भारत आणि इतर अनेक देशांमध्ये कृष्णजन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भारतीयांसाठी जन्माष्टमी हा तर एक मोठा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. कृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान कृष्णाचा जन्मदिवस. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. भारतात गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका आणि पुरी येथे हा सणाला फार महत्त्व आहे.
श्रावणातील महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर कृष्णाचा जन्म झाला. महाराष्ट्रात ज्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते. त्या दिवशी उत्तरेकडे मात्र भाद्रपद वद्य अष्टमी असते. कृष्ण जन्माची कहाणी अशी सांगितली जाते की, कृष्णाचा मामा कंस याने देवकीचा पूत्र तुझा वध करेल ही आकाशवाणी ऐकून कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव यांना कैदेत ठेवलं होतं. देवकी गरोदर झाल्यावर प्रत्येकवेळी तिला नजरकैदेत ठेवलं जात असे. तिच्या प्रत्येक अपत्याला कंस स्वतःच्या हाताने ठार करत असे. कंसाने देवकी आणि वसुदेवाची सात अपत्ये ठार केली होती. म्हणूनच देवकीचे आठवे अपत्य कृष्णाला जन्मानंतर लगेचच वसुदेवाने गोकुळातील नंद आणि यशोदा यांच्याकडे त्याला सुपूर्त केलं होतं. भारतात कृष्ण जन्माष्टमीला ही कृष्णजन्माची कथा मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते.
यावर्षी 23 ऑगस्ट 2019 ला भारतात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. तर 24 ऑगस्ट 2019 ला गोपाळकाला म्हणजेच दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
महाभारत हा ग्रंथ भारतातील एक प्राचीन आणि धार्मिक ग्रंथ आहे. महर्षी व्यासांनी या ग्रंथाची निर्मिती केली. महाभारत ही पांडव आणि कौरवांच्या महायुद्धाची कथा आहे. महाभारतामध्ये कृष्णाचे कार्य महत्त्वाचे आहे. कारण कृष्णाने अर्जुनाला योग्य वेळी अचूक उपदेश केल्यामुळेच पांडव महाभारतातील धर्मयुद्ध जिंकू शकले.
कृष्णाचे त्यांच्या जवळील प्रत्येकासोबत एक विलक्षण नातं होतं. तो कुणाचा पुत्र, कुणाचा मित्र, कुणाचा सखा, कुणाचा गुरू तर कुणाचा भाऊ होता. मात्र या प्रत्येक नात्यात अद्भूत रहस्य दडलं होतं. महाभारतात कृष्णावर प्रेम करणारी अशी अनेक होती नाती आजही अजरामर आहे. कृष्णभक्तीची ही महान उहाहरणे जरूर जाणून घ्या.
कृष्ण हा देवकी आणि वसुदेवाचा मुलगा होता. मात्र कंसांच्या भितीने देवकी आणि वसुदेवाने कृष्ण जन्मानंतर लगेचच त्याला गोकुळात यशोदा आणि नंदाकडे सुपूर्त केलं होतं. त्यामुळे देवकीला तिच्या बाळाला त्याच्या जन्मापासूनच स्वतःपासून वेगळं ठेवावं लागलं. एखाद्या मातेसाठी तिचं बाळ हे सर्वात महत्त्वाचं असतं. बाळाला जन्मापासून स्वतःपासून वेगळं करणं हे नक्कीच देवकीसाठी त्रासदायक ठरलं असणार. मात्र देवकीने कृष्णाच्या प्रेमापोटी तिने हा त्याग सहन केला होता.
कंसाच्या भितीपोटी वसूदेवाने कृष्णाला यशोदा आणि वसुदेवाकडे सुपूर्त केलं होतं. यशोदाने कृष्णाला गोकुळमध्ये लहानाचं मोठं केलं होतं. यशोदाला कृष्ण तिचे अपत्य नाही हे माहीत असूनही तिने त्याच्या वर स्वतःच्या मुलाप्रमाणेच प्रेम केलं आणि त्याला चांगले संस्कार दिले. महाभारतातमध्ये कृष्ण आणि यशोदेच्या अनेक कथा आहेत. ज्यामधून तिच्या वात्सल्याचे दाखले मिळतात. या उदाहरणामुळे जन्मदात्या मातेप्रमाणेच संगोपन करणारी मातादेखील मुलांसाठी तितकीच महत्त्वाची आहे हे दिसून येतं. ज्यांना स्वतःची मुलं नाहीत त्या महिला इतरांच्या मुलांवर तितकंच प्रेम करू शकतात याचा हा एक उत्तम दाखला आहे.
