नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण यामध्ये आपण वेगवेगळ्या पदार्थांचे कॉम्बिनेशन करत असतो. म्हणजे नाश्त्याला पोहे, उपमा,शीरा… दुपारच्या जेवणाला भाजी-पोळी, वरण- भात आणि रात्रीच्या जेवणाला पोळी भाजी किंवा वरण भात असा सर्वसाधारणपणे आपण आहार घेतो. पण या आहारातही आपण पदार्थांचे असे काही कॉम्बिनेशन करतो की, ते आरोग्यासाठी घातक ठरु शकतात.आयुर्वेदशास्त्राने अशा काही पदार्थांचे कॉम्बिनेशन सांगितले आहे जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. तुम्ही तर पदार्थांचे असे कॉम्बिनेशन करत तर नाही ना?
सकाळचा नाश्ता स्किप करताय मग तुमचे आरोग्य आहे धोक्यात
दूध आणि फळे
एक ग्लास दूध आणि कोणतेही फळ सकाळी नाश्ताला खाण्याची सवय अनेकांना असते. पण आयुर्वेदानुसार ही सवय चांगली नाही. कारण दूध आणि फळे एकत्र खाल्यानंतर पचनक्रिया मंदावते. कारण दूध पचायला कठीण असते. त्यावर फळे खाल्यास अपचनाचा त्रास अधिक होऊ शकतो. त्यामुळे दुधासोबत कोणतेही फळ खाऊ नये.
उदा. केळ्याचे शिकरण … अनेकांना केळ्याचे शिकरण पोटभरीचे वाटते. म्हणून ते खातात पण हे कॉम्बिनेशन तर अजिबात चांगले नाही. दोन्ही गोष्टी पचायला कठीण असतात.
दूध आणि मांस
दूध आणि मांस हे असे कॉम्बिनेशनसुद्धा आरोग्यासाठी घातक असू शकते. पूर्वी घरात नॉनव्हेजचा बेत असेल तर त्या संपूर्ण दिवसात दूध किंवा दूग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश केला जात नव्हता. पण आता मटण किंवा चिकन मॅरिनेट करण्यासाठी दह्याचा वापर केला जातो. पण दूध आणि दूग्धजन्य पदार्थाचे गुणधर्म तुमचे शरीर थंड करणे असते. तर मासे,चिकन, मटण तुमच्या शरीरात उष्णता निर्माण करतात. त्यामुळे नॉनव्हेज खाल्यानंतर दूध पिऊ नये.
चहाच्या चाहत्यांनी लक्षात ठेवाव्यात या गोष्टी
दही आणि फळे
ज्याप्रमाणे दुधासोबत फळे खाल्ली तर ती पचण्यास कठीण जातात. अगदी त्याचप्रमाणे दह्यासोबत फळांचे सेवन करणेही चुकीचे आहे. हल्ली बरीच जण दह्यात फळांचे तुकडे,साखर असे घालून खातात. पण ते आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे कोणत्याही दुग्धजन्य पदार्थांसोबत त्याचे सेवन करु नये.
जेवणानंतर कोल्डड्रिंक किंवा आईस्क्रिम
हल्ली जंकफूड खाणाऱ्यांना मिलसोबत कोल्डड्रिंक पिण्याची सवय लागली आहे. शिवाय जेवणानंतर ते जेवण पचण्यासाठी अनेकांना कोल्डड्रिंक पिण्याची सवय असते. ही सवय वेळीच बदला कारण आयुर्वेदानुसार ही सवय अत्यंत वाईट आहे. थंड पदार्थ खाल्ल्याने तुमची पचनक्रिया मंदावते. आईस्क्रिम आणि दह्याच्या बाबतीतही लागू आहे. जेवणापूर्वी आणि जेवणानंतर या दोन्ही गोष्टी खाणे चांगले नाही. दह्याबाबत सांगायचे झाले तर दही मोडून खाल्यास चालू शकते. म्हणजे जेवणानंतर जिरवणी म्हणून एक ग्लास ताक प्यायल्यास चालेल.
वजन कमी करण्यासोबतच अनेक आजारांवर टोमॅटो लय भारी
तूप आणि मध
तूप आणि मध या दोघांचे गुणधर्म वेगळे आहेत. एक थंड तर दुसरा पदार्थ उष्ण आहे. तूप आणि मध एकत्र खाल्ले तर तुमचे स्वास्थ्य बिघडू शकते. त्यामुळे हे एकत्र खाता कामा नये. आता तूप आणि मध एकत्र खाण्याचे म्हणाल तर पंचामृतात हे दोन्ही पदार्थ असले दही, दूध, साखर घातले जाते. त्यामुळे त्याचा त्रास होत नाही.