प्रत्येकालाच आयुष्यात प्रेम हवं असतं. प्रत्येकाच्या प्रेमाच्या संकल्पनाही वेगळ्या असतात. पण काही प्रमाणात एकमेकांशी जुळतील अशाच असतात. कदाचित सर्वात जास्त कपल फेब्रुवारी महिन्यातच आपल्या प्रेमाची कबुली देत असतात. पण खरं तर प्रेम करणं अर्थात प्रेमात पडणं खूप सोपं आहे. पण प्रेम केल्यानंतर एकमेकांना प्रपोज केल्यानंतर ते नातं टिकवून ठेवणं आणि त्या नात्याची काळजी घेणं खूपच कठीण आहे. प्रेमामध्ये पैशापेक्षा किंवा कोणत्याही गिफ्ट्सपेक्षा सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे एकमेकांंना समजून घेऊन ‘वेळ’ देणे. सर्वात जास्त ब्रेकअप तर वेळ न दिल्यामुळे होत असतात याची जाणीव तुम्हाला आहे का? नसेल तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आधीच प्रेमाच्या आणाभाका घेतल्या असतील तर ते टिकवून ठेवण्यासाठी आणि जर तुम्ही यावेळी आपलं प्रेम व्यक्त करणार असाल तर तुम्हाला पुढे कोणकोणत्या गोष्टीला सामोरं जायचं आहे हे समजून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा. वास्तविक प्रेमात एकमेकांना काही प्रमाणात गृहीत धरणं योग्य आहे. प्रेम म्हटलं की अपेक्षा आल्याच. कारण कोणत्याही दोन व्यक्ती सतत त्याग करून आणि अपेक्षा न ठेवता एकत्र राहू शकत नाही. अशा गोष्टी केवळ चित्रपटांमध्ये घडत असतात. पण खऱ्या आयुष्यात तुम्हाला हे नातं टिकवायचं असेल तर काही गोष्टी आपल्या जोडीदारासाठी करणं हे ओघाने आलंच.
प्रेम म्हणजे नक्की काय?
बऱ्याचदा नकळत्या वयात चित्रपट पाहून एक स्वप्नवत जग तयार होतं आणि चित्रपटाप्रमाणेच आपली प्रेयसी वा प्रियकर असावा असं बऱ्याच जणांना वाटत असतं. पण त्याला प्रेम नाही तर अट्रॅक्शन म्हणतात. अर्थात हे सर्वांच्या बाबतीत होत नाही. बरेच जण मनापासून प्रेम करून ते अगदी शाळेपासून असलं तरीही लग्नापर्यंत नेतात आणि सुखाने संसारही करतात. पण स्वप्नात जगणं म्हणजे प्रेम नाही. प्रेम म्हणजे काळजी. प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं. एकमेकांच्या गुणदोषासह स्वीकारणं. असं असल्यानंतर अपेक्षा आल्याच आणि अपेक्षा आल्या म्हणजे त्या पूर्ण न झाल्यामुळे होणारी भांडणही आलीच. पण त्यासाठी आपल्या जोडीदाराला सतत गृहीत धरणं कितपत योग्य आहे? हा प्रश्न तुम्हाला कधी जाणवतो का? खरं तर आपणच बरोबर आणि आपला जोडीदार चुकत आहे असं मनात ठेवलं तर नातं कधीच टिकणार नाही. पण आपण किंवा आपला जोडीदार सतत गृहीत धरत असेल तर असं करणं कितपत योग्य आहे?
गृहीत धरणं म्हणजे नक्की काय?
