम्हाला ज्या ऊसतोडणी कामगार महिलांबद्दल सांगणार आहोत, त्यांचं आयुष्य विचार करण्यापलिकडे आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग मानला जातो, पण अजून एका कारणामुळे आता या जिल्ह्याची ओळख सांगितली जाईल. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, महाराष्ट्रातील या गावातील महिलांना काम मिळवण्यासाठी हिस्टरेटॉमी म्हणजेच गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करून घ्यावी लागत आहे.

हे गाव आहे, बीड जिल्ह्यातील हाजीपूर, जे ऊसतोडणी कामगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी ओळखलं जातं. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ऊसतोडणी कामगार येथे ऊसतोडणीच्या काळात स्थलांतर करतात. रिपोर्टनुसार, दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे येथे स्थलांतर करून कामासाठी येणाऱ्या कामगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. पण महिलांना इकडे काम मिळवायचं असल्यास कंत्राटदार फक्त गर्भाविना (wombless) असणाऱ्या महिलांनाच काम देतात. कारण त्यांना ऊसतोडणीच्या काळात मासिक पाळीमुळे येणारा खंड नको असतो. धक्कादायक बाब म्हणजे या गावात जणू हिस्टरेटॉमी करण्याची प्रथा झालीच आहे, ज्यामध्ये महिला 2-3 मुलांना जन्म दिल्यावर ही शस्त्रक्रिया करूनच घेतात. रिपोर्टनुसार, कंत्राटदार महिलांना या शस्त्रक्रियेसाठी आगाऊ पैसे देतात आणि नंतर त्यांच्या कामाच्या पगारातून ते कापून घेतात.


या जिल्ह्यातील एकही महिला अशी नाही जिच्यावर अशी शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. बहुतेक महिलांना गर्भाशय काढायचं ऑपरेशन करावंच लागतं. पोटासाठी लागणारा रोजगार हे यामागील महत्त्वाचं कारण आहे. जरं हे ऊसतोडणीचं काम मिळालं नाहीतर त्यांना आणि कुटुंबाला वर्षभर उपाशी राहावं लागेल ही भीती त्यांच्या मनात आहे. त्यामुळेच त्यांना हे कठीण पाऊल उचलावं लागत आहे.

महिलांच्या मासिक पाळीला (पीरियड)  कामातील अडचण मानलं जातं. ज्यामुळे तोडणीच्या कामात दोन-तीन दिवसांची सुट्टी होऊन खंड पडतो आणि काम थांबतं. या कारणामुळे अनेक महिलांना दंड भरावा लागतो. हे टाळण्यासाठी महिलांना परिस्थितीनुसार ही दुर्देवी शस्त्रक्रिया करावी लागत आहे.

सत्यभामा नावाच्या येथील  ऊसतोडणी करणाऱ्या कामगार महिलेने सांगितलं की, ठेकेदार अशा महिला कामगारांना पसंती देतात, ज्यांना गर्भाशय नसेल. रिपोर्टनुसार, कंत्राटदार कामगार नवरा-बायकोशी याबाबत करारही केला जातो, ज्यामध्ये दोघांना मिळून एकच युनिट मानलं जातं. ऊसतोडणीच्या काळात जर या नवरा-बायकोपैकी कोणी एका दिवसाचीही सुट्टी घेतली तर ठेकेदार त्यांच्याकडून 500 रूपये दंड घेतो.

सत्यभामा पुढे सांगते की, “गर्भाशय काढल्यावर पीरियड्स येणं बंद होतं. ज्यामुळे ऊसतोडणीदरम्यान सुट्टी घेण्याचा प्रश्न येत नाही. आमची परिस्थिती एवढी वाईट आहे की, आम्ही एक रूपयाचं नुकसानही सहन करू शकत नाही.” तर दादा पाटील नावाच्या ठेकेदार सांगतात की, आम्हाला आमचं काम एका निश्चित वेळेत पूर्ण करायचं असतं. त्यामुळे आम्ही अशा महिला कामगारांना ठेऊ शकत नाही, ज्यांना मासिक पाळी येते.  

फक्त एवढ्यावरच या महिलांचे हाल थांबत नाहीत. ऊसतोडणीचं काम करणं हे नरकयातनेपेक्षा कमी नाही. त्यात भर म्हणजे कंत्राटदारांकडून महिला कामगाराचं करण्यात येणार शारिरीक शोषण आणि मूलभूत गरजा जसं शौचालय नसणं यांचा अभाव हेदेखील महिलांना सहन करावा लागतो. कारण ऊसतोडणीच्या वेळी या महिला कामगारांना शेताजवळील एखाद्या तंबूत राहावं लागतं.

‘तथापि’ नावाच्या एका संस्थेच्या पाहणीनुसार, अगदी 25 वर्ष वयाच्या महिलांनीसुद्धा ही शस्त्रक्रिया करून घेतल्याचं उघड झालं आहे. गर्भाशय काढून टाकल्यामुळे या महिलांना हार्मोनल असंतुलन, मानसिक आरोग्यासंबंधीच्या समस्या आणि वजन वाढण्यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. ही आरोग्यासंबंधीची गंभीर कारणं माहीत असतानाही खाजगी डॉक्टर सर्रास या शस्त्रक्रिया पार पाडत आहेत, हे अजून धक्कादायक आहे.

एकीकडे देश प्रगतीपथावर असताना आजही देशातील एका भागातील महिलांवर अशी परिस्थिती ओढवणं हे दुर्देवी आहे.

Read More From Periods