घरात लहान बाळ असेल तर घरातील सगळ्यांचं आयुष्य त्या बाळाभोवती फिरतं! बाळाचं उठणं, झोपणं, पहिले बोबडे बोल, पहिल्यांदा पालथं पडणं, स्वतःहून बसणं, उभं राहणं, दुडूदुडू चालायचा प्रयत्न करणं हे सगळे क्षण साजरे होतात. अगदी बाळाची शी-शु सुद्धा कौतुकाचा विषय असते. पण बाळाला जराही काही त्रास झाला, बरं नसलं की बाळाच्या आईबाबांसह सगळंच घर अस्वस्थ होतं. बाळांना सर्दी-पडसं वगैरे होणं जशी सामान्य बाब आहे, तशीच बाळाच्या नाजूक त्वचेला कधीतरी त्रास होणेही सामान्य आहे. त्यात डायपर रॅशेसचा त्रास तर बऱ्याच बाळांना होतो. अशा वेळी नव्यानेच आई बाबा झालेल्यांना टेन्शन येतं आणि मग ते बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय (Diaper Rash In Babies Home Remedies In Marathi) असं नेटवर सर्च करणे, लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे, अशी धावपळ करतात.
Table of Contents
- डायपर रॅशेस म्हणजे काय? । What are Diaper Rash In Marathi?
- बाळाची शी ची जागा लाल होण्याची कारणे । Causes of Diaper Rashes In Marathi
- डायपर रॅशचे प्रकार । Types Of Diaper Rashes In Marathi
- डायपर रॅशची लक्षणे । Symptoms Of Diaper Rashes In Marathi
- बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय। Diaper Rash Upay In Marathi
- डायपर रॅशवर औषधी उपचार । Treatment for Diaper Rash in Marathi
- FAQ – डायपर रॅशेसबद्दल पडणारे काही प्रश्न
डायपर रॅशेस म्हणजे काय? । What are Diaper Rash In Marathi?
बाळाची शी ची जागा लाल होणे, त्यावर पुरळ उठणे, तिथल्या त्वचेचा दाह होणे किंवा त्वचा सुजणे, तिथल्या जागी लाल चट्टे उठणे या सगळ्या त्रासाला डायपर रॅशेस असे म्हणतात. डायपर रॅशेस बहुतेक वेळा ओला लंगोट (डायपर) बराच वेळ तसाच राहिल्याने किंवा डायपर उशिरा बदलल्याने , त्वचा संवेदनशील असल्याने आणि बाळाच्या नाजूक त्वचेवर घर्षण झाल्याने होऊ शकतात. खरं तर हा त्रास सहसा बाळांनाच होतो पण जर कोणीही (म्हातारी माणसे) काही आजार किंवा काही कारणांमुळे नियमितपणे डायपर घालतात त्यांनाही हा त्रास होऊ शकतो. बाळाला आलेल्या डायपर रॅशेस बघून पालक घाबरतात कारण त्याचा बाळांना त्रास होतो. किती आणि कसा त्रास होतोय हे बिचारी बाळे सांगूही शकत नाहीत. फक्त रडून ते त्यांचा त्रास आपल्यापर्यंत पोहोचवू शकतात.
तरीही डायपर रॅशेस घरगुती उपाय (Diaper Rash Upay In Marathi) करून बऱ्या होतात. त्यामुळे जास्त घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. बाळाची शी ची जागा स्वच्छ व कोरडी ठेवणे, लंगोट /डायपर ओला किंवा खराब झाल्यास लगेच बदलणे , मऊ कापडाचा लंगोट/डायपर वापरणे आणि रॅशेससाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रीम /औषध (Diaper Rash Cream Uses Marathi) नियमितपणे लावणे हे सगळे केलेत की तुमच्या बाळाच्या डायपर रॅशेस नक्कीच बऱ्या होतील.
लहान मुलांच्या जुलाबावर घरगुती उपाय
बाळाची शी ची जागा लाल होण्याची कारणे । Causes of Diaper Rashes In Marathi
बाळाला डायपर रॅशेस खालीलपैकी अनेक कारणांमुळे होऊ शकतात –
1. लघवी किंवा मल यामुळे त्वचेचा दाह
बाळाचा लंगोट /डायपर लवकर न बदलल्यास लघवी किंवा मल यांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे बाळाच्या संवेदनशील त्वचेला त्रास होऊ शकतो. जर तुमच्या बाळाला अतिसार होत असेल तर त्याला डायपर रॅश होण्याची अधिक शक्यता असते कारण विष्ठा लघवीपेक्षा जास्त त्रासदायक असते.
