लग्नात मुलीच्या घरात फारच धामधूम सुरु असते. मुलीचे लग्न म्हणजे इतकी तयारी असते की विचारता सोय नाही. लग्नात अगदी नवऱ्याच्या स्वागतापासून सगळा पाहुणचार करेपर्यंत कोणालाच उसंत मिळत नाही. लग्नात मुलींच्या बाजूने खास रुखवत मांडण्यात येतो. यामध्ये सप्तपदी,अग्नी होम, बांगड्या, खाण्याचे पदार्थ, पुठ्ठ्याचा बंगला असे बरेच काही मांडले जाते. पण आता हे सगळे जुनं झालं. जुन्याहीपेक्षा या गोष्टी फारच टाकाऊ असतात. त्यांचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे बदलत्या काळानुसार रुखवत असा असावा जो नंतरही कामी येईल. शिवाय कोणालाही त्याची अडचण होणार नाही.
अघिक वाचा: लग्नासाठी थीम ठरवताना या गोष्टी घ्या विचारात
भारतात खाद्यसंस्कृती मोठी आहे. वेगवेगळे पदार्थ आणि त्यासाठी लागणारे वेगवेगळे मसाले हे प्रत्येक घरात असतात. रुखवत मांडताना तुम्ही असे छान वेगवेगळे मसाले दिलेत तर त्याचा उपयोग देखील पुढे जाऊन होऊ शकतो. रुखवतासाठी तुम्हाला खास डबे घेता येईल. त्यामध्ये वेगवेगळे मसाले छान रचून ठेवले तर हा रुखवत खूपच युनिक आणि चांगला वाटेल.
उदा. कोल्हापुरी मसाला, मालवणी मसाला, मिसळ मसाला, पाणीपुरी मसाला, कांदा-लसूण मसाला, गोडा मसाला इ. असे वेगवेगळे मसाले तुम्ही यामध्ये घेऊ शकता. या मसाल्याचा पुढे जाऊन उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हा रुखवत तुम्ही अगदी हमखास ठेवा.
एकदम रिच असा रुखवत तुम्हाला ठेवायला असेल तर तुम्ही मस्त सुक्या मेव्याचा रुखवत ठेवू शकता. आपल्याला घरात कायम सुकामेवा लागत असतो. गोडाचे पदार्थ बनवण्यासाठी हा सुकामेवा नेहमीच कामी येतो. अशावेळी सुक्यामेव्याचा मस्त रुखवत तुम्हाला मांडता येईल. हा रुखवत वायाही जात नाही. शिवाय लग्नात आलेल्या लोकांना हा सुकामेवा आवडीने खास येतो. त्यामुळे काहीतरी वेगळं हवं असेल तर सगळे महागातले सुकेमेवे तुम्ही आणू शकता.
उदा. काजू, बदाम, पिस्ता, मनुका, हेजलनट इ.
आता लग्न म्हणजे मासे कुठे ठेवायचा असा प्रश्न खूप जणांना पडेल. पण कोळी बांधवांची किंवा समुद्रकिनारी राहणाऱ्यांच ओळख आहे तो म्हणजे मासा. आता फ्रेश मासे तुम्हाला ठेवता येणार नाही. पण सुके मासे तुम्हाला नक्कीच ठेवता येतील. काचेच्या स्वच्छ बरण्यांमध्ये जर तुम्ही असे सुके मासे आणून ठेवले तर ते पाहायला आलेल्या लोकांनाही आवडेल. सुक्या माशांमध्ये बोंबील, बांगडा, सुकी कर्दी, सुका जवळा असे काही पदार्थ तुम्हाला मस्त पारदर्शक डब्यांमध्ये ठेवता येतील.
उदा. गोवा किंवा मस्त समुद्र किनारी असे जर लग्न असेल तर तुम्हाला असे काही करण्यास काहीच हरकत नाही.
अधिक वाचा : लग्नासाठी अशी भिजवा हळद
घरात पाहुणे असले की, गोड गोड चॉकलेट्सला कोणीच नाही म्हणू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला छान चॉकलेट्सचा रुखवतही ठेवता येईल. वेगवेगळ्या प्रकारती वेगवेगळी चॉकलेट्स आणून तुम्ही अशाच पारदर्शक अशा बरण्यांमध्ये भरुन ठेवा. ही चॉकलेट्स वाया जाणार नाही उलट तुम्हाला ती येता जाता चघळता येईल. आता चॉकलेट्समध्ये काही तरी व्हरायटी करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये रावळगाव चॉकलेट्स, चिंचेच्या गोळ्या अशा काही मस्त हटके गोष्टी ठेवू शकता.
आता लग्नात तोच तोच टीपिकल रुखवत ठेवू नका. काहीतरी असे हटके ठेवा.