Love

रिलेशनशीपमध्ये गैरसमज होतायत? मग या गोष्टी तुम्हाला माहीत हव्या

Leenal Gawade  |  Jan 15, 2019
रिलेशनशीपमध्ये गैरसमज होतायत? मग या गोष्टी तुम्हाला माहीत हव्या

दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तिंमध्ये मतभेद होणे हे अगदी स्वाभाविक आहे. घरी आई, बाबा, भावासोबत झालेली भांडणे मिटवता येतात. कारण पर्यायच नसतो. त्याच्यांसोबत आपल्याला घरी एकत्र राहायचे असते. पण दोन प्रेमिकांमध्ये झालेली भांडणे अधिक किचकट आणि त्रासदायक असतात. कारण ‘माझी चूक झाली’ असे म्हणायची तयारी दोघांमध्येही नसते. म्हणजे अपवाद वगळता काहींकडे चूक मान्य करण्याची क्षमता असेलही. पण ज्या प्रेमिकांमध्ये सतत भांडणे होतात. त्यांनी या १५ गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात म्हणजे तुमची भांडणे कमी होतील आणि तुमचे नातेही अधिक दृढ होईल.

1. एकमेकांवर प्रेम करा

भांडणांवर मात करणारी एकमेव गोष्ट म्हणजे ‘प्रेम’. भांडण झाल्यानंतर होणारे आरोप- प्रत्यारोप अगदीच साहजिक असतात. पण या भांडणामध्येही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट असते ती प्रेम. तुम्ही एकमेंकावर प्रेम करता आणि करतच राहणार आहात. त्यामुळे भांडण होणे ही त्यापेक्षा महत्वाची गोष्ट नाही. फरक इतकाच आहे की, तुम्हाला भांडण झाल्यानंतर तुमच्या दोघांमधील प्रेमाची भावना जागवायची आहे. हल्ली भांडणे झाल्यानंतर एकमेकांना अनफॉलो करणे, फ्रेंडलिस्टमधून काढून टाकणे, सोशल मीडियावर ब्लॉक करणे अगदीच कॉमन झालय नाही का?, पण तसे करण्यापेक्षा शांत बसा. तुम्ही एकत्र घालवलेले क्षण आठवा. फोटोज असतील तर ते पाहा. त्या फोटोजमध्ये असलेली तुमची लव्ह केमिस्ट्री तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला भांडण संपवणे सोपे जाईल.

2. खोटं बोलू नका

नात्यामध्ये दुरावा आणणारी आणखी एक गोष्ट म्हणजे खोटं बोलणे. अनेकदा प्रेयसी आणि प्रियकराला एकमेकांपासून कोणत्याच गोष्टी लपवायच्या नसतात. पण एकमेकांना न आवडणाऱ्या गोष्टी करत असताना त्याला ती किंवा तिला ती कळू नये म्हणून अनेकदा खोटे बोलले जाते. जर तुम्हाला एकमेकांना आवडत नसणाऱ्या गोष्टी माहीत असतील तर मग त्यावर बोला. तुम्हाला आवडणारी गोष्ट दोघांच्या नात्यात कोणताही दुरावा आणणार नाही हे पटवून द्या.

उदा. तुमच्या प्रियकराला तुम्ही कोणासोबत गेलेले आवडत नसेल विशेषत: एखाद्या मित्रासोबत.(कारण अनेकदा हेच कारण खोटे बोलण्यामध्ये असते.) त्या मित्रासंदर्भात तुमच्या प्रियकराच्या मनातील गैरसमज दूर करा आणि हा विश्वास त्यांच्यात निर्माण करा की, कोणामुळेही तुमच्या नात्यात दुरावा येणार नाही. मुलांच्याही बाबतीत अगदी तसेच आहे.

आता प्रश्न असा निर्माण होतो की, माणूस म्हणून आपली एक वेगळी ओळख आहे. अशा नियमांमुळे तुमच्या वागण्या- बोलण्याला निर्बंध येत आहेत, असे वाटत असेल तर ते ही स्पष्ट करा.कारण या गोष्टी तुमच्या पार्टनरला सांगितल्याने खोटे बोलण्याची वेळ येत नाही आणि तुमच्यावरील ओझेही कमी होते.