2. घर्षणामुळे त्वचेचा दाह होणे
बाळाचा डायपर खूप घट्ट असेल किंवा तो वारंवार त्वचेवर घासला जात असेल, किंवा तो मऊ कापडाचा नसेल तर बाळाच्या नाजूक त्वचेवर डायपरचे घर्षण झाल्याने बाळाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.
3. एखाद्या नव्या प्रॉडक्ट्ची ऍलर्जी
तुम्ही तुमच्या बाळासाठी जर कुठले नवे प्रॉडक्ट जसे की अंघोळीचा साबण, बेबी वाईप्स, डिस्पोजेबल डायपर्स वगैरे नव्याने वापरायला सुरु केले असेल तर त्या प्रॉडक्टची बाळाच्या त्वचेला ऍलर्जी झालेली असू शकते.किंवा बाळाचे लंगोट धुण्यासाठी वापरल्या जाणार्या डिटर्जंट, ब्लीच किंवा फॅब्रिक सॉफ्टनरची सुद्धा बाळाला ऍलर्जी होऊ शकते. किंवा बेबी लोशन, बेबी पावडर आणि बेबी ऑइल मधील एखाद्या घटकाची बाळाला ऍलर्जी असू शकते. ऍलर्जी मुळे त्वचेवर पुरळ उठू शकते किंवा लाल चट्टे येऊ शकतात किंवा बाळाच्या त्वचेला जळजळ होऊ शकते.
4. बॅक्टेरियल किंवा यीस्ट किंवा फंगल इन्फेक्शन
हे इन्फेक्शन त्वचेच्या साध्या संसर्गापासून जे सुरू होते आणि ते आजूबाजूला पसरू शकते. डायपरने झाकल्या गेलेल्या त्वचेला इन्फेक्शनचा जास्त धोका असतो कारण ती जागा उबदार आणि ओलसर असते. त्यामुळे बॅक्टेरिया आणि यीस्टच्या वाढीसाठी ते पोषक वातावरण असते. या रॅशेस त्वचेच्या फोल्डमध्ये आढळू शकतात आणि फोल्डच्या आजूबाजूला लाल रंगाचे पुरळ किंवा चट्टे येतात.
5. खाण्यातून नवीन पदार्थांचा परिचय
सहा महिन्यानंतर बाळाला हळूहळू वरचा आहार सुरु करतात. जसजसे बाळ घन पदार्थ खाण्यास सुरुवात करते, त्यांच्या शी मध्ये (विष्ठा) बदल होतो. यामुळे डायपर रॅश होण्याची शक्यता वाढते. बाळाच्या आहारात बदल झाल्याने बाळाला अतिसाराचा त्रास होऊ शकतो.व बराच काळ लंगोट बदलला नाही तर त्यामुळे देखील डायपर रॅशेस होऊ शकतात.
6. संवेदनशील त्वचा
एटोपिक डर्माटायटीस किंवा सेबोरेहिक डर्माटायटीस (एक्झिमा) सारखी त्वचेची स्थिती असलेल्या बाळांना डायपर रॅश होण्याची शक्यता जास्त असते. परंतु एक्झिमाचा त्रास बाळाच्या शी च्या जागी न होता इतर ठिकाणी होण्याची शक्यता जास्त असते.
7. प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स)
प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) आपल्या शरीरातील जीवाणू नष्ट करतात. ही औषधे घेत असताना पोटातील चांगले बॅक्टेरियाही नष्ट होतात. जेव्हा बाळ आजारी पडते आणि त्याला अँटिबायोटिक्स दिले जातात, तेव्हा त्याच्या शरीरातील यीस्टची वाढ रोखणारे जीवाणू कमी होऊ शकतात. त्यामुळे यीस्ट संसर्गामुळे डायपर रॅशेस येऊ शकतात. प्रतिजैविकांच्या वापरामुळे अतिसाराचा धोकाही वाढतो. आईने काही कारणाने अँटीबायोटिक्स घेतले तर स्तनपान करणाऱ्या बाळाला डायपर रॅशचा धोका वाढतो.
