कोकणातील गणेशोत्सवाचा आनंद हा काही औरच असतो. हा सण कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवणारा एक सुखदायक सोहळाच असतो. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आज अनेक कोकणी माणसं मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात स्थायिक झाली आहेत. मात्र त्यांची कोकणासोबत असलेली नाळ ‘गणेशोत्सव’ आणि ‘होळी’ या दोन सणांनी बांधून ठेवली आहे. काहीही झालं तरी कोकणचा मूळ रहिवासी म्हणजेच ‘मुंबईचा चाकरमानी’ या दोन सणांना गावी जातोच. कोकणात जाण्यासाठी गौरी-गणपतीच्या दिवसांमध्ये प्रचंड गर्दी असते. रेल्वे-बसचं रिझर्व्हेशन फुल झालेलं असतं. महामार्गांवर खाजगी वाहनांमुळे ट्राफिक जॅम झालेलं असतं. पण खऱ्या कोकणी माणसाला कोकणात जाण्यापासून कोणीच अडवू शकत नाही हे एक खूप मोठं आश्चर्यच आहे. या काळात मुंबईच्या चाकरमान्यांना जणू कोकणात जाण्याचे वेधच लागलेले असतात. म्हणूनच कोकणात जाण्यासाठी खास गणेशोत्सवासाठी स्पेशल वाहतुकीची साधने उपलब्ध केली जातात.
एकदातरी गणेशोत्सवाला कोकणात जावंच…
कोकणात दळणवळणाच्या अनेक सोयीसुविधा झालेल्या असल्या तरी आजही अनेक खेडेगावांमध्ये बस स्टॉपपासून अगदी छोट्या पायवाटाने घराकडे जावं लागतं. वाटेत पायवाटांवर अनेक नद्या, ओढे, ओहोळ आडवे येत असतात. हिरवेगार डोंगर, दुधडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि कंबरेपर्यंत पोहचलेली भातशेती असं नयनरम्य वातावरण या दिवसात कोकणात जागोजागी पाहायला मिळतं. गावात शिरताच वाडीवाडीतून हिरव्याकंच निसर्गात दडलेली कौलारू घरं तुम्हाला साद घालू लागतात. वाटेत लागणाऱ्या प्रत्येक घरातून तुमची अगदी प्रेमाने विचारपूस केली जाते. या चौकशीत आपलेपणाचा सुगंध असतो. कोकणातील सारं वातावरणच अगदी भारावून टाकणारं असतं. या वातावरणाचा खास अनुभव घेण्यासाठी कोकणातील आपल्या वडीलोपार्जित घरी गौरी-गणपतीला एकदा तरी जायलाच हवं. या वातावरणात मुंबईतील वर्दळ, कामाचा ताण, नको असलेली जीवघेणी स्पर्धा क्षणात नाहीसं करण्याचं सामर्थ्य दडलेलं आहे. कोकणातील घरात पाऊल ठेवताच तुम्हाला जणू काही तुम्ही वर्षानूवर्ष इथेच राहत आहात असा भास होऊ लागतो.
गणेशोत्सवाला कसं असतं कोकणातील वातावरण
कोकणातील प्रत्येक घरात गणपती बाप्पाचं स्वागत अगदी उत्साहात होतं. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक घरात गणपती बाप्पा विराजमान होतात, कोकणातील गणपती हे दीड, पाच, सात, अकरा, दिवसांचे असतात. काही मोजक्या आणि मानाच्या घरांमध्ये गौरी बसवल्या जातात. आश्चर्य म्हणजे वर्षभर कोकणातील गावात प्रत्येक घरटी एक ते दोन माणसंच राहतात. बरीचशी घरं वर्षभर जवळजवळ बंदच असतात. मात्र गणेशोत्सवाला गावातील प्रत्येक घर माणसांनी आणि सळसळत्या चैतन्याने भरलेलं असतं. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी गावकरी आदल्या दिवशी रात्रभर जागून घरातील देवघरातील भिंत रंगवतात. चुना आणि वेगवेगळ्या नैसर्गिक रंगाने गणपतीचं कुड म्हणजेच मखर सजवलं जातं. साधं-सुधी पण अगदी मनमोहक सजावट रात्रभर जागरण करून घरातील मंडळी करतात. एकीकडे घरातील महिलांची हरितालिकेची पुजा सुरू असते. बच्चे कंपनी आणि इतर मंडळी बाप्पाची आरास आणि इतर गोष्टींमध्ये रमलेली असतात. गणेश चर्तुथीच्या दिवशी वाडीवाडीत एकत्र जमून कारखान्यातून गणपती बाप्पाला घरी आणण्याचा खास कार्यक्रमच असतो. गणपती बाप्पाची मुर्ती आणताना गणपती बाप्पा मोरया ! असा सामूहिक आणि मोठ्ठा गजर केला जातो, डोक्यावर पाट आणि त्यावर गणपती बाप्पाची मुर्ती असं विशेष पद्धतीने बाप्पाचं घरात आगमन होतं. घरी आल्यावर गुरूजींकडून बाप्पाची विधीवत पूजा केली जाते. आठवडाभर सणाच्या वातावरणाने कोकणात सर्वांना जणू काही मोहिनीच घातलेली असते. सामूहिक पद्धतीने सर्वांनी प्रत्येकाच्या घरात जाऊन आरती करणं, हरितालिका, गौरी आगमन, ऋषीपंचमी आणि गौरीपूजनासाठी गावातील महिलांचं एकत्र येणं, या निमित्ताने फुगडी, झिम्मा सारखे पारंपरिक खेळ खेळणं, गावागावात रात्रभर रंगणारं भजन-किर्तन, सत्यनारायण पुजा, गौरी-गणपतीसाठी गावाकडचे खास नैवेद्य, विसर्जनाच्या दिवशी गावातील सार्वजनिक पाणवठयावर सामूहिक पद्धतीने बाप्पाचं विसर्जन केलं जाणं हे सारं काही अगदी मन भारावून टाकणारं असतं. विसर्जनानंतर पुन्हा मुंबईत येण्यासाठी कोकणातील घरातून पाय बाहेर काढणं प्रत्येक चाकरमान्याला खूपच जड जातं. जड अंतःकरण आणि डबडबलेले डोळे मग मुंबईच्या दिशेने परतीची वाट धरतात. घराकडे परतताना मनात मात्र गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… हाच आवाज मनात खोलवर कुठेतरी ऐकू येत असतो.
अधिक वाचा
DIY: या गणेशोत्सवाला घरच्या घरी स्वतःच तयार करा अशी इकोफ्रेन्डली सजावट
गणेश चतुर्थी’ बद्दलची संपूर्ण माहिती
लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी लावायलाच हवी ही evergreen गाणी
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम