माणूस हा आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी दिवसरात्र कष्ट करत असतो. आपलं कुटुंब सुखी रहावं म्हणून त्याचे अतोनात प्रयत्न सुरु असतात. परंतु आनंद आणि सुख देण्याच्या जबाबदारीत तो स्वतःच्या आरोग्याकडे आणि कुठे ना कुठे कुटुंबाकडेही त्याचे दुर्लक्ष होते. अशाच एका व्यक्तीची गोष्ट सांगणारा डॉ. राज माने लिखित आणि दिग्दर्शित ‘काही क्षण प्रेमाचे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सुबोध भावे आणि भार्गवी चिरमुले हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री भार्गवी चिरमुलेशी मारलेल्या दिलखुलास गप्पा.
अभिनेत्री भार्गवी चिरमुले या चित्रपटात सुबोध भावेच्या बायकोची भूमिका निभावतेय. ‘काही क्षण प्रेमाचे’ हा चित्रपट पूर्णपणे कौटुंबिक चित्रपट असून प्रत्येक प्रेक्षकाला हा चित्रपट आपल्याच घरातील वाटेल, अशी भावना भार्गवीने व्यक्त केली. या चित्रपटातील नायक हा कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी नेहमी तणावात जगत असतो आणि याच तणावात तो आपल्या आरोग्याकडे आणि आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्षित करतो. या गोष्टीची जाणीव नायकाला तेव्हा होते जेव्हा त्याच्या आयुष्यात एक मोठी घटना घडते. यानंतर तो आणि त्याचे कुटुंब स्वतःला कसे सावरतात? हे या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका, स्वतःच्या कुटुंबाकडेही लक्ष ठेवा, असा संदेश या चित्रपटातून प्रेक्षकांना देण्यात येणार आहे.
सुबोध भावेसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. या आधीही सुबोधसोबत काम केलं असल्यामुळे आणि आम्ही दोघंही खूप जुने मित्रमैत्रीण असल्यामुळे आमचं बॉंडिग खूपच मस्त होतं आणि या चित्रपटामुळे अजून पक्की झाली. त्यामुळे सुबोधसोबत काम करण खूपच सोप्प गेलं, असं भार्गवी सांगत होती.
या चित्रपटातील गाण्याचं शूटिंग दोनदा करण्यात आलं होतं, कारण शूट केल्यानंतर निर्मात्यांना वाटलं की हे गाणं जसं हवंय तसं शूट झालं नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा त्या गाण्याचं शूटिंग केलं होतं. मुख्य म्हणजे हे गाणं एका हॉस्पिटलमध्ये शूट केलं आहे. त्यामुळे त्या गाण्याच्या शूटींगदरम्यान हॉस्पिटलमधल्या रुग्णांशी आम्ही खूप गप्पा मारल्या, खूप वेळ त्यांच्यासोबत घालवला. तर तो अनुभव, ते क्षण खूप छान होते, असं भार्गवी म्हणाली.
नाटक, चित्रपट आणि सीरीयल अशा तिन्ही क्षेत्रांत काम केल्यामुळे तिन्ही क्षेत्रांतून वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. अंगिक अभिनय, वाचिक अभिनय आणि कायिक अभिनय हे तिन्ही फरक या क्षेत्रातून शिकायला मिळाल्याचं भार्गवी सांगते.
आजकाल आपल्या सगळ्यांवरच काही ना काही तणाव असतो. त्यामुळे आपल्या तब्येतीकडेही आपलं दुर्लक्ष होत असतो. जर रोजची कसरत सांभाळून आपण आरोग्य आणि कुटुंबाकडेही लक्ष दिलं तर आपण खूप सुखी राहू शकतो, असा संदेश देणारा ‘काही क्षण प्रेमाचे’ हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन नक्की पहावा, असं भार्गवीने सांगितलं.
हेही वाचा –
‘डोंबिवली रिटर्न’चा वेगवान आणि लक्षवेधी टीझर लाँच
आता हा ट्रेलर नक्कीच लावेल तु्मच्या ‘डोक्याला शॉट’
मराठीत पहिल्यांदाच खास शूट करण्यात आलं ‘हिरोईन- इंट्रोडक्शन’ साँग