3.  मुक्त संवाद असू द्या

प्रेमिकांमध्ये सगळ्यात महत्वाचा असतो ‘संवाद’ तुम्ही कितीही कामात असाल तरीही दिवसातून एक- दोन फोन करुन चौकशी करणे फार काही कठीण नसते. त्यातही तासनतास बोला असे नाही. साधी एक विचारपूसही समोरच्याच्या मनात तुमच्या बद्दलचे प्रेम वाढवत असते. आता मुक्त संवाद म्हणायचा झाला तर अनेकदा प्रेम वगळताही अनेक गोष्टी असतात त्या देखील एकमेकांना सांगाव्याशा वाटतात हो ना ? मग तुमच्या मनातील ताण काढून टाकण्यासाठी आणि काही गोष्टींमध्ये सल्ला घेण्यासाठी मुक्त संवाद फायद्याचा ठरतो. त्या संवादातून तुम्हाला समोरच्याचा स्वभावही कळतो.  याचा फायदा भांडण झाल्यानंतर अधिक होतो.

उदा. प्रेयसी भांडणात काहीही बोलत असेल पण इतरवेळी तिच्या स्वभावातून असा चिडचिडेपणा कधीच जाणवत नसेल  म्हणजे तिचे काहीतरी बिनसले आहे. तिला तुमची काही गोष्ट खटकली आहे का? या सगळ्या गोष्टी कळायला खूप मदत होते. त्यामुळे मुक्त संवाद हा हवाच.

एखाद्या मुलाला जाणून घ्यायचे आहे? मग हे नक्की विचारा

4.  चांगले वागा

तुम्ही एकमेकांवर प्रेम करता. तुमच्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात तुम्ही एकमेकांचा आधार बनता ही किती चांगली गोष्ट आहे. पण भांडणानंतर तुम्हाला या गोष्टीचा विसर का पडावा? याचा विचार करा आणि नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न करा. क्षुल्लक गोष्टीवर होणारी चीडचीड थांबवा कारण त्यासाठी आपण आपल्या आयुष्यातील अमूल्य क्षण वाया घालवतो.

5.  माफ करा आणि विसरा

रिलेशनशीपमध्ये असताना अनेकदा असे काही प्रसंग घडतात की, समोरच्याची चूक अक्षम्य आहे हे कळत असते. पण वर म्हटल्याप्रमाणे राग कायम ठेवल्याने आपण आपल्या आयुष्यातील अमूल्य क्षण आपण घालवून बसतो. त्यामुळे समोरच्याच्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे तुम्ही दुखावले गेले असाल तर त्यावर तोडगा काढा.नाते तोडणे हा त्यावरचा पर्याय नाही. तर माफ करणे आणि झालेला प्रसंग विसरणे यात शहाणपण आहे.

6. ब्रेक-अपबद्दल बोलणे चुकीचे

भांडणात किंवा इतर वेळीही  ब्रेक- अप बद्दल बोलणे चुकीचे आहे. कारण अशा बोलण्यामुळे समोरच्याच्या मनात नकारात्मक भावना येते आणि ती व्यक्ती आपल्याला कधीही सोडून जाऊ शकते असे वाटायला लागते. त्यामुळे नात्यामध्ये सोडून जाण्याच्या गोष्टी येता कामा नये. शिवाय चांगल्या नातेसंबंधासाठी तुम्ही तुमच्या भूतकाळात झालेल्या ब्रेक- अप्सबददल मुळीच बोलू नका. अनेकांना एकापेक्षा अधिक रिलेशनशीप होत्या हे सांगणे कौतुकाचे वाटत असते. पण याचा विपरित परिणाम समोरच्यावर होत असतो.

