बॉलीवूडचं मागील काही महिन्यापासून अतिशय नुकसान झालं आहे. आधीच लॉकडाऊन, शूटिंग बंद त्यात या काळातच बॉलीवूडमधले अनेक दिग्गज कलाकारही काळाच्या पदड्याआड गेले आहेत. अभिनेता इरफान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंह राजपूत नंतर कोरिओग्राफर सरोज खान यांच्या जाण्याने बॉलीवूडमध्ये एक पोकळीच निर्माण झाली. सरोज खान यांना बॉलीवूडमध्ये मास्टरजी या नावाने ओळखलं जात असे. मास्टरजी म्हणजेच सरोज खान यांचा बॉलीवूड प्रवास इतका रंजक आहे की त्यावर एखादा चित्रपट तयार होऊ शकतो. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी कोरिओग्राफर रेमो डिझूजाने उचलली आहे. त्यामुळे लवकरच मास्टरजी सर्वांना पुन्हा एकदा बायोपिकच्या माध्यमातून पडद्यावर दिसणार आहेत.
सरोज खान यांची शेवटची ईच्छा
रेमो डिझूजाने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे तो लॉकडाऊन पूर्वी सरोज खान यांना भेटला होता. त्याच्यामते सरोज खान स्वतः त्याच्या ऑफिसमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्याने या बायोपिकबाबत सरोजजी यांना सांगितलं होतं. सरोज खान यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची कोरिओग्राफी ‘कलंक’ चित्रपटासाठी केली होती. या चित्रपटातील ‘तबाह हो गये’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान सरोज खान, माधुरी दीक्षित आणि रेमो तासनतास एकत्र होते. तेव्हादेखील रेमोने सरोज खान यांच्या त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची कल्पना त्यांच्यासमोर मांडली होती. सरोज खान यांचे आयुष्य रेमोसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. रेमोचे बोलणे ऐकून तेव्हा सरोज खान यांनीही त्याला यासाठी मान्यता दिली होती. एवढंच नाही तर त्या तेव्हा त्याला नक्कीच, चल बोल माझ्यावर बायोपिक तू कधी करणार आहेस? अशी प्रतिक्रिया दिली होती. आता सरोजजी या जगात नाहीत. त्यामुळे हिच त्यांची शेवटची ईच्छा होती. सहाजिकच आता ही बायोपिक हे रेमोचं एक ड्रिम प्रोजेक्टच झालं आहे. मात्र रेमोने हा चित्रपट कधी करणार याबाबत अजूनही कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. सध्या लॉकडाऊननंतर बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा सर्व काही पूर्ववत होण्यास सुरूवात झालेली आहे. काही चित्रपटांच्या शूटिंगसेटवर सुरक्षेची काळजी घेत चित्रीकरण केलं जात आहे. त्यामुळे लवकरच या चित्रपटावरही काम सुरू केलं जाण्याची शक्यता आहे.
सरोज खान बॉलीवूडच्या ‘मास्टरजी’
सरोज खान यांच्या जाण्याने बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना धक्का बसला. माधुरी दीक्षित, श्रीदेवी, काजोल, शाहरूख अशा अनेक कलाकारांसाठी त्या त्यांच्या लाडक्या ‘मास्टरजी’ होत्या. वयाच्या 71 वर्षापर्यंत सरोज खान यांनी बॉलीवूडसाठी नृत्य दिग्दर्शन केलं. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यावर त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांना काही दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच अचानक त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. मात्र सरोज खान यांनी बॉलीवूडसाठी कोरिओग्राफ केलेल्या शेकडो गाण्यांमधुन त्यांच्या स्मृती नेहमीच कायम राहतील. दिग्गज कलाकार नेहमीच त्यांच्या कलाकृतीत अजरामर होतात. आता रेमो डिसूझाच्या या ड्रिम प्रोजेक्टमधून त्या सतत लोकांच्या ह्रदयात राहतील. त्यामुळे ही बायोपिक लवकर तयार व्हावी असंच सर्व चाहत्यांना वाटत आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
शिल्पा शेट्टीचा ‘हा’ निर्णय ऐकून तुम्हीदेखील व्हाल आश्चर्यचकीत
मनोज बाजपेयीचा The Family Man 2 लवकरच येणार
सुझान खानने प्रियांकाला दिल्या शुभेच्छा ‘देसी गर्ल’ ठरतेय तिच्यासाठी प्रेरणा