डायपर रॅशचे प्रकार । Types Of Diaper Rashes In Marathi
डायपर रॅशचे पुढील प्रकार आहेत –
1. इरिटन्ट कॉन्टॅक्ट डर्मटायटिस
इरिटन्ट कॉन्टॅक्ट डर्मटायटिस हा डायपर रॅशचा सर्वात सामान्य प्रकार आहे. जेव्हा बाळ ओल्या किंवा घाण झालेल्या डायपरमध्ये दीर्घकाळ बसते तेव्हा अशा प्रकारची रॅश येते. बाळाच्या त्वचेवर लाल चट्टे किंवा ठिपके दिसू शकतात. जर ते वाढले तर तिथे जखम ही होऊ शकते व त्यातून रक्तस्त्राव होऊ शकतो. उघड्या फोडांमुळे फंगस आणि बॅक्टेरिया त्वचेत जाणे सोपे होते, ज्यामुळे सेकंडरी इन्फेक्शनचा धोका वाढतो.
2. कॅंडिडिआसिस किंवा यीस्ट इन्फेक्शन
कँडिडा नावाच्या फंगसचा समूह सामान्यतः आपल्या त्वचेवर आणि डायपरच्या भागात असतो. जेव्हा यीस्टची जास्त प्रमाणात वाढ होते तेव्हा कॅन्डिडिआसिस ही वेदनादायक डायपर रॅश किंवा यीस्ट इन्फेक्शन होऊ शकते. या प्रकारात त्वचेवर आलेले पुरळ लाल आणि फुगलेले दिसू शकते आणि पांढरे, द्रव भरलेले फोड किंवा खवले असलेले सुजलेले डाग असू शकतात.
3. बॅक्टेरियल स्किन इन्फेक्शन
बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे बाळाची त्वचा लाल होते व सुजलेली दिसू शकते. उपचाराशिवाय, हे संक्रमण शरीराच्या इतर भागात देखील पसरू शकते व त्याचा बाळाला खूप त्रास होऊ शकतो. जिवाणू संसर्ग असलेल्या बाळांना ताप येऊ शकतो. काहींना डायपर रॅशशिवाय इतर कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. तरीही वेळेत डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे.
डायपर रॅशची लक्षणे । Symptoms Of Diaper Rashes In Marathi
लहान मुलांमध्ये डायपर रॅशची पुढील लक्षणे दिसून येतात –
- बाळाचे नितंब, मांड्या आणि गुप्तांगांवर लाल रंगाचे पुरळ, डाग किंवा चट्टे उठतात.
- तिथली त्वचा खूप नाजूक व संवेदनशील होते.
- या सगळ्याचा त्रास झाल्यामुळे बाळ नेहमीपेक्षा जास्त अस्वस्थ होते.
- विशेषतः डायपर बदलताना तिथल्या त्वचेला धक्का लागल्याने बाळाला त्रास होतो व बाळ खूप रडते.
- डायपर रॅश असलेले बाळ बहुतेक वेळा मांड्या, नितंब व गुप्तांगाचा भाग धुतल्यावर किंवा तिथे स्पर्श केल्यावर रडते.
- काही दिवसांच्या घरगुती उपचारानंतरही बाळाला वाटत नसेल तर वेळ न दवडता तुमच्या डॉक्टरांशी बोला.
- कधीकधी, डायपर रॅशवर उपचार करण्यासाठी स्ट्रॉंग औषधाची गरज पडू शकते.
- बाळाच्या त्वचेवर तीव्र प्रकारचे पुरळ असल्यास, घरगुती उपचार करूनही त्रास कमी होत नसल्यास, त्वचेतून रक्तस्त्राव होणे, खूप खाज सुटणे, लघवी किंवा मलविसर्जनासह जळजळ किंवा वेदना होणे, ताप येणे ही लक्षणे दिसल्यास वेळ न घालवता लगेच बाळाला डॉक्टरांकडे न्या.
बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय। Diaper Rash Upay In Marathi
बाळाच्या शी ची जागा लाल झाल्यास किंवा डायपर रॅश आल्यास खालील उपाय करा. तसेच पुढेही बाळाच्या नाजूक त्वचेला त्रास होऊ नये म्हणून खालील गोष्टींचे कटाक्षाने पालन करा.
- ओले किंवा खराब झालेले डायपर त्वरित बदला. जर तुमचे मूल डे केअर मध्ये जात असेल तर तिथे बाळाला सांभाळणाऱ्या सदस्यांना ते करण्यास सांगा.
- प्रत्येकवेळेला डायपर बदलताना बाळाची शी ची जागा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. ओलसर मऊ कापड किंवा बेबी वाइप्स वापरू शकता परंतु अल्कोहोलयुक्त किंवा सुगंधी वाइप्स वापरू नका. तुम्हाला साबण वापरायचा असल्यास, सौम्य, सुगंध नसलेला प्रकार निवडा.
- स्वच्छ मऊ टॉवेलने बाळाची त्वचा हलक्या हाताने पुसून घ्या किंवा लगेच डायपर न घालता बाळाला थोड्यावेळ मोकळ्या हवेत राहू द्या. बाळाची त्वचा घासू नका. स्क्रबिंगमुळे त्वचेला आणखी त्रास होऊ शकतो.
- बाळाला जास्त घट्ट डायपर घालू नका.घट्ट डायपरमुळे बाळाच्या त्वचेला हवा मिळत नाही व डायपर रॅशेससाठी अनुकूल ओलसर वातावरण तयार होते. घट्ट डायपरमुळे कंबर किंवा मांड्यानाही घर्षणाचा त्रास होतो.
- जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमच्या बाळाला डायपरशिवाय ठेवा.बाळाला थंडी वाजत असेल तर बाळाला दुपट्यात गुंडाळा. खोलीतले वातावरण उबदार ठेवून बाळाला थोड्यावेळ उघडे ठेवून त्याच्याशी खेळा.
- जर तुमच्या बाळाला वारंवार रॅशेसचा त्रास होत असेल तर त्वचेची जळजळ टाळण्यासाठी प्रत्येकवेळी डायपर बदलताना डॉक्टरांना विचारून मलम लावा.
- डायपर बदलल्यानंतर तुमचे हात स्वच्छ धुवून घ्या. हात धुण्यामुळे तुमच्या बाळाच्या शरीराच्या इतर भागांमध्ये बॅक्टेरिया किंवा यीस्टचा प्रसार रोखला जाईल.
डायपर रॅशवर औषधी उपचार । Treatment for Diaper Rash in Marathi
बाळाच्या डायपर रॅशेसवर उपचार करताना त्वचेची जळजळ शांत करणे आणि पुरळांवर उपचार करणे हा उद्देश असतो.डॉक्टर झिंक ऑक्साईड किंवा पेट्रोलियम जेली युक्त क्रीम किंवा लोशन देतील. स्वच्छ डायपर घालण्यापूर्वी बाळाला ते क्रीम किंवा लोशन लावा.तुमच्या बाळाला फंगल इन्फेक्शन झाले असल्यास डॉक्टर त्यासाठी अँटीफंगल क्रीम देतील. तसेच बॅक्टेरियाचा संसर्ग असल्यास टॉपिकल किंवा पोटातून घ्यायचे अँटिबायोटिक औषध देतील. जर गरज पडली तर डॉक्टर स्टिरॉइड क्रीम्स लावायला सांगतील पण जोपर्यंत डॉक्टर तुम्हाला ते वापरण्यास सांगत नाहीत तोपर्यंत आपल्या मनाने ते क्रीम वापरू नका नाहीतर त्यामुळे बाळाला आणखी त्रास होऊ शकेल.
FAQ – डायपर रॅशेसबद्दल पडणारे काही प्रश्न
डायपर रॅशेस बरे होण्यासाठी किती वेळ लागतो?
डायपर रॅशेस सामान्यतः 2 ते 3 दिवसात घरगुती उपचारांनी बरे होऊ लागते.,पण जर ते जास्त काळ राहिले तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
नॅपी रॅशसाठी आईचे दूध परिणामकारक आहे का?
डायपरमुळे तुमच्या बाळाची त्वचा लाल होऊ शकते आणि त्वचेचा दाह होऊ शकतो. आईचे दूध तुमच्या नवजात बाळाच्या त्वचेचा दाह शांत करण्यास मदत करू शकते आणि पुरळांवर उपचार करण्यात मदत करू शकते.पण जर ही समस्या लवकर बरी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे
डायपर रॅशसाठी बेबी पावडर वापरावी का?
तुमच्या बाळाला पुरळ येत असताना बेबी पावडर वापरू नका. पावडर त्वचेच्या फोल्डमध्ये जाऊन ओलावा टिकवून ठेवू शकते. यामुळे बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते. डायपर रॅशचा त्रास होत असताना तुमच्या बाळाच्या त्वचेला डॉक्टरांचा सल्ला घेऊन डायपर क्रीम लावू शकता.
डायपर रॅशेस गंभीर नसले तरी त्याचा बाळाला त्रास होतो त्यामुळे त्यावर वेळेत उपचार होणे आवश्यक आहे.
अधिक वाचा –
बाळाला दात येतात तेव्हा (Symptoms And Home Remedies Of Teething In Babies)