हिवाळ्याला जोरदार सुरूवात झाली आहे. त्यातच कधी कधी जोरदार पावसाची सरही पडत आहे. ज्यामुळे सध्या दिवसभर घराबाहेर कधी धुक्याची तर कधी धुरक्याची चादर पसरलेली दिसत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणाचा सामना करण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. अशा वातावरणात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी डायटवर भर दिला जातो. तर रात्री थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी अंगात स्वेटर आणि पायात मायमोजे घातले जातात. ज्यामुळे तुमचे पाय थंड पडत नाहीत आणि शांत झोप लागते. मात्र तुम्हाला रात्री झोपताना मोजे घालण्याची सवयच असेल तर त्याचे तुमच्या शरीरावर चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होऊ शकतात. यासाठी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती.
रात्री झोपताना मोजे घालण्याचे फायदे –
रात्री झोपताना मोजे घालण्याचे अनेक फायदे आहेत जसं की यामुळे तुम्हाला थंडी लागत नाही आणि शांत झोप लागते.
शरीराचे तापमान नियंत्रित राहते –
हिवाळ्यात वातावरणात वाढत जाणाऱ्या थंडीमुळे घरातील तापमान हळू हळू कमी होत जाते. याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि शरीरातील तापमान अनियंत्रित होते. ज्यामुळे सर्वात आधी तुमचे हात, पाय आणि नाक थंड होतं. शरीराचे कार्य सुरळीत राहण्यासाठी शरीराला ठराविक तापमानाची गरज असते. यासाठीच जर रात्री झोपताना तुम्ही पायमोजे घातलेले असतील तर रात्रभर तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. ज्यामुळे बाहेरच्या वातावरणाचा तुमच्या शरीरावर परिणाम होत नाही.
रक्तभिसरण सुरळीत होते –
रात्री झोपताना पायात मोजे घालण्यामुळे तुमच्या शरीराचे रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. कारण मोज्यांमुळे पाय आणि शरीर उबदार राहतं. सहाजिकच यामुळे तुमच्या शरीराला योग्य रक्ताचा पूरवठा आणि ऑक्सिजन मिळते. शरीरातील रक्तपेशी, ह्रदय, रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी हे फार आवश्यक आहे.
शांत झोप येते –
हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडली की गारव्यामुळे शरीर थंड पडू लागतं आणि त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो. या काळात नेहमी झोपमोड झाल्यामुळे झोप पूर्ण होत नाही. मात्र जर तुम्ही रात्री झोपताना मोजे घातले असतील तर तुम्हाला रात्री शांत झोप लागते. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी झोप मिळते आणि सकाळी तुम्हाला फ्रेश वाटते.
पायाला मुंग्या (बधीर पणा) येत नाही-
हिवाळ्यात पाय गार पडल्यामुळे रक्तप्रवाहावर विपरित परिणाम होतो. ज्यामुळे तुमच्या हातापायाला मुंग्या म्हणजेच झिणझिण्या येतात. ज्यामुळे रात्री पाय अचानक बधीर झाल्यासारखा वाटू लागतो. वास्तविक ही हिवाळ्यात सर्वांना जाणवणारी एक सामान्य समस्या आहे. त्यामुळे याबाबत फार चिंता करण्याची गरज नाही. मात्र यामुळे तुमच्या झोपेवर विपरित परिणाम होऊ शकतो आणि निरोगी राहण्यासाठी चांगली झोप गरजेची आहे. रात्री झोपताना मोजे घालण्यामुळे तुमच्या पायांना मुंग्या येत नाहीत.
रात्री झोपताना मोजे घालण्याचे तोटे –
हिवाळ्यात रात्री पायात मोजे घालण्याचे जसे फायदे आहेत तसेच अनेक तोटेदेखील आहेत. जे तुम्हाला माहीत असायला हवे.
इनफेक्शनचा धोका –
झोपताना मोजे घालायचे असतील तर ते प्रत्येकवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे. जुने अथवा सतत वापरलेले मोजे घालल्यामुळे तुमच्या शरीराला इनफेक्शनचा धोका वाढतो. कारण पायाला मोजे घातल्यामुळे घाम येतो आणि हा घाम मोज्यांमध्ये मुरतो. जर तुमचे मोजे सुती नसतील तर सतत घाम येण्यामुळे तुमच्या पायाचे आरोग्य बिघडू शकते.
रक्ताभिसरण बिघडण्याची शक्यता –
रात्री मोजे घातल्यामुळे तुमच्या शरीराचे रक्ताभिसरण सुधारत असले तरी कधी कधी याचा विपरित परिणामही जाणवू शकतो. कारण जर तुम्ही तुमच्या पायापेक्षा घट्ट, हवा खेळती राहणार नाही असे मोजे घातले तर त्यामुळे पायाच्या रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो. याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीराच्या रक्ताभिसरणावर होण्याची शक