प्रेमाच्या सुरुवातील सर्व काही लव्हीडव्ही असतं. तुम्ही जे म्हणाल ते शब्द झेलण्यासाठी तुम्ही दोघंही तयार असता. मग वर्ष निघून जाताना या छोट्या छोट्या गोष्टी आणि आनंद तुम्ही तुमच्या आयुष्यातून का काढून टाकता? सुरुवातीला तुम्हाला एकमेकांना जिंकून घ्यायचं असतं म्हणून तुम्ही कोणत्याही परिस्थितून वेळ काढून भेटत असता. मग नातं टिकवतानादेखील ही गोष्ट नंतर करणं महत्त्वाचं नाही का? वेळ दिला नाही तर तो किंवा ती समजून घेईल हे सर्वात मोठं गृहीत धरणं असतं. इथूनच सुरुवात होते ती एकमेकांना न समजून घेण्याची. दोघांमधली सामंजस्य का संपत? कुठे निघून जातात एकमेकांना समजून घ्यायचे विचार? परिस्थिती कशीही असो एकमेकांची काळजी घेणं हा प्रेमातील सर्वात महत्त्वाचा भाग. मग अगदी सकाळी उठून गुड मॉर्निंग हा साधा मेसेज करून २ मिनिटं चॅट करणं असो वा दिवसभरातून कामातून वेळ काढून तू काही खाल्लंस का किंवा तू कुठे आहेस, कशी आहेस वा काय करतेस हे विचारणं असो. अगदी इतकंही जमत नसेल तर निदान तिला वा त्याला अपेक्षा असते ती केवळ आपल्याशी बोलण्याची. तेदेखील समोरचा समजून घेईल आपण कामात आहोत हे मनात ठेवून गृहीत धरणं खूपच चुकीचं आहे.
स्वभाव भिन्न पण समजण्याची ताकद हवी
प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. बघायला गेलं तर जोड्या अशाच असतात ज्या भिन्न स्वभावाच्या असतात. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्याची ताकद हवी. पण समोरचा एकच व्यक्ती समजून घेत असेल सतत तर ते नातं फार काळ टिकणं शक्य नाही. मुलं आणि मुली दोघांनाही हे गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बऱ्याचदा मुलींच्या बाबतीत हे जास्त घडताना दिसतं. मुलांच्या बाबतीत घडत नाही असं नाही. पण मुली प्रचंड प्रमाणात प्रेमात असताना मुलांची काळजी घेतात. त्यांना दिवसभरातून कितीतरी मेसेज करणं, ते कुठे आहेत, काय करत आहेत, जेवले की नाही हे सर्व प्रश्न काळजीपोटी विचारले जातात. ते कोणत्याही संंशयापोटी नसतात. पण त्या मेसेजचे रिप्लाय देण्याइतका अगदी 30 सेकंदाचाही वेळ नसावा हे नक्कीच योग्य नाही. माणूस कितीही कामात असला तरीही त्याला या गोष्टींना रिप्लाय देण्याइतका वेळ असतोच आणि अगदी नसेलच तर तो वेळ काढावा लागतो. तो किंवा ती समजून घेईल हे गृहीत धरणं काही काळापर्यंत नक्कीच तुमच्या नात्यामध्ये काम करू शकतं. पण काही वर्ष गेल्यानंतर हेच तुमच्या नात्यातील भांडणाचं मोठं कारण ठरू शकतं. कारण ज्या व्यक्तीला साधा मेसेज करून बोलायला वा रिप्लाय करायलाही वेळ नाही. त्या माणसावर आपण प्रेम केलं का असे प्रश्न पडायला सुरुवात होते. त्याचवेळी आजूबाजूला एकमेकांची काळजी घेणारे आपल्याला जास्त दिसायला आणि जाणवायला लागतात आणि मग अजून त्रास व्हायला लागतो. त्यामुळे स्वभाव भिन्न असला तरीही नक्की आपल्या जोडीदाराला काय हवं आणि तो आपल्यासाठी जर दहा गोष्टी करत असेल तर आपणही त्याच्यासाठी किमान दिवसातून दोन मेसेज किंवा बोलणं हे तर नक्कीच करू शकतो. इतकं गृहीत धरणं नक्कीच योग्य नाही.