भगवान कृष्णाचे नाव घेतलं की राधेचा उल्लेख हा आपोआपच होतोच. इतकं राधाकृष्णाचं नातं एकरूप झालेलं होतं. राधा ही कृष्णाची निस्सीम भक्त होती. कृष्ण राधेच्या प्रेमाच्या कथा आजही मोठ्या भक्तीपूर्वक सांगितल्या जातात कारण त्यांचे प्रेम निस्वार्थी होतं. राधा ही कृष्णापेक्षा मोठी होती. तिचे आधीच लग्न झालेले होते. म्हणूनच राधेचे कृष्णावरील प्रेम हे भौतिक नसून ते भक्तीपूर्वक होते . आजही राधाभक्ती अथवा मधुराभक्तीला अध्यात्मामध्ये एक विशेष स्थान आहे.
कृष्ण हा भगवंत असूनही तो गोकुळातील एका सर्वसामान्य गवळ्याच्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला होता. मात्र तो भगवंताचा अवतार असल्याने त्याच्यातील अद्भूत चैतन्य सर्वसामान्यांना भूरळ घालत असे. लहानग्या कृष्णाच्या सहवासात आल्यावर गोकुळातील गोपिका आणि त्यांच्या गायी तहान भुक विसरून जात असत. कृष्णाने त्याची बासरी वाजवण्यास सुरूवात केली की सर्वांचं भान हरपत असे. कृष्णाच्या सहवासात आल्यामुळे त्यांच्यातील विकार दूर होऊन त्यांच्यामध्ये अद्वैत भावना जागृत होत असे. कृष्ण आणि गोपिकांच्या या नात्यावर अनेक गवळणी रचलेल्या आहेत. ज्यामधून त्यांच्या भक्तीची उदाहरणे समजू शकतात.
मीरा ही एक खूप मोठी कृष्णभक्त होती. मीरेची अनेक भजने आजही लोकप्रिय आहेत. मीरेचा जन्म राजपूत कुटुंबात झाला होता. एका दंतकथेनुसार मीराने लहानपणी आईला माझा पती कोण असे विचारले होते. त्यावळी तिला तिच्या आईने कृष्णाच्या मुर्तीकडे बोट दाखवून तिला सांगितले होते की, “कृष्ण तुझा पती आहे.” यामुळे लहानपणापासून मीरेने कृष्णाला आपले पती मानले होते. पुढे लग्नानंतरही ती कृष्णभक्तीत लीन राहत असल्यामुळे तिला समाजाच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. मात्र यामुळे मीरेच्या कृष्णभक्ती कोणताच फरक पडला नाही.
कृष्णाला आठ पत्नी होत्या. रुक्मिणी आणि सत्यभामा या त्याच्या दोन पत्नीचं नातं कृष्णासोबत विलक्षण होतं. पुराण कथेत या दोघींच्या अनेक कथा आहेत. ज्यावरून कृष्णाचे त्यांच्यावर असलेले प्रेम दिसून येते.
सुदामा हा कृष्णाचा लहानपणीचा मित्र होता. गुरू संदीपनी यांच्या आश्रमात या दोघांनी एकत्र शिक्षण घेतले होते. सुदामा हा गरिब कुटुंबातील होता. मोठे झाल्यावर सुदामा कृष्णाला भेटण्यासाठी पोहे घेऊन गेला होता. मात्र कृष्णाने सुदामाने दिलेले पोहेदेखील एखाद्या पक्वानाप्रमाणे खाल्ले होते. शिवाय सुदामा दुखावला जाणार नाही याची काळजी घेत कृष्णाने त्याची मदत केली होती. कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचे दाखले आजही दिले जातात.
कृष्ण हा अर्जुनाचा गुरू होता. असं म्हणतात की, अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्णाचे नामस्मरण ऐकू येत असे. महाभारतात कृष्णाला अर्जुनाने केलेल्या उपदेशामुळे पांडव कौरवांसोबतचे युद्ध जिंकू शकले.
द्रोपदी ही कृष्णाची मानलेली बहीण होती. द्रोपदी ही द्रुपद राजाची मुलगी आणि पांडवांची पत्नी होती. द्रोपदी एक महान कृष्णभक्त होती. महाभारतात प्रत्येक कठीण प्रसंगी कृष्णाने द्रोपदीचे रक्षण केल्याच्या कथा आहेत.
महाराष्ट्रातील कृष्णजन्म गोकुळाष्टमी या नावाने साजरा केला जातो. गोकुळाष्टमीला उपवास केला जातो. रात्री बारा वाजता कुष्णाच्या मुर्तीला पाळण्यामध्ये ठेवून त्याला दही-दूधाचा प्रसाद दाखवला जातो. कृष्ण जन्मावर आधारित पाळणे आणि गवळण गाऊन कृष्णाची पूजा आणि आरती केली जाते. दुसऱ्या दिवशी दही हंडीचा उत्सवदेखील मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो. कृष्णाचे आवडते दही आणि काही पदार्थ शिकांळ्यामध्ये अडकवून दहीहंडी उभारण्यात येते. गोंविदापथक थरावर थर लावून ही दही हंडी फोडतात. जे पथक जास्तीत जास्त थर कमीत कमी वेळात हंडी फोडतात त्यांना बक्षीस दिले जाते.
