बॉलीवूड होळी म्हणताच डोळ्यासमोर येतात ते विविध रंगांचे डोंगर, शुभ्र पांढऱ्या कपड्यातले हिरो-हिरोईन, खास होळीच्या पदार्थांची जय्यत तयारी, होळीच्या शुभेच्छा देणारे आणि भरपूर रंगाची उधळण नाही का? आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतंच होळी आणि रंगपंचमी असावी तर अशी. आपल्याला ही काही क्षणांसाठी अशा होळीची नक्कीच भुरळ पडते. पण मला सांगा खऱ्याखुऱ्या आयुष्यात तुम्ही अशी होळी किंवा रंगपंचमी कधी खेळला आहात का?
वर्षभर वाट पाहिल्यानंतर रंगाचा आनंदोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळी आणि रंगपंचमीचा हा सण देशभरात विविध पद्धतींनी साजरा केला जातो. मग ती लठमार होळी असो वा कोकणातला शिमगोत्सव असो. पण बॉलीवूड आणि होळी यांचं समीकरणच वेगळ आहे. बॉलीवूड होळीसाठी वेगळा चाहता वर्ग आहे, असं म्हटलं तर हरकत नाही. उगाच नाही बॉलीवूडने होळीसाठी एक से एक गाणी दिली आहेत. मग ते रंग बरसे असो वा काही वर्षांपूर्वी हिट ठरलेलं लेट्स प्ले होली हे गाणं असो. मराठी चित्रपटातही होळी आणि रंगपंचमीची गाणी आहेत. पण त्या गाण्यांना बॉलीवूड एवढं ग्लॅमर मात्र नक्कीच नाही.
रील होळीची जादू
जेव्हा एखाद्या बॉलीवूडपटात किंवा अगदी हिंदी मालिकेतसुद्धा होळीचा सण दाखवायचा असतो तेव्हा अगदी जय्यत तयारी करून हे सेलिब्रेशन केलेलं दाखवलं जातं. पण तुम्हाला खऱ्या आयुष्यात रंगपंचमीची माहिती असते का? शुभ्र पांढऱ्या कपड्यातले हिरो-हिरोईन आणि त्यांचे कुटुंबिय व मित्रपरिवार तर हवेतच ना. जे अगदी खास या सणासाठी पांढरे आणि डिझाईनर कपडे परिधान करून सज्ज झालेले दिसतात. मग त्यांची जंगी होली सेलिब्रेशन्स असतात. भरपूर पदार्थांची रेलचेल, जिलेबीचा घाट आणि भांग स्पेशल स्टॉल असो. सगळं कसं अगदी ग्रँड असतं. एवढचं नाहीतर मध्यंतरी एका चॅनलकडूनही खास सेलिब्रिटींसाठी होळीचं आयोजन करण्यात येत होतं. ज्याचं खास टेलिकास्टही करण्यात येत असे. मग एक से एक तयार होऊन आलेल्या सेलिब्रिटीच्या मुलाखती, सेलिब्रिटी होळीमधली धामधूम आणि एंटरमेंटच्या तडक्याने धन्य होणारे प्रेक्षक हे आलेच. मराठी सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. दरवर्षी मुंबईत मराठी सेलिब्रिटीही एकत्र येऊन होळी आणि रंगपंचमीचा आस्वाद घेतात. पण या सेलिब्रेशनमध्ये काही अगदी ते पांढऱ्या कपड्यात दिसतात असं नाही. आजकाल तर आपण रंगपंचमीच्या शुभेच्छा ऑनलाईन देऊनही मोकळे होतो.
होळीचा रिएलिटी चेक
Unsplash
दुसरीकडे रिअल लाईफमध्ये मात्र होळीसाठी तयार व्हायचं म्हणजे जुने कपडे घालायचे. हो.. नवीन कपडे घातले तर रंगांचे डाग नाही का पडणार त्यावर? उगाच होळी झाल्यावर आईकडून ओरडा कोण खाणार? केसांना आणि हाता-पायाला अगदी पहलवानासारखं तेल चोपडायचं. एकूण काय तर रंगापासून बचाावासाठी जय्यत तयारी करणे. रंगात रंगलेले सेलिब्रिटी जरी सुंदर दिसत असले तरी आपल्यासारख्या सामान्यांचे तर रंगाने रंगल्यावर साधे चेहरेही ओळखता येत नाहीत आणि रंग लागल्यावर पुढचा एक आठवडा तरी तो चेहऱ्यावर खुणा ठेवून जातोच. असो एकेकाळी होळी आणि रंगपंचमीचं मेन टार्गेट म्हणजे दुसऱ्यांना जास्तीत जास्त पाण्याचे फुगे मारणे आणि स्वतःचा मात्र बचाव करणे असंही असायचं. यासाठी भरपूर पाणी भरलेले फुगे स्टॉक करून ठेवणे वगैरे आलंच. येताजाता गच्चीत लपून पब्लिकला फुगे मारून हैराण करणं हेही आलंच. मित्रपरिवारात होळी खेळायला गेलं तर होळीच्या राखेत लोळवणंही आलंच
मिलेनियल्सची होळी
Canva
आताच्या मिलेनियल्सच्या होळीची कल्पनाही थो़डीशी बॉलीवूड स्टाईलच झाली आहे. ऑफिसमधली होळी पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी मस्त तयार होऊन जायचं. इको-फ्रेंडली रंगांनी थोडीफार रंगारंग होळी खेळायची. मस्त फ्री ब्रंच किंवा लंच खायचा. भरपूर सेल्फी आणि फोटो काढायचे आणि सोशल मीडियावर टाकायचे. यंदा कोरोनामुळे हे सगळंही व्हर्च्युअल होणार आहे. सध्याच्या बच्चेमंडळींची होळी म्हणजे काय तर नवीन पिचकारी गन विकत घ्यायची. मित्रमंडळींसोबत थोडीफार रंगपंचमी खेळायची आणि परत यायचं. आता ना पूर्वीसारखे रंग राहिले ना पाण्याने साजरी होणारी रंगपंचमी राहली. कारण रंग ईकोफ्रेंडली झाले आणि पाणी बचावच्या मोहिमेने पाण्याच्या वापरावरही बंधन आलंय. असो काळाबरोबर सर्व बदलतच असतं. होळी आणि रंगपंचमीचंही स्वरूप बदलतंय.