बाहेर मस्त पाऊस पडतो आहे, एखाद्या कामाला उत्साहाने सुरूवात सुरूवात करायची आहे, कामाचा थकवा अथवा मरगळ घालवायची आहे, मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारण्याची संधी हवी आहे मग एक कप चहा अथवा कॉफी सोबत हवीच. मात्र जर तुम्हाला ‘बेड टी’ अथवा ‘बेड कॉफी’ घेण्याची सवय असेल तर मात्र तुम्हाल सावध राहण्याची गरज आहे. कारण सकाळी उपाशी पोटी चहा अथवा कॉफी पिणं आरोग्यासाठी मुळीच हितकारक नाही. असं असलं तरी सकाळी उठल्यावर पटकन फ्रेश वाटावं यासाठी अनेकजण उपाशीपोटी चहा अथवा कॉफी घेतात. कधीकधी प्रातःविधी होण्यासाठीदेखील चहा अथा कॉफी घेण्याची सवय अनेकांना असते. मात्र हळूहळू या गोष्टींची तुमच्या शरीराला सवय लागते. चहा – कॉफी घेतल्याशिवाय तुम्हाला फ्रेश वाटत नाही. वास्तविक या सवयीचे तुमच्या शरीरावर घातक परिणाम होत असतात. दिवसभरात एक ते दोन कप चहा अथवा कॉफी घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र सकाळी उठल्यावर उपाशीपोटी चहा अथवा कॉफी चुकूनही घेऊ नका. कारण त्याचे भयंकर परिणाम तुम्हाला भविष्यात सहन करावे लागतील.
जाणून घ्या उपाशीपोटी चहा-कॉफी घेतल्याने नेमकं काय होतं
- उपाशीपोटी चहा घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील पित्तरस सक्रिय होतो. पित्त वाढल्यामुळे दिवसभर तुमचं डोकं दुखू शकतं अथवा तुम्हाला छातीत जळजळ जाणवू शकते.
- रिकाम्या पोटी चहा अथवा कॉफी घेतल्यामुळे त्याचा परिणाम नकळत तुमच्या आतड्यांवर होतो. ज्यामुळे तुमची पचनक्रिया मंदावते आणि भुक कमी लागते.
- चहा अथवा कॉफीमधील दुधामुळे तुमच्या आतड्यावर परिणाम होतो आणि तुमच्या पोटात अपचन, गॅस अशा समस्या निर्माण होतात.
- रात्री झोपल्यानंतर हळूहळू शरीरातील अन्नाचे पचन झालेलं असतं. सकाळी पोटात अन्न आणि पाणी कमी प्रमाणात असल्यामुळे तुम्ही मुळातच डिहायड्रेट झालेले असता. त्यात सकाळी उठल्यावर अशा रिकाम्या पोटी चहा अथवा कॉफी घेतल्यामुळे तुमचं डिहायड्रेशन अधिक वाढतं. ज्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होतो.
- सकाळी उठल्या उठल्या चहा अथवा कॉफी घेतल्यामुळे शरीरातील विषद्रव्ये अथवा टॉक्सिन्स बाहेर टाकली न जाता त्यांचे प्रमाण शरीरात अधिकच वाढतं.
- रिकाम्या पोटात कॉफीमधून घेतलेल्या कॅफेनचं प्रमाण वाढल्यामुळे तुम्हाला चक्कर येते अथवा मळमळल्यासारखं,उलटी आल्यासारखं वाटू लागतं.
- चहा अथवा कॉफीमधील साखरेमुळे तुमच्या रक्तातील साखर वाढते आणि हळूहळू तुमचे वजन अनियंत्रित होतं.
- सकाळी उठल्याबरोबर चहा -कॉफी घेण्याच्या सवयीमुळे चहा अथवा कॉफी घेतल्याशिवाय तुम्हाला कोणतेही काम करण्याचा तुम्हाला कंटाळा वाटू लागतो. ज्यामुळे तुम्ही आळशी आणि असक्रिय होता.
- उपाशीपोटी चहा अथवा कॉफी घेतल्याशिवाय प्रातःविधीला न जाण्याची सवय तुम्हाला लागते.
- सकाळी चहा अथवा कॉफी घेतल्यामुळे दिवसभर कंटाळवाणं अथवा अस्वस्थ वाटू लागतं.
- सकाळी उठल्याबरोबर चहा घेतल्यामुळे तुमच्या रात्रीच्या झोपेवर याचा परिणाम होतो आणि तुम्हाला निद्रानाशाची समस्या जडते.
- सकाळी उठल्याबरोबर दातही न घासता चहा घेणाऱ्या लोकांच्या दातांवर याचा चुकीचा परिणाम होतो. यामुळे तुमच्या दातांचे आरोग्य बिघडते आणि दंतसमस्या निर्माण होतात.
चहा आवडत असल्यास यावर उपाय काय ?
जर तुम्हाला चहा फारच आवडत असेल तर तुम्ही काही गोष्टींची दक्षता पाळायला हवी. सकाळी उठल्याबरोबर लगेचच चहा घेण्याऐवजी आधी कोमट पाणी, एखादं फळ, सुकामेवा अथवा चांगला हेल्दी नास्ता करावा. ज्यामुळे तुमच्या शरीरात रात्रभर निर्माण झालेली अॅसिडिटी कमी होईल. काहीतरी पौष्टिक पदार्थ खाल्यानंतर मग तुम्ही चहा अथवा कॉफी नक्कीच घेऊ शकता. मात्र लक्षात ठेवा दिवसभरात फक्त एक अथवा दोन कपच चहा अथवा कॉफी घ्या. शिवाय चहा घेताना शक्य असल्यास मसाला चहा घेण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे त्याचा सुपरिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागेल. चहा अथवा कॉफीमध्ये दूध आणि साखरेचे प्रमाण कमी ठेवा ज्यामुळे तुमच्या शरीरावर या गोष्टींचा दुष्पपरिणाम होणार नाही. चहा अथवा कॉफी घेण्यापेक्षा ग्रीन टी, मसाला टी, ब्लॅक कॉफी घ्या.
अधिक वाचा
तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर लक्षात ठेवा काही गोष्टी
दिवसाची सुरूवात ‘परफेक्ट’ हवी असेल तर टाळा या ‘5’ गोष्टी
तुम्हाला चहा आवडतो का, मग मसाला चहाचे हे आरोग्यदायी फायदे जरूर वाचा
सौंदर्यासाठी ब्लॅक कॉफीचे अफलातून फायदे
फोटोसौजन्य – शटरस्टॉक