उदा. तु्म्ही तुमच्या ब्रेकअप्स बद्दल सतत सांगत राहिलात तर तुम्ही आता प्रेम करता असे सांगता ते कितपत खरे आहे? असा प्रश्न समोरच्याला पडतो आणि तुमच्यातील समोरच्याचा रस कमी होतो. पर्यायाने प्रेमसुद्धा कमी होते.

चुंबन घेणे म्हणजे प्रेम व्यक्त करणे नाही तर चुंबनाचेही असतात अनेक अर्थ

7. गोष्टी पटत नसल्यास सांगा

अनेकदा समोरची व्यक्ती दुखावली जाऊ नये किंवा वाद होऊ नये म्हणून बऱ्याच गोष्टी समोरच्या व्यक्तिला सांगण्याचे टाळले जाते किंवा अशा गोष्टी  सांगितल्या जात नाहीत. पण त्या गोष्टी योग्यवेळी सांगितल्या नाही तर त्याचा पुढील काळात होणारा उद्रेक हा वाईट असू शकतो. म्हणून एखादी गोष्ट फारच खटकत असेल तर ती त्यावेळीच बोला. कारण समोरच्यालाही तुम्हाला काय आवडत नाही याचा अचूक अंदाज येतो आणि नातेसंबंधात होणारी तुमची घुसमट टाळता येते.

8. ‘ अहमं’पणा कशासाठी?

नात्यात दुरावा आणणारी आणखी एक गोष्ट म्हणजे अहमंपणा. तो टाळला तर नात्यातील गोडवा टिकून राहतो.

उदा.मी कधीच चुकत नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही. हा अहमंपणा तुम्हाला भारी पडू शकतो. एकाच नात्यात नाही तर तुम्ही इतर कोणासोबतही नात्यात राहण्याचा विचार करत असाल तरी तुम्हाला अहमंपणा त्रास देऊ शकतो. त्यामुळे अहमंपणा टाळाच.

9.  माफी मागण्याने फरक पडतो

भांडणे झाल्यानंतर किंवा काही खटके उडाल्यानंतर माफी मागणे म्हणजे कमीपणा असे मुळीच नाही. तुम्ही कोणतेही आढेवेढे न घेता माफी मागितली तर बराच फरक पडतो. समोरचा कितीही रागात असला तरी त्याचा किंवा तिचा राग अगदी चटकन निवळतो. भांडणामध्ये परिस्थिती हाताबाहेर जात आहे असे वाटत असेल तर पटकन Sorry बोलून मोकळे व्हा.

10. तुमच्या भूतकाळाची तुलना वर्तमानाशी नको

अनेकदा भांडणामध्ये भूतकाळ डिवचून काढण्याची अनेकांना सवय असते.मी आधी बरे होते.आधी माझ्या आयुष्यात सगळं चांगलं होतं. असे खूप जण बोलून दाखवतात ही खूप चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या नात्यातील दुरावा नाहक वाढू शकतो. तुम्ही तुमच्या भूतकाळाची तुलना वर्तमानाशी करु नका. कारण त्यामुळे समोरची व्यक्ती नाहक दुखावली जाते. त्यामुळे तुमच्यातील अंतर देखील वाढायला लागते. नाते दृढ होण्याआधीच त्यामधील आत्मविश्वास कमी होऊ लागतो.

11. तुटलेल्या नात्याची आठवण नको

अनेकदा मुलगा किंवा मुली ब्रेक-अप झाल्यानंतर Move on केवळ नावाला होतात. मागच्या नात्यातील प्रत्येक आठवणी त्यांच्यापाशी असतात. त्यातून पूर्ण बाहेर पडत नाही तोच नव्या नात्यामध्ये गुंतायला जातात. पण नव्या नात्यात मागील रिलेशनशीपच्या आठवणी चांगल्या नाहीत. कारण त्याने समोरचा व्यक्ती तुमच्यावर पूर्णत: विश्वास ठेवायला पाहात नाही. तो किंवा ती तुमच्या मागील नात्यातील अनेक गोष्टी जाणण्याचा नाहक प्रयत्न करु लागते.तुम्ही त्या व्यक्तिच्या संपर्कात नाही ना? तुम्ही परत एकत्र झालात तर माझे काय ? असे अनेक प्रश्न नात्यात निर्माण होऊ लागतात. गैरसमज वाढवण्यासाठी मागील आठवणी अशा कारणीभूत ठरु शकतात. अनेकदा तुमचे मागील नाते तुटण्याचे कारण नवीन नाते तुटण्याचेही कारण बनू शकते. त्यामुळे जर तुम्हाला नवे नाते यशस्वी करायचे असेल तर मागील कटू आठवणी मागे ठेवलेल्याच बऱ्या नाहीत का?

12. देवाण-घेवाण हवी

आता प्रेमात देवाण घेवाण  म्हणजे भेटवस्तू देणे का ? तर अजिबात नाही. प्रेमाची तुलना ही फॅन्सी वस्तूंनी करता येत नाही. प्रेमामध्ये देवाण- घेवाण ही प्रेमाची हवी. समोरच्याकडून कोणत्याही वस्तूची अपेक्षा न करता केलेली प्रेमाची उधळण ही महत्वाची असते.

उदा. एखादी व्यक्ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करत आहे हे तुम्हाला माहीत असेल आणि तुम्हाला ती व्यक्ती आवडत असून देखील तुम्ही तिच्या/ त्याच्या प्रेमाला न्याय देत नसाल तर देवाण- घेवाणीची प्रक्रिया केवळ वन वे होईल. हे जास्त वेळ सुरु राहिल्यास तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तिचे तुमच्यावरील प्रेम कमी होऊ लागेल.

जोडीदारासोबत नातं मजबूत असल्याचे संकेत

13. भावनांची कदर करा

दोन वेगवेगळ्या व्यक्तिंची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते. आनंद, वाईट वाटणे, रागावणे या संकल्पना प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात. काही व्यक्तिंना चटकन राग येतो. पण त्या लगेच शांत होतात. पण काही व्यक्ती झालेली एखादी गोष्ट इतकी मनाला लावून घेतात की, एकदम शांत होतात. प्रत्येकाची प्रतिक्रिया देण्याची पद्धत वेगळी असू शकते. ती तुम्हाला आवडत नसली तरी ती व्यक्ती आपली आहे ती का चिडतेय, भांडतेय हे जाणून घ्या. त्यांच्या भावनांची कदर करायला शिका. वाद कमी होतील.

14. भांडणे वेळीच संपवा

‘सुबह का भुला शाम को घर आए’ अशी एक म्हण आहे. अगदी तसचं  भांडण झाल्यानंतर ती त्याच दिवशी मिटवा. म्हणजे तास- दोन तास तुम्ही एखाद्या विषयावर भांडत आहात ठिक आहे. पण त्यासाठी आठवडा किंवा महिनाभर बोलणे सोडणे म्हणजे भांडणावरचा तोडगा नाही. तुम्ही एकमेकांवर प्रेमासोबतच राग काढण्याचा अधिकारही तुम्हाला आहे. पण ही भांडणे त्याच दिवशी मिटवणे देखील तितकेच गरजेचे आहे. म्हणजे पुढे जाऊन उगाचच आपण या भांडणात आपला वेळ घालवला असे वाटणार नाही. एकच आयुष्य मिळाले आहे ते ही जर रुसव्या- फुगव्यात घालवले तर काय उपयोग ना?

15.  परफेक्ट नाही पण साजेसे बना

जगात कोणतीच गोष्ट परफेक्ट नसते आणि ती असूही शकत नाही. त्यामुळे तुम्ही परफेक्ट नाही तर चांगले/ साजेसे होण्याचा प्रयत्न करा.. तीच गोष्ट नाते टिकवण्यासाठी खूप महत्वाची असते. समोरच्या व्यक्तिला साजेसे आहोत की नाही ? याचा विचार करा आणि तसे नसल्यास साजेसे होण्याचा प्रयत्न करा. नात्यातील अनेक गोष्टी सोप्या होऊन जातील आणि नात्यातील गोडवा कायम टिकून राहिल.

सौजन्य- Instagram,giphy

Read More From Love