तुम्हालाही कमी वेळ झोपण्याची सवय आहे का?… तर वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण निरोगी आरोग्यासाठी चांगलं खाणं-पिणं, व्यायाम, डाएट, ध्यान धारणा करणं गरजेचं आहे. तितकंच पुरेशा प्रमाणात झोपणं देखील महत्त्वाचं आहे. अपुऱ्या झोपेमुळे शरीराचं कोणतंही नुकसान होत नाही,असं वाटत असेल तर तुम्ही मोठ्या गैरसमजुतीत जगत आहात. कारण थकलेल्या शरीराला जर तुम्ही आराम दिला नाही तर मोठ-मोठ्या आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कित्येकांना झोप न येण्याचा (Sleeping Disorder) आजार असतो. यासाठी लोक झोपेच्या गोळ्यांचा आधार घेतात. अपुऱ्या झोपेचे शरीरावर होणारे दुष्परिणाम जाणून घेतल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कमी वेळ झोपल्यानं त्वचेसहीत मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. याशिवाय अंग दुखी, थकवा,वजन वाढणं आणि तणावासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
आठ तासांची झोप आवश्यक
दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्री कमीत कमी आठ तास झोपणं आवश्यक आहे. पण धावपळ आणि बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच जणांना सहा तास देखील झोप घेणं शक्य नसतं. दिवसभर उत्साही राहण्यासाठी, ताजेतवाने वाटण्यासाठी, चेहरा निस्तेज न दिसण्यासाठी रात्रीची पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack), हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure), रक्तातील साखर वाढणं, चिडचिड, नैराश्य येणं, हदयाचा ठोक्यांमध्ये अनियमितता, मधुमेह यांसारखे गंभीर आजार होतात. अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यावर होणारे घातक परिणाम जाणून घेऊया.
(वाचा : कमोडवर बसून मोबाईल वापरणाऱ्यांनी वेळीच व्हा सावधान)
1. अपुऱ्या झोपेमुळे स्मरणशक्ती कमी होते
ज्यांना कमी वेळ झोपण्याची सवय असते किंवा ज्यांची झोप पूर्ण होत नाही, त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होण्याची अधिक भीती असते. गरजेनुसार झोप न घेतल्यानं मेंदूमध्ये एक प्रोटीन तयार होतं, ज्यामुळे स्मरणशक्तीवर विपरित परिणाम होतो. एकाग्रता, समस्या सोडवण्याची क्षमता कमी होऊ लागते.
वाचा – स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार
2. मधुमेहाचा धोका
पुरेशी झोप न आल्याने साखरयुक्त आणि जंक फूड खाण्याची तीव्र इच्छा वाढते. हे आपल्या आहारासह उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या रोगांना आमंत्रित करते. तसेच कार्य लक्षात येत नाही. यामुळे कामाची गतीही कमी होते.
3. लैंगिक क्षमतेवरही परिणाम
टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे महिला आणि पुरुषांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा निर्माण होते. योग्य झोप घेतल्यास शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. पण अपुऱ्या झोपेमुळे लैंगिक क्षमतेवरही दुष्परिणाम होतो. शरीरात ताण आणि आळस असल्यामुळे सेक्ससाठीचा उत्साह निघून जातो.
4. कॅन्सरचा धोका
अपऱ्या झोपेमुळे ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कॅन्सर) होण्याचा धोका अधिक असतो. सोबतच शरीरातील पेशींचंही नुकसान होतं. कमी झोपेमुळे दृष्टीवर देखील परिणाम होतो.
5. हृदयविकाराचा झटका
पूर्ण झोप झाल्यानंतर आपल्या शरीरातील अंतर्गत अवयवांचं आरोग्य टिकून राहण्यास मदत होते. पुरेशा झोपेमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. पण जर आवश्यकतेनुसार झोपतच नसाल तर शरीरात विषारी पदार्थ बाहेर फेकले जात नाहीत. यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. परिमाणी हृदयविकाराचा झटका येण्याचा शक्यता असते.
6. हाडे कमकुवत होतात
अपुऱ्या झोपेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. शिवाय, हाडांमधील मिनरल्सचं संतुलनदेखील बिघडते. यामुळे गुघडे दुखीची समस्या निर्माण होते.
7. मानसिक आरोग्यावर होतो परिणाम
कमी झोपण्याचा परिणाम थेट आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. पूर्ण झोप झाल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. पण अपुऱ्या झोपेमुळे मेंदूच्या कार्यपद्धतीवर परिणाम होतो. ज्यामुळे अनेक मानसिक आजार होण्याची भीती असते.
उपाय : पूर्ण झोप घेण्यासाठी रात्री होणारे जागरण कटाक्षानं टाळावं. रात्री झोपण्याची वेळ निश्चित करावी. मोबाइल झोपण्याच्या जागेपासून शक्य तेवढे दूरवर ठेवावा. मन शांत ठेवण्यासाठी योगासने, ध्यान धारणा करावी. शारीरिक आणि मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पुरेशी झोप घ्यावी.
You Might Like This:
निरोगी आरोग्याचं रहस्य, सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