सुकामेवा हा महाग असल्यामुळे तो घाऊक खरेदी करणं फायद्याचं ठरतं. मात्र असं केल्यामुळे बऱ्याचदा हवामानातील बदलामुळे तो लवकर खराबही होतो. सुकामेवा बराच काळ तसाच राहीला तर त्याला किड लागू शकते. यासाठीच योग्य पद्धतीने सुकामेवा साठवणं गरजेचं आहे. तुम्हालाही अशी घाऊक सामान भरून ठेवण्याची सवय असेल तर सुकामेवा स्टोअर करण्यासाठी आणि तो योग्य पद्धतीने टिकवण्यासाठी या किचन टिप्स जरूर फॉलो करा. या सोप्या आणि साध्या टिप्सच्या मदतीने तुम्ही घरात काजू, बदाम, अक्रोड, खारीक, अंजीर, जर्दाळू, पिस्ता, सर्व प्रकारच्या सुपरसीड्स जास्तीत जास्त दिवस साठवून ठेवू शकता.
सुकामेवा नेहमी ताजाच खरेदी करा –
जेव्हा तुम्ही सुकामेवा खरेदी कराल तेव्हा ही गोष्ट जरूर लक्षात ठेवा. तुम्हाला फ्रेश आणि ताजाच सुकामेवा खरेदी करायचा आहे. कारण जर तुम्ही आधीच सुकलेला अथवा जुना झालेला सुकामेवा खरेदी केला तर तो जास्त काळ टिकू शकणार नाही. त्यामुळे जर सुकामेवा फ्रेश नसेल तर तो जास्त प्रमाणात खरेदी न करता गरजेपुरताच खरेदी करा. पण जेव्हा तुम्ही साठवून ठेवण्यासाठी सुकामेवा खरेदी कराल तेव्हा तो फ्रेश आणि चांगल्या गुणवत्तेचा असेल याची काळजी घ्या.
अधिक वाचा –
सुकामेव्याचा वापर करून तुमचं नेहमीचं जेवण करा चविष्ट
हवाबंद डब्ब्यामध्ये साठवून ठेवा –
हवेच्या संपर्कात आल्यामुळे कोणतीही गोष्ट नक्कीच खराब होऊ शकते. यासाठीच तुम्ही बाजारातून आणलेला सुकामेवा स्वच्छ करून हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा. लक्षात ठेवा सुकामेव्याचे सर्व प्रकार निरनिराळ्या बरण्यांमध्ये भरून ठेवा. एकाच बरणीच सर्व प्रकारचा सुकामेवा ठेवू नका. कारण जर एक प्रकार खराब झाला तर त्यामुळे सर्वच सुकामेवा खराब होण्याची शक्यता वाढते.
थंड आणि कोरड्या जागी स्टोअर करा –
स्वयंपाकघरात सुकामेवा स्टोअर करताना या गोष्टीबाबतही सावध राहायला हवं. फ्रीजमध्ये अथवा थंड ठिकाणी सुकामेवा ठेवल्याने तो लवकर खराब होत नाही. मात्र जर तुम्ही आगीजवळ, ओलसर ठिकाणी किंवा अती उष्ण जागी सुकामेवा ठेवला तर त्याला किड लागण्याची शक्यता निर्माण होते.
रोस्ट करून स्टोअर करा –
तुम्ही सुकामेवा जास्त काळ टिकवण्यासाठी ते तव्यावर थोडे रोस्ट करून मग स्टोअर करू शकता. ज्यामुळे त्यांना किड लागणार नाही आणि ते जास्त दिवस टिकू शकतील. तुम्ही ते टेस्टी करण्यासाठी त्यांना खारवून म्हणजेच मीठ लावून मग ते रोस्ट करून टिकवून ठेवू शकता. ज्यामुळे ते टेस्टी होतील आणि जास्त दिवस टिकतील.
सुकामेवा किती दिवस टिकू शकतो –
प्रत्येक सुकामेव्याचे टिकण्याचा कालावधी हा निरनिराळा असतो. मात्र सर्वसाधारणपणे घरात सामान्य वातावरणात आणि हवाबंद डब्यात सुकामेवा सहा महिने टिकून ठेवता येतो. फ्रीजमध्ये तुम्ही सुकामेवा जवळजवळ एक वर्ष टिकवून ठेवू शकता तर डीप फ्रीजरमध्ये तो एक ते दोन वर्ष व्यवस्थित टिकू शकतो. मात्र फ्रीज अथवा डीप फ्रीजरमध्ये सुकामेवा साठवून ठेवताना तो छोट्या छोट्या हवाबंद पिशव्या अथवा डब्यांमध्ये साठवून ठेवावा. ज्यामुळे त्याचा वापर करण्यासाठी प्रत्येकवेळी सर्वच सुकामेवा तुम्हाला फ्रीजबाहेर काढावा लागणार नाही.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक
अधिक वाचा –
ताजे मटार साठवून ठेवण्यासाठी फॉलो करा या स्टेप-बाय-स्टेप टिप्स