गुजरात आणि राजस्थानमध्ये देखील कृष्ण जन्म मोठया उत्साहात साजरा केला जातो. यासाठी कृष्णाची मंदिरे सजविली जातात. रात्रभर भजन आणि रासलीलेचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
बंगालमध्ये देखील कृष्ण जन्माला एक वेगळंच स्थान आहे. लहान मुलांना कृष्णाप्रमाणे सजवलं जातं. कृष्ण जन्मावरील नृत्याविष्कार सादर केले जातात.
दक्षिण भारतात कृष्ण जन्म हा एक मोठा सण असतो. या दिवशी कृष्णाच्या मंदिरांना दिव्यांची सजावट केली जाते. तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढल्या जातात. भगवान कृष्णासाठी विशेष नैवेद्य केला जातो. भगवतगीतेचे वाचन केले जाते. भारताप्रमाणे भारताबाहेरील अनेक देशांमध्ये देखील कृष्ण जन्माचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
जन्माष्टमीला महाराष्ट्रात विविध प्रकारची पक्वान्न आणि नैवेद्य केले जातात. या अनेक पदार्थांमध्ये दूध, दही, लोणी, यांचा वापर केला जातो. कारण भगवान कृष्णाचे बालपण गोकुळात गेले असल्यामुळे त्याला हे पदार्थ आवडतात. यासोबतच महाराष्ट्रात जन्माष्टमीला दहीपोहे, आंबोळी आणि शेवग्याच्या पानांची भाजी हा खास पदार्थ देखील केला जातो.
या जन्माष्टमीला जर तुम्ही उपवास करणार असाल तर या रेसिपीज जरूर ट्राय करा
गायिका आशा भोसले यांनी गायलेले आणि आशा काळे यांच्यावर चित्रीत हे गाणं बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील आहे.
हे गाणं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं असून गंमत जंमत या चित्रपटातील आहे. उधळीत ये रे गुलाल सजणा हे गाणं सचिन पिळगावकर आणि वर्षा उसगांवकर यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं आहे. या चित्रपटातून वर्षा उसगांवकर यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.
हे गाणं वजीर चित्रपटातील असून ते आशा भोसले यांनी गायलेलं आहे. हे गाणं अश्विनी भावे हिच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे.
मराठीतील ही एक प्रसिद्ध गवळण असून ती दिलीप गायक यांनी गायली आहे.
परब्रम्ह निष्काम तो हा गवळीया घरी... संत तुकारामांनी रचलेला हा अभंग कृष्णभक्तीवर आधारित आहे.
कोणत्याही धार्मिक विधी, पुजा अथवा सणासाठी उपवास करावा की नाही हे तुमच्या शरीर प्रकृती आणि श्रद्धेवर आधारित आहे. जर तुम्ही शरीराला दंड न देता केवळ लंघन करण्यासाठी उपवास करणार असाल तर तो करण्यास काहीच हरकत नाही. मात्र उपवास केल्यामुळे देव तुमच्यावर कृपा करेल या भावनेतून उपवास करू नका. कारण उपवास करून जर तुमचे कर्म चांगले नसेल तर निसर्गनियमानुसार त्याची फळे ही भोगावीच लागतात. यासाठी जन्माष्टमीला कृष्णाप्रमाणे सत्कर्म करून लोकांचे भले करण्यासाठी प्रयत्न करा.
दहीहंडी खेळताना आजकाल बक्षीस मिळविण्यासाठी अथवा कौतुक होण्यासाठी जास्तीत जास्त थर लावण्याकडे भर दिला जातो. मात्र त्यामुळे जीवाचे नुकसान होण्याची शक्यता असते. सण साजरा करताना त्याला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला दहीहंडीमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आधी प्रतिबंधानात्मक उपाय योजना जरूर करा.
नक्कीच भगवान कृष्ण आणि त्यांनी जीवनात वापरलेली कृष्णनीती सर्वांच्या जीवनासाठी अमुल्य आहे. कारण त्यामुळे तुम्हाला तुमचे आणि इतरांचे जीवन सुखी करता येऊ शकते. जीवन हे एक युद्ध असून दररोज तुम्हाला जीवनात याला सामोरे जावे लागते. म्हणूनच कृष्णाने चाणाक्ष बुद्धीमत्तेने महाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी अर्जुनाला केलेले मार्गदर्शन सर्वसामान्यांना जीवनात तारक ठरू शकते.
आणखी वाचा
जाणून घ्या गुरूपौर्णिमा आणि गुरूपूजनाचे महत्त्व
नागपंचमीचं बदलतं महत्त्व (Everything about Nag Panchami in Marathi)
तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो तुमचा आवडता 'रंग'
फोटो- व्हिडिओ सौजन्य - Instagram and youtube