इतर गोष्टींसाठी वेळ असणं पण तुमच्यासाठी नसणं
वेळ हा मुद्दा प्रेमामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो हे तुम्हाला प्रत्येकालाच माहीत आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला वेळ देत नसेल आणि या गोष्टी तुम्ही सतत समजून घ्याव्या असं त्याला वाटत असेल तर त्याचं हे गृहीत धरणं नक्कीच चुकीचं आहे. कारण त्याला त्याच्या कामासाठी वेळ असतो. तो ज्या घरात राहात आहे, त्या व्यक्तींसाठी कितीही कामातून त्याला वेळ काढता येत असतो कारण त्याला घरात भांडण नको असतं. पण तुम्ही त्याला समजून घेता म्हणून सतत तुम्हाला कारण देत तुम्हाला वेळ न देणं हे कधीही योग्य नाही. नात्यात वेळ देणं आणि एकमेकांसोबत वेळ घालवणं खूप जास्त गरजेचं असतं कारण हेच क्षण असतात जे तुम्हाला अधिक जवळ आणतात. तुमच्या समोर तुमचा जोडीदार इतर गोष्टींसाठी वेळ काढताना दिसत आहे. पण तुम्ही विचारल्यानंतर जर त्याच्याकडे शंभर कारणं असतील तर तुम्ही त्याच्यापासून दूर जाण्याची वेळ आली आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. कारण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला सतत गृहीत धरून कारणं देणं हे कोणत्याही नात्यात योग्य नाही. मुलगा असो वा मुलगी जर अशा तऱ्हेने गृहीत धरायला लागले असतील तर अशा व्यक्तींबरोबर आपण आपलं आयुष्य व्यतीत न करणंच चांगलं.
पैसे आणि गिफ्टपेक्षाही प्रशंसा महत्त्वाची
कोणत्याही प्रेमाच्या नात्यात पैशाची नाही तर गिफ्ट्सची अपेक्षा असते. पण ती प्रत्येक वेळी नसते. तो किंवा ती तुम्ही आयुष्यात येण्याने आनंदी असतात. तुम्हाला काय आवडेल यासाठी कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे, तुमच्या दृष्टीने किती सुंदर दिसता येईल याचा प्रयत्न केला जातो. त्यावेळी पैसे आणि गिफ्टपेक्षाही प्रशंसा अधिक महत्त्वाची असते. तुमचा जोडीदार कितीही सुंदर असो, त्याची तारीफ पूर्ण जग करत असेल तरी त्याच्यासाठी तुमच्या तोंडून आलेलं कौतुक आणि प्रशंसा जास्त महत्त्वाची आहे. तो किंवा ती सुंदर आहे तर नेहमीच काय सांगायचं हे तर गृहीतच आहे असं तुम्ही मनात ठेवून जर वागलात तर ते तुमच्यासाठी जास्त नुकसानीचं आहे. काही काळापर्यंत हे समोरच्या व्यक्तीकडून सहन केलं जाऊ शकतं. पण कधीच तुमच्या तोंडून त्याची वा तिची प्रशंसा होत नसेल तर त्या व्यक्तीलाही स्वतःचा अपमान होतोय हे वाटणं साहजिक आहे. त्यामुळे आपला जोडीदार इतर कोणाासाठी नाही तर आपल्यासाठी तयार होतो हे आधी समजून घ्या. त्याला अशा बाबतीत गृहीत धरू नका आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रशंसा, कौतुक आणि प्रेम व्यक्त करा. गृहीत धरण्याने केवळ भांडणं होणार आणि सततच्या भांडणाने विभक्त व्हायची वेळ येईल हे लक्षात ठेवा.
आदर ठेवणं गरेजेचं
प्रेमाच्या नात्यातही आदर ठेवणं गरजेचं आहे. आपला जोडीदार आपल्या प्रत्येक मताचा आदर ठेवत असेल. पण आपण जर त्याचा आदर ठेवतच नसू तर त्याचं हे असं गृहीत धरणं खूपच अपमानास्पद आहे. आपला जोडीदार आपण म्हटलेली प्रत्येक गोष्ट करायला तयार असतो. पण जर आपण त्याची एकही गोष्ट ऐकली नाही तर कसं वाटेल त्याला? याचा विचारदेखील व्हायला हवा. सतत आपण कामात आहोत, मग नंतर बोलूया, नंतर करतो हे बोलणं चुकीचं आहे. कारण ज्याप्रमाणे आपला जोडीदार कामात असतो तसंच आपणही कामात असूनही त्याची काळजी घेत असतो हे त्याने लक्षात घ्यायला हवे. जोडीदाराच्या जागी एकदा स्वतःला ठेवून अशावेळी विचार करून नक्की पाहा. अगदी त्याने किंवा तिने भावना व्यक्त केल्यानंतर त्यावर योग्य प्रतिक्रिया द्यायला शिका. भरभरून समोरची व्यक्त जर तुमच्याविषयीच्या प्रेमाविषयी बोलत असेल तर तिला चुकीचं उत्तर देऊन नाराज करू नका.
