घरोघरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झाली आहे. गणपती घरी आले की मागोमाग गौरीईही घरी येते. महाराष्ट्रात विविध प्रकारच्या गौरींची स्थापना केली जाते. खड्याच्या, फुलांच्या, उभ्या गौरी, जेष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन महालक्ष्मी तर कुणा कुणाकडे फक्त एकच गौरी घरी येते. गौरी म्हणजे माता पार्वती आणि ती गणपती बाप्पासोबत दोन दिवस माहेरपणासाठी आपल्या घरी येते अशी भाविकांची भावना असते. त्यामुळे घरोघरी गौरीचे आगमन, गौरीचा साजशृंगार आणि त्यांचे स्वागत असा खूप मोठा थाट असतो. गौरींच्या साजशृंगारासाठी रेशमी साडी आणि पारंपरिक दागदागिन्यांची निवड केली जाते. यासाठी जाणून घेऊ या गौरी-गणपती सजवण्यााठी कोणकोणते दागिने आपल्याकडे असायलाच हवे.
कोल्हापरी ठुशी अथवा साज –
पारंपरिक दागिन्यांमध्ये ठुशी अशा कोल्हापुरी साजला खूप महत्त्व आहे. कारण यामुळे तुमच्या घरातील गौरींचे तेजही अगदी कोल्हापुरची आई महालक्ष्मीप्रमाणे उजळून निघेल. ठुशी आणि कोल्हापुरी साज पारंपरिक, रेशमी आणि काठापदराच्या साडीवर खुलून दिसतो. त्यामुळे यंदा गौरी सजवण्यासाठी पहिला मान याच दागिन्याला द्यायला हवा.
मोत्याची चिंचपेटी आणि तनमणी –
जर तुम्ही गौरीला लाल, पिवळी, हिरव्या रंगाची साडी नेसवणार असाल तर त्यांना या मोत्याच्या दागिन्यांनी सजवा. कारण या रंगावर मोत्यांचे दागिने सुंदर दिसतात. ठुशीप्रमाणेच गळ्याभोवती घालण्यासारखी चिंचपेटी आणि त्यानंतर थोड्या मोठ्या आणि लांब सरीच्या तनमणीमुळे तुमची गौरी खूपच गोड दिसेल.
राणीहार अथवा शाहीहार –
माता पार्वतीला सजवण्यासाठी तुमच्याकडे असे मोठे आणि लांब स्वरूपातील हार असायलाच हवे. कारण यामुळे गौरीचा राजेशाही थाट अधिकच जाणवेल. हे दोन ते सहा पदरी असू शकतात. त्यामुळे जर तुम्ही हे हार गौरीला घालणार असाल तर इतर दागिने कमी घालूनही गौरींचा साज खूप सुंदर दिसेल.
मंगळसूत्र –
गौरींच्या सजावटीत मंगळसूत्र हा सर्वात महत्त्वाचा दागिना आहे. गौरी म्हणजेच पार्वती अर्थात भगवान श्री शंकराची पत्नी आहे. त्यामुळे पार्वतीच्या मंगळसूत्रांची खास निवड करायला हवी. गौरी उठावदार दिसण्यासाठी मोठ्या आणि जास्त काळेमणी असलेल्या मंगळसूत्रांची निवड करा. जर तुमच्या गौरीला तुम्ही पिवळ्या अथवा लाल रंगाची साडी नेसवली असेल तर त्यावर मंगळसूत्रांतील काळेमणी उठून दिसतील.
नथ –
गौरीच्या सजावटीची सुरूवात खरंतर सर्वात आधी नथीपासूनच होते. कारण पूजेआधी अनेक ठिकाणी गौरींच्या मुखवट्याची पूजा केली जाते. त्यामुळे गौरीच्या मुखवट्यावर तुम्हाला नथ घालावी लागते. तेव्हा नथीची निवड अशी करा ज्यामुळे गौरीच्या चेहऱ्यावरील तेज सर्वांनी फक्त पाहातच राहावं. आजकाल नथींमध्ये खूप निरनिराळे प्रकार बाजारात उपलब्ध असतात.
बांगड्या, तोडे आणि पाटल्या –
जर तुम्ही तयार गौराई बसवणार असाल तर आजकाल गौरीच्या साच्यांसोबत हातही बसवलेले असतात. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गौरीला बांगड्या, पाटल्या, तोडे, पिचौडी अशा निरनिराळ्या बांगड्यांनी सजवता येईल. या बांगड्यांची डिझाईन थोडी मोठी आणि उठावदार असेल याची काळजी घ्या. कारण ज्या हातांनी तुम्ही गौरीकडून आर्शीवाद घेणार ते हात असे ऐश्वर्यांने सजलेले असतील तर अधिकच छान दिसेल.
कंबर पट्टा –
कंबर पट्टा घातल्यामुळे गौरीला नेसवलेली साडी अधिक सुंदर दिसेल आणि व्यवस्थित राहील. आजकाल मोत्याचे, सोनेरी रंगाचे इमिटेशन ज्वैलरी प्रकारातील अनेक कंबरपट्टे बाजारात सहज मिळतात. गौरीच्या इतर दागिन्यांशी मिळती जुळती असलेली डिझाईन गौरीच्या दागिन्यांसाठी निवडा.
गौरीला तुम्ही खास सोन्याचे दागिने घालू शकता. सोन्यावर मोती जडवलेले दागिनेही गौरींवर सुबक दिसतील. मात्र खर्च आणि सुरक्षेच्या दृष्टीने बाजारात मिळणारे इमिटेशन ज्वैलरी गौरी गणपतीच्या सजावटीसाठी वापरणे सोयीचे ठरेल. गौरींप्रमाणेच गणपतीसाठीही अनेक प्रकारचे दागिने आणि सजावटीच्या गोष्टी बाजारात मिळतात. ज्यामध्ये मुकूट, सोनेरी रंगाच्या दुर्वांचा हार, मोदकाचा हार, भिगबाळी, मोदकांचे प्रकार, मुषकांचे प्रकार, जास्वंदीचे फुले आणि हार, सोन्याची सोंड, त्रिशुळ, विड्याची पाने आणि सुपारी असे प्रकार असतात.
फोटोसौजन्य – इन्साग्राम
अधिक वाचा –
गौरीपुजनात नववधूंसाठी का महत्त्वाचा असतो ‘ओवसा’
घरात येणाऱ्या उभ्या गौरींना साडी नेसवायची पद्धत तुम्हाला माहीत आहे का
#MemoriesOfYourBappa: कोकणातील गणेशोत्सवाच्या आठवणी