तुम्ही दिवसभर बसून काम करता का ? तुम्हाला दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करावं लागत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी मुळीच हितकारक नाही. कारण यामुळे हळूहळू तुमच्या आरोग्यावर नकळत विपरित परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही दिवसभर एकाच ठिकाणी बसून कंम्युटर अथवा लॅपटॉपवर काम करत असाल तर तुमची पाठ आणि कंबरेतून असह्य वेदना येऊ लागतात. जर तुम्हाला हा त्रास जाणवू लागला असेल तर ही धोक्याची घंटी वेळीच ओळखा. असं असेल तर कामाची पद्धत अथवा तुमची जीवनशैली बदलण्याची वेळ आली आहे. दिवसभर एकाच ठिकाणी बसून तासनतास काम केल्यामुळे तुमची शारीरिक हालचाल मुळीच होत नाही. आठ ते नऊ तास शरीराची हालचाल न होणं हे फारच धोकादायक आहे. ज्यामुळे तुम्ही हळूहळू आरोग्य समस्यांच्या अधीन होऊ शकता. यासाठीच वेळीच हा धोका ओळखा आणि तुमच्या जीवनशैलीत योग्य ते बदल करा.
जी माणसं दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक आहे. एका संशोधनानुसाक जी माणसं आठ अथवा नऊ तासांच्या वर एकाच ठिकाणी बसून काम करतात त्यांना लवकर मृत्यू येण्याची शक्यता असते.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(WHO)च्या सल्लानुसार बैठी कामे करणाऱ्या लोकांनी आठवड्यातून कमीत कमी 150 मिनीटे मध्यम शारीरिक हालचाल आणि कमीत कमी 75 मिनीटे कठीण व्यायाम करणं गरजेचं आहे. तज्ज्ञांचा हा सल्ला प्रत्येकाने आपापली जीवनशैली आणि कामाचा प्रकार यानुसार आचरणात आणावा.
सतत एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे सांधेदुखी, पाठदुखी, वजन वाढण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी ऑफिसमध्ये बसल्याजागी काही व्यायाम करून तुम्ही तुमच्या शरीराला निरोगी ठेवू शकता. ऑफिसमधील लंच अथवा टी ब्रेकमध्ये तुम्ही हे स्ट्रेचिंग एक्सरसाईज करू शकता.
मानेसाठी स्ट्रेचिंग एक्सरसाईज -
ऑफिसमध्ये कंम्युटर अथवा लॅपटॉपकडे पाहत तुम्हाला तासनतास काम करावं लागतं. कामाचा ताण आणि वेळेवर काम पूर्ण करण्याच्या गडबडीत मानेवर याचा अतिरिक्त ताण येतो. ज्यामुळे काम करताना अचानक मानेतून कळा येऊ लागतात. कधीकधी मान आणि पाठीतून येणाऱ्या वेदनांंमुळे काम करणं अशक्य होतं. यासाठीच काम करताना अधूनमधून एक ते दोन वेळा मानेचा व्यायाम करणं फायदेशीर ठरू शकतं.
डोळ्यांसाठी स्ट्रेचिंग एक्सरसाईज -
काम करताना एकटक लॅपटॉपच्या स्क्रिनकडे पाहिल्यामुळे डोळ्यावर ताण येतो. डोळ्यांवर ताण आल्यामुळे तुमचे डोके दुखू शकते. शिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे मुळीच योग्य नाही. यासाठी ऑफिस चेअरवर बसल्याजागी तुम्ही हा व्यायाम नक्कीच करू शकता.यासाठी थोड्यावेळ डोळ्यांची हळूवार उघडझाप करा. मान सरळ ठेऊन डोळे वरून खालच्या दिशेने आणि खालून वरच्या दिशेने फिरवा.
खांद्याचे स्ट्रेचिंग एक्सरसाईज -
बसल्या जागी खांद्यांचा व्यायाम करणे सहज शक्य आहे. यासाठी हात कोपरातून दुमडा आणि हाताच्या मुठी खांद्यांवर ठेवा. या स्थिती खांदे पुढून मागच्या दिशेने आणि पुन्हा मागून पुढच्या दिशेने फिरवा. ज्यामुळे तुमच्या मान आणि पाठीवरचा ताण कमी होईल.
हाताचे स्ट्रेचिंग एक्सरसाईज -
सतत कंप्यूटरवर काम करून तुमच्या हाताची बोटे दुखू लागतात. शिवाय दंड आणि मनगटांमधून देखील कळा येतात. अशा वेळी हात समोर समांतर ठेवून एकमेंकावर अलगद आपटावे. हातावर अशी टाळी दिल्यामुळे हातावर आलेल्या कामाचा ताण कमी होण्यास मदत होते.
पायांचे स्ट्रेचिंग एक्सरसाईज -
सतत खुर्चीवर बसून काम केल्यामुळे कंबर आणि पाय दुखू लागतात. अशा वेळी खुर्चीवर बसूनच पाय समोर ताणून धरावेत आणि पावले घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे फिरवावी ज्यामुळे पावलांमधील ताण कमी होतो आणि पायांमधील जखडलेले स्नायू मोकळे होतात.
यासोबत दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे योगासने, प्राणायम, धावणे, पळणे, चालणे, जीममधील एक्सरसाईज केल्यास नक्कीच चांगला परिणाम दिसून येऊ शकतो.
अधिक वाचा
मुळव्याधीचा त्रास होतोय, या घरगुती उपायांनी मिळेल लवकर आराम
मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय
जाणून घ्या पोटाचे विकार, लक्षणे आणि उपचार
फोटोसौजन्य - शटरस्टॉक