उदाहरणार्थ – तुमची जोडीदार तुमच्याबद्दल वाटणाऱ्या प्रेमाविषयी भरभरून बोलत आहे किंवा तिने तुम्हाला एखादा रोमँटिक मेसेज लिहून पाठवला आणि विचारलं तुला काय वाटतं? त्यावर ‘मला आता झोप येत आहे’ किंवा ‘मी कामात आहे नंतर बोलू’ अशा तऱ्हेचा रिप्लाय देणं हा तिच्या भावनांचा आणि प्रेमाचाही अपमान आहे याचा विचार करा. कारण जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेने वागाल आणि तिने अशा तऱ्हेने रिप्लाय दिला तर तुम्हाला नक्की काय वाटेल याचाही विचार करा.
दिवसभरात काही मिनिटांसाठी बोलतानाही फोन होल्डवर ठेवणं
बऱ्याचदा कामातून भेटण्यासाठी वेळ मिळत नसतो. पण निदान दिवसातील जी काही दहा मिनिटं बोलण्याची असतात ती तुमची असतात. त्यावेळी आपल्या जोडीदाराला गृहीत धरून फोन होल्डवर ठेवणं नक्कीच योग्य नाही. समोरची व्यक्ती दिवसभर तुमच्या फोनची आतुरतेने वाट पाहत असते. दिवसभरातील थकवा केवळ तुमच्या आवाजामुळे नाहीसा होत असतो याची जाणीव तुम्हाला असायला हवी. असं असताना दिवसभरातील मिळणाऱ्या दहा मिनिटांमध्येही आपल्या जवळच्या व्यक्तीला गृहीत धरून होल्डवर ठेवणं योग्य नाही. याचा अर्थ तुमच्यासाठी तिचं प्रेम आणि काळजी महत्त्वाची नाही तर कितीही कामाचे असलेले फोन जास्त महत्त्वाचे असतात असा त्या व्यक्तीचा समज होतो आणि तसं होणं साहजिक आहे. त्यामुळे तुम्ही सतत प्रत्येक गोष्टीमध्ये गृहीत धरता हे जोडीदाराच्या मनात पक्क होतं आणि त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर व्हायला लागतो. इतकंच नाही अगदी फिरायला गेल्यानंतरही तुम्ही केवळ शरीराने जोडीदाराबरोबर असता बाकी तुमचं लक्ष कामात आणि फोनवर लागून राहिलं असेल तर त्या जोडीदाराच्या मनाची अवस्था काय असेल याचाही एकदा विचार करून बघा.
प्रेमाच्या नात्यात भांडण आणि कुरबुरी आल्याच. पण सतत जोडीदाराला गृहीत धरणं योग्य आहे की नाही हे तुम्ही स्वतः ठरवलेलं जास्त चांगलं. तरीही गृहीत धरणं कसं योग्य नाही हे आम्ही तुम्हाला सांगितलं आहेच. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या नात्यामध्ये या प्रकारे वागत असाल तर वेळीच सुधारणा करा आणि आपल्या जोडीदाराला गृहीत धरणं सोडून द्या. तरच तुमचं नातं चांगल्या प्रकारे टिकू शकतं.
फोटो सौजन्य – Instagram, Giphy
हेदेखील वाचा
तुमचा बेस्टफ्रेंडच होऊ शकतो तुमचा बॉयफ्रेंड…कसं ओळखायचं?
प्रेम करता? घरी सांगायचय? तुमच्यासाठी खास टीप्स
बॉयफ्रेंडला प्रपोज करण्याचे ‘हे’ हटके प्रकार तुम्ही पाहिलेत का