भारतीय खाद्यपदार्थांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ म्हणजे हळद. मात्र हळद फक्त स्वयंपाकासाठीच वापरली जाते असं नाही तर तिचा वापर भारतात औषधाप्रमाणेही केला जातो. एखादी जखम भरून येण्यासाठी हळद जखमेवर लावली जाते. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी हळदीचे दूध प्यायले जाते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी हळदीचा लेप लावला जातो. एवढंच नाही तर लग्नात वधू वरांच्या चेहऱ्यावर ग्लो यावा यासाठी खास हळदी समारंभ केला जातो. थोडक्यात भारतात हळदीचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. पण त्यामुळेच हळदीची भेसळदेखील मोठ्या प्रमाणावर केली जाताना दिसते. जर चुकून अशी भेसळयुक्त हळद स्वयंपाकासाठी, औषधासाठी अथवा त्वचेसाठी वापरली गेली तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. यासाठीच भेसळयुक्त हळद ओळखण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
भेसळयुक्त हळद कशी ओळखावी –
भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण (FSSAI) या संस्थेने नुकतंच हळदीची टेस्ट करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरात असलेली हळद भेसळयुक्त आहे का हे सहज ओळखू शकता. FSSAI ने भेसळयुक्त पदार्थ ओळखण्यासाठी एक सिरिजच सुरू केली आहे. ज्याचं नाव आहे #Detectingfoodadultera तुम्ही या परिक्षणाअंतर्गत मीठ, मसाले यांच्यामध्ये होणारी भेसळ ओळखू शकता. भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण (FSSAI) संस्थेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हळदीची शुद्धता तपासण्यासाठी एक खास व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुम्ही घरी बसून याचे परिक्षण करू शकता.
हळदीची शुद्धता कशी तपासावी
हळदीची शुद्धता तपासण्यासाठी या व्हिडिओमध्ये दिलेल्या काही सोप्या स्टेप तुम्ही फॉलो करू शकता.
स्टेप १ – एक ग्लास पाणी घ्या
स्टेप २ – त्या पाण्यात एक चमचा हळदीची पावडर मिसळा
स्टेप ३ – जर तुमची हळद शुद्ध असेल तर पाण्यात तळाशी जावून बसेल आणि पाणी पिवळसर रंगाचे होईल
स्टेप ४ – जर तुमची हळद भेसळयुक्त असेल तर पाण्याचा रंग काळसर पिवळा होईल
हळदीमध्ये भेसळ करण्यासाठी मक्याची पावडर, पिवळा रंग, तांदळाचा कोंडा मिसळला जातो. अशी भेसळयुक्त हळद खाण्यामुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य बिघडू शकते. बाजारात मिळणारी हळद शुद्ध आहे की अशुद्ध हे समजणं खूप अवघड असतं. कारण हळदीचा रंग पिवळाच असल्यामुळे त्यातील फरक डोळ्यांना समजत नाही. भेसळयुक्त पदार्थ खाणे आरोग्यासाठी हिताचे नसल्यामुळे प्रत्येकाला अशा पदार्थांची ओळख असायला हवी. भेसळ टाळण्यासाठी तुम्ही हळद खरेदी करताना त्यावर FSSAI मार्क आहे का हे तपासू शकता. ब्रॅंडेड हळदीच्या पाकीटावर असा मार्क असतो. मात्र जर तुम्ही बाजारात सुट्टी हळद विकत घेणार असाल तर ती घेण्याआधी ती या प्रमाणानुसार तपासून मगच विकत घ्या.