बालुशाही ही खरंतर उत्तर भारतातील पारंपारिक मिठाई प्रकार आहे. पण आता संपूर्ण भारतात ही मिठाई आवडीने खाल्ली जाते. काही ठिकाणी याला खुरमी असेही म्हणतात. ही चवीला खूपच चविष्ट असते. तर काही जणांना बालुशाही खुसखुशीतपणामुळे जास्त आवडते. आज पाहूया बालूशाही रेसिपी मराठी मध्ये खास POPxoमराठीच्या वाचकांसाठी.
साहित्य (Ingredients for Balushahi Recipe In Marathi)
मैदा – दोन कप
तूप – मोहनसाठी आणि बालुशाही तळण्यासाठी
थंड पाणी – अर्धा कप
बेकिंग सोडा – अर्धा चमचा
मीठ – चिमूटभर
पाक बनवण्यासाठी
साखर – दोन कप
पाणी – एक कप
वेलची पावडर – छोटा अर्धा चमचा
केशर – 10-12 काड्या पाण्यात भिजवलेल्या
बालुशाही बनवण्याची कृती – Balushahi Recipe In Marathi
Step 1: बालुशाही मिठाई बनवण्यासाठी सर्वात आधी मैदा चाळून घ्या. नंतर मैद्यात तूप, बेकिंग सोडा आणि मीठ घालून मिक्स करा आणि पाणी घालून एकत्र मिक्स करायचं आहे मळायचं नाही.
Step 2: जेव्हा सर्व पीठ ओलं होईल तेव्हा ते एकत्र करून ओल्या कपड्याने 10-15 मिनिटं तसंच ठेवा. नंतर ती कणीक सपाट पसरवून घ्या. नंतर त्याचे दोन भाग करून एकावर एक ठेवा. मग पुन्हा सपाट करा आणि परत दोन भागात करून एकावर एक ठेवा.
Step 3: वरील कृती साधारण 6-7 वेळा करा. यामुळे कणकेच्या लेयर बनतील आणि जेव्हा तुम्ही बालुशाही तळाल. तेव्हा बेकिंग पावडरच्या मदतीने ते लेयर फुलण्यास मदत होऊन छान डिझाईन तयार होईल.
Step 4: आता कणकेला मऊ हाताने मळा आणि 10 मिनिटांसाठी ठेऊ द्या.
Step 5: पाक बनवण्यासाठी एका पॅनमध्ये दोन कप साखर आणि एक कप पाणी घालून बनण्यासाठी ठेवा. मधेमधे तो पाक हलवत रहा. जेव्हा साखर विरघळेल तेव्हा वेलची पावडर आणि केशर घालून गॅस स्लो करून पाक आटेपर्यंत शिजवा.
Step 6: पाक घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. दहा मिनिटानंतर कणकेचे एका आकाराचे गोळे बनवून घ्या. त्याला मेदूवड्यासारखा आकार द्या. मेदूवड्यासारखा मधोमध गोल करणं आवश्यक आहे. कारण यामुळे आतपर्यंत बालुशाही शिजेल.
Step 7: कढईत तूप घालून मध्यम आचेवर गरम करा. तूप गरम झाल्यावर गॅस स्लो करा आणि यात बालुशाही घालून ती वर येईपर्यंत तळा. जेव्हा बालुशाही वर येईल तेव्हा पलटून घ्या. दोन्ही बाजूंनी छान सोनेरी तळून घ्या. तूपातून काढून बालुशाही साखरेच्या पाकात टाका. अशाप्रकारे सर्व बालुशाही पाकात बुडवून ठेवा. बालुशाही किमान 15 ते 20 मिनिटं पाकात मुरवून ठेवली पाहिजे.
Step 8: आता बालुशाही पाकातून काढून एका मोठ्या ताटात वेगवेगळ्या ठेवा. ज्यामुळे त्यावरील पाक सुकेल.
Step 9: आता तयार आहे तुमची चविष्ट आणि खुसखुशीत बालुशाही. तुम्ही हवं असल्यास बालुशाही फ्रिजमध्ये ठेवून आरामात 15 दिवसांपर्यंत खाऊ शकता.
बालुशाही बनवण्यासाठी काही सूचना
- बालुशाही बनवताना तूप आणि पाणी समान घ्या आणि पीठ मळताना थंड पाण्याचा वापर करा.
- बालुशाही तळताना मंद आचेवर तळा. म्हणजे ती आतपर्यंत शिजेल आणि कच्ची राहणार नाही.
- बालुशाही बनवण्यासाठी कणकेचं लेयरिंग करणं आवश्यक आहे. ज्यामुळे बालुशाही आतपर्यतं तळली जाऊन त्याला भेगाही पडतील.
मग येत्या दसऱ्याच्या शुभेच्छा dasara wishes in marathi देण्यासाठी नक्की बनवून पाहा हा मिठाईचा सर्वांचा आवडता प्रकार.
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम