काळे, घनदाट आणि लांब केस कोणत्या मुलीला आवडत नाहीत? असे केस सांभाळणं आणि त्याची निगा राखणं हा नक्कीच प्रत्येक मुलीसाठी एक टास्क असतो. पण असे केस जेव्हा गळायला लागतात तेव्हा तुमच्यासाठी नक्कीच चिंतेचं कारण बनतं. असं म्हटलं जातं की, दिवसभरात साधारण शंभर केस गळणं ही नॉर्मल गोष्ट आहे. पण त्यापेक्षा अधिक केस गळत असतील तर हे नक्कीच तुमच्या चिंतेचं कारण आहे. तसं तर पार्लरमध्ये बऱ्याच स्वरूपाचे हेअर मसाज करण्यात येतात. पण सतत पार्लरमध्ये जाऊन या गोष्टी करून घेणं नक्कीच प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असं नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या केसांची घरच्या घरी निगा राखण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही घरच्याघरी सुंदर, लांबसडक आणि घनदाट काळे केस मिळवू शकता.
प्रत्येकाच्या केसांचा प्रकार हा वेगळा असतो. काही जणींचे केस कोरडे असतात तर काही जणींचे केस तेलकट असतात तर काही जणींच्या केसांचा प्रकार हा कॉम्बिनेशन पद्धतीत मोडतो. त्यामुळे अशा केसांची काळजी घरच्या घरी कशी घ्यायची हे जाणून घेऊया
कोरड्या केसांचा गुंता हा पटकन होत असतो. कोरड्या केसांसाठी तुम्ही नेहमीच जास्त तेलाचा वापर करा. चांगल्या परिणामासाठी तुम्ही बदामाचं तेल, ऑलिव्ह ऑईल आणि मस्टर्ड ऑईलचा वापर करू शकता. लक्षात ठेवा की, कधीही तेल हे रात्रभर केसांना लावून ठेऊ नका. बऱ्याचदा तेल रात्रभर लावून झोपण्याचा सल्ला देण्यात येतो. पण असं करणंं चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी आंघोळीला जाणार असाल तेव्हा त्यापूर्वी साधारण 20 मिनिट्स आधी तुम्ही तुमच्या केसांना तेल लावून मालिश करा. केसांना नेहमी मुळापासून मसाज करा. त्यानंतर गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून घ्या आणि तेल लावलेल्या केसांवर लावून ठेवा. साधारण वीस मिनिट्सनंतर व्यवस्थित शॉवर घेऊन डोक्यावरून आंघोळ करा.
तेलकट केसांची काळजी घेण्याची जास्त गरज आहे. प्रदूषण, धूळ, माती याच्या संपर्कात येऊन केस तेलकट होऊ लागतात. तेलकट केस व्यवस्थित राहावेत यासाठी तुम्ही घरच्या घरीच पॅक बनवू शकता. या पॅकमुळे तुम्हाला तुमच्या तेलकट केसांची काळजी योग्यरित्या घेता येते. त्यासाठी तुम्ही बेसनात दही मिक्स करा आणि आपल्या केसांना लावा. साधारण 20 मिनिट्स झाल्यावर केस शँपूने धुवा. त्याशिवाय महिन्यातून तुम्ही कमीत कमी दोन वेळा तेल लावून केसांना मालिश करणं गरेजचं आहे.
Shutterstock
केसगळती ही सध्याची सर्वात मोठी आणि गंभीर समस्या आहे. तुम्हाला जर केसगळतीची समस्या असेल तर तुम्ही नारळाच्या तेलामध्ये कापूर आणि कोथिंबीर घालून त्याची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट तुम्ही तुमच्या केसांना लावा आणि साधारण 20 मिनिट्स केसांवर ही पेस्ट तशीच राहू द्या. त्यानंतर तुम्ही थंड पाण्याने केस धुवा. ही पेस्ट लावल्यानंतर तुम्ही केसांना हॉट टॉवेलने स्टीमही करू शकता. यामुळे केस मजबूत होतात.
कोरडे केस दिसायला अजिबातच चांगले दिसत नाहीत. तसंच जेव्हा तुम्ही केस विंचरता तेव्हा यामध्ये जास्त प्रमाणात गुंता होतो. केसात चमक आणण्यासाठी तुम्हाला सतत पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी उपाय करू शकता. तुम्हाला एक केळं घेऊन त्यात दही मिक्स करावं लागेल. हे मिश्रण तुम्ही वाटून घ्या आणि त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांवर लावून साधारण 20 मिनिट्स नंतर केस धुवा. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केस धुताना तुम्ही सल्फेट फ्री शँपूचा वापर केलात तर तुम्हाला अधिक चांगले परिणाम तुमच्या केसांवर पाहायला मिळतील.
हेदेखील वाचा
लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी 10 घरगुती उपाय
पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय
#DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय