कोरोनामुळे घरातच राहावं लागल्यामुळे सध्या सर्वांची जीवनशैलीच बदलली आहे. या काळात प्रत्येकजण विकऐंड आणि संध्याकाळी घरात मस्तपैकी लोळत नेटफ्लिक्स बघण्यात वेळ घालवत आहे. वर्क फ्रॉम होममुळे जास्तीत जास्त वेळ लॅपटॉप, मोबाईवर असणं आणि युट्यूबवर बघून नवनवीन रेसिपीज शिकल्यामुळे अती प्रमाणात खाणं हे तर सध्याचं रूटिनच झालं आहे. पण जर तुम्हाला शरीरासोबतच तुमच्या त्वचेचीही काळजी घ्यायची असेल तर या गोष्टी आता कमी करायला हव्या.कारण त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त नवनवीन ब्युटी प्रॉडक्ट वापरून काम होणार नाही तर जीवनशैलीतही योग्य बदल करायला हवेत. लक्षात ठेवा स्कीनकेअर प्रॉडक्टचा तुमच्या त्वचेवर फक्त वीस टक्के परिणाम होत असतो मात्र उरलेली ऐंशी टक्के त्वचेची निगा तुमची जीवनशैलीच राखत असते. जर तुम्ही वेळेवर आणि योग्य आहार घेतला, दिवसभरात आठ तास निवांत झोप घेतली आणि नियमित व्यायाम केला तर तुमचे आरोग्य तर सुधारेलच पण तुम्ही कायम चिरतरूण दिसाल. यासाठीच कोणत्याही ब्युटी प्रॉडक्ट शिवाय फक्त जीवनशैली बदलून मिळवा सुंदर त्वचा
त्वचेची काळजी घेण्यासाठी स्किन केअर रूटिनसोबतच तुम्ही फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करून, भरपूर पाणी पिऊन, नियमित वर्कआऊट करून आणि ब्युटी स्लीप घेऊन तुमची त्वचा सुंदर करू शकता. यासाठी आजच तुमच्या डेली रूटिनमध्ये या तीन गोष्टी समाविष्ठ करा.
त्वचा म्हणजे तुमच्या शरीरात काय सुरू आहे हे दाखवणारा थेट आरसा आहे. थोडक्यात तुमच्या शारीरिक आरोग्याचा आणि त्वचेचा जवळचा सबंध असतो.जर तुम्ही ताणतणावात असाल तर तुमची त्वचादेखील निस्तेज आणि कोरडी दिसते. ताणतणावापासून दूर राहण्याचा सोपा मार्ग म्हणजे मेडिटेशन आणि योगासन करणं. कारण योगासने आणि ध्यानामुळे तुमचे मनच नाही तर संपूर्ण शरीर शांत आणि निवांत होते. यासाठी सकाळी उठल्यावर अथवा रात्री झोपण्यापूर्वी नियमित मेडिटेशन करा. दिवसभरात यासाठी कमीतकमी दहा मिनीटे काढणे नक्कीच कठीण नाही. योगासनांमुळेही शरीर आणि मनाला निवांतपणा मिळतो. शक्य असेल तर यासाठी फेशिअल योगा नक्की ट्राय करा. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि टवटवीत दिसेल.
जर तुम्ही खूपच गोड, तेलकट आणि चीझयुक्त पदार्थ खात असाल तर ते त्वरीत बंद करा. कारण यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. अशा पदार्थांमुळे तुमच्या शरीरातील हॉर्मोन्समध्ये बदल होतात. शरीरात इन्सुलीनची निर्मिती अती प्रमाणात झाल्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी उत्तेजित होतात. ज्यामुळे तुम्हाला अॅक्ने अथवा मुरमे येतात. यासाठीच तुमच्या आहारातून जंक फूड, प्रोसेस फूड आणि साखरेचे पदार्थ शक्य तितके कमी करा. पहिले दोन महिने हे पदार्थ कमी करून तुमच्या त्वचेमध्ये काय बदल होतात ते अनुभवा ज्यामुळे तुम्हाला चांगला आहार घेण्याची आपोआप सवय लागेल.
लॅपटॉप, आणि मोबाईलमुळे तुम्ही तुमच्या वयापेक्षा अधिक लवकर म्हातारे व्हाल हे तुम्हाला माहीत आहे का ? यासाठीच जरी तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असला तरी अधुनमधून स्क्रीन ब्रेक घ्या. कारण लॅपटॉप, मोबाईल अशा गॅझेटमधून बाहेर पडणाऱ्या इमिट ब्लू लाईटमुळे तुमच्या त्वचा आणि डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. या कृत्रिम ब्लू लाईटमुळे तुमचे नैसर्गिक झोपेचं सायकल ब्रेक होतं. ज्यामुळे तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमचे डोळे सूजलेले दिसतात.
हे नक्की ट्राय करा - तुमच्या लॅपटॉप अथवा मोबाईल पासून दर एक ते दोन तासाने दूर जा. अशा वेळी पाच ते दहा मिनीटांचा छोटा ब्रेक घ्या. दर एक तासाने डोळे उघडझाप करा आणि घरातच एक फेर फटका मारा. अशा मधल्या ब्रेकमध्ये मस्त ज्युस प्या, स्वतःसाठी काहीतरी पौष्टिक डिश बनवा, एखादं पुस्तक हाताळा अथवा फेस शीट मास्क लावून रिलॅक्स करा.