आरोग्य हीच आपली खरी धनसंपदा आहे. अगदी लहानपणापासून घरातील मोठी माणसं हे वाक्य आपल्याला आवर्जून सांगायची. मात्र सध्या पैशांच्या मागे धावता धावता आपली जीवनशैलीच अशी झाली आहे की आरोग्य सांभाळण्यासाठी हवा तितका वेळ नक्कीच देता येत नाही. सध्या लॉकडाऊनमुळे मात्र आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ सर्वांना आपोआप मिळाला आहे. जगात कोरोनाने घालतेल्या थैमानामुळे आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीच. त्यामुळे आता घरात राहून आहार आणि व्यायामाकडे पुरेसं लक्ष दिलं तर आरोग्य सांभाळणं मुळीच कठीण नाही. लॉकडाऊनमुळे सध्या घरातील सर्वजण शेफ झालेच आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर निरनिराळे पदार्थ नव्याने ट्रेंडमध्ये येत आहेत. मात्र जर निरोगी राहायचं असेल तर पौष्टिक आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे पदार्थ या काळात खायला हवेत. शिवाय घरात राहून चमचमीत खाण्यामुळे अनेकांच्या वजनात देखील भरमसाठ वाढ होतेय. तेव्हा वेळीच या वजनालाही नियंत्रित ठेवायला हवं. नाचणीचे काही खास पदार्थ आहारात समाविष्ठ करून तुम्ही तुमच्या वजनावर नक्कीच नियंत्रण मिळवू शकता. यासाठी जाणून घ्या नाचणीच्या या झटपट आणि पौष्टिक रेसिपी
नाचणीच्या पदार्थांमुळे कसे होते वजन कमी
नाचणी एक पोष्टिक तृणधान्य आहे. ज्यात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. नाचणीला पूर्ण अन्नाचा दर्जा असल्यामुळे नाचणीयुक्त पदार्थांनी तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नाचणीचे पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला फायदाच होतो. कारण यामधुन अतिशय कमी प्रमाणात कॅलरिज तुमच्या शरीराला मिळतात. शिवाय नाचणीयुक्त पदार्थांमधील फायबर्समुळे तुमचं पोट देखील भरलेलं राहतं आणि तुम्हाला वारंवार भुक लागत नाही.
Shutterstock
नाचणीचा डोसा अथवा इडली –
नाचणीचा वापर तुम्ही सकाळचा नाश्ता करताना नक्कीच करू शकता. ज्यामुळे दिवसभर तुमचं पोट व्यवस्थित भरलेलं राहील. नाश्ता म्हटला की डोसा, उतप्पा आणि इडली आलीच.
साहित्य –
नाचणी दीड वाटी, तांदूळ अर्धी वाटी, मुगडाळ अर्धी वाटी आणि उडदाची डाळ अर्धी वाटी
कृती –
नाचणी, डाळ, तांदूळ एकत्र करून रात्री भिजत घालवे. सकाळी सर्व मिश्रण पाण्यातून निथळून वाटून घ्यावे. नॉनस्टिक पॅनवर याचे नेहमीप्रमाणे डोसे तयार करावे. जर तुम्हाला याची उतप्पा अथवा इडली करायची असेल तर हे साहित्य सकाळी भिजत घालावे आणि रात्री वाटून ठेवावे. म्हणजे सकाळी पीठ आंबेल जाईल आणि त्यापासून तुम्हाला उतप्पा अथवा इडली नक्कीच करता येईल.
नाचणीचे लाडू –
दररोज नाचणीचा आहारात वापर करण्यासाठी नाचणीचे लाडू हा नक्कीच उत्तम पर्याय आहे.
साहित्य –
नाचणीचे पीठ चार वाट्या, पाऊण वाटी साजूक तूप, तीन वाटी दळलेली साखर अथवा गूळ, वेलची पावडर आणि सजावटीसाठी काजू अथवा बदाम
कृती –
नाचणीचे पीठ तूपात मंद आचेवर खमंग भाजून घ्यावे. त्यानंतर त्यात दळलेली साखर अथवा किसलेला गूळ टाकावा. काजू आणि बदामाचे तुकडे, वेलची पावडर मिसळून लाडू वळावेत.
वाचा – पौष्टिक लाडू रेसिपी मराठी
नाचणीचे सत्व अथवा पेज –
नाचणीचे सत्व लहान मुलांच्या वाढ आणि विकासासाठी अतिशय फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे घरातील वृद्ध आणि आजारी लोकांना तुम्ही हे सत्त्व नक्कीच देऊ शकता.
साहित्य –
अर्धी वाटी नाचणी, गूळ आणि मीठ
कृती –
नाचणी रात्री भिजत घालून सकाळी मिक्सरमध्ये जाडसर वाटावी. वाटलेले मिश्रण गाळून घ्यावे आणि त्यात गरजेनुसार पाणी, मीठ आणि चवीपुरता गूळ टाकून शिजवून घ्यावे. नाचणीचे सत्त्व गरम असतानाच घेतलं तर अगदी चविष्ठ लागते. नाचणी थंड असल्यामुळे उन्हाळ्यात असे सत्व पिण्याने उष्णतेचा त्रास कमी होतो.
नाचणीचे आप्पे –
साहित्य –
नाचणी, रवा, गूळ, मीठ,नारळाचे दूध, वेलचीपूड, आप्पेपात्र
कृती –
नाचणी धुवून जाडसर दळून घ्यावी. त्यात बारीक रवा, गूळ, चिमूटभर मीठ, नारळाचे दूध आणि वेलचीपूड टाकून मिश्रण एकजीव करावे. आप्पेपात्राला थोडे तेल लावून त्यात एक एक चमचा हे मिश्रण सोडावे. दोन्ही बाजूने आप्पे शिजले की ते सर्व्ह करावेत.
नाचणीची भाकरी –
करायला अतिशय सोपा आणि दररोज आहारात समावेश करण्यासारखा नाचणीचा पदार्थ म्हणजे नाचणीची भाकरी
साहित्य –
नाचणीचे पीठ. मीठ आणि पाणी, भाकरीसाठी लोखंडी तवा
कृती –
नाचणीच्या पीठात मीठ घालून त्याची गरम पाण्यात उकड काढून घ्यावी. उकडेलं पीठ मळून त्याची गोल आकाराची भाकरी धापावी. लोखंडी तव्यावर ती खरपूस शेकवावी.
याप्रमाणेच तुम्ही नाचणीचा वापर करून बिस्कीट, केक, पॅनकेक, उपमा, खीर असे अनेक पदार्थ घरच्या घरी तयार करू शकता.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक आणि इन्स्टाग्राम
हे ही वाचा-
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा
अधिक वाचा –
वजन कमी करायचं आहे मग नियमित खा ‘भाकरी’