दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा. शारदीय नवरात्रीनंतर लगेचच येणारा सण म्हणजे विजयादशमी अर्थात दसरा हा सण होय. या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केल्यावर लोकांनी विजयाचा उत्सव साजरा केला. या दिवशीच प्रभू रामांनी रावणाचा वध केला होता. या दिवशी आवर्जून एकमेकांना दसरा शुभेच्छा दिल्या जातात. चला जाणून घेऊया या दिवशीचा शुभ मुहूर्त आणि केली जाणारी महत्त्वपूर्ण कार्य काय आहेत ते.
दशमीची तिथी – ही तिथी 14 ऑक्टोबर 2021 दिवशी गुरूवारी संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी सुरू होत असून 15 ऑक्टोबर 2021 शुक्ववारी संध्याकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी समाप्त होत आहे. म्हणजेच विजयादशमीचा सण हा 15 ऑक्टोबर 2021 च्या दिवशी शुक्रवारी साजरा करण्यात येईल.
या तिथीमध्ये स्थानिक पंचांगांनुसार तिथी आणि मुहूर्ताच्या वेळामध्ये थोड्या जास्त प्रमाणात बदल आढळतो.
- दसऱ्याच्या दिवशी रात्री भारताच्या उत्तर भागात खासकरून रावण दहनाचा कार्यक्रम असतो. महाराष्ट्रात हे इतकं दिसून येत नाही. परंतु उत्तर भारतात मात्र रावण दहनाला फार महत्त्व आहे.
- या दिवशी अस्त्र-शस्त्रांची पूजा करण्याला फार महत्त्व आहे.
- या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केल्याची आख्यायिका तर आहेच. सोबतच प्रभू रामांनी रावणाचा वध केला होता. त्यामुळे सत्याचा असत्यावरील किंवा चांगल्याचा वाईटावरील विजयाचा दिवस मानला जातो.
- या दिवशी शमीच्या वृक्षाची पूजा केली जाते. तर आपट्याची पानं प्रतिकात्मक सोनं म्हणून एकमेकांना दिली जातात. ही परंपरा खासकरून महाराष्ट्रात पाहायला मिळते.
- या दिवशी काही नवीन कार्य करणे, नवीन खरेदी करणे किंवा नवीन कपडे घालण्याचं प्रचलन आहे. दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी कोणत्याही केलेल्या गोष्टीची भरभराट होते असे मानले जाते.
- या दिवशी मुलांना दशहरी देण्याची पद्धतही भारताच्या काही भागात प्रचलित आहे. दशहरी म्हणजेच मुलांना काही बक्षिस, पैसै किंवा मिठाई दिली जाते.
- या दिवशी आपल्या कुटुंबातील मोठ्यांचा आणि नातलगांचा नमस्कार करून आशिर्वाद नक्की घ्यावा.
- या दिवशी अनेक प्रकारची पक्वान्न घरोघरी बनवली जातात. तसंच उत्तर भारतात या दिवशी खासकरून घोसाळ्याची भजी करण्याची परंपरा आहे.
- या दिवशी बऱ्याच ठिकाणी फटाकेही फोडले जातात.
- दसऱ्याच्या निमित्ताने लोक एकमेंकामधील शत्रुता विसरून गळाभेट करतात.
मग यंदा तुम्हीही दसऱ्याच्या निमित्ताने आपल्यातील रावणाचं दहन करून रामाचा उदय होऊ द्या. तसंच सत्याचा असत्यावर विजय होऊ द्या. तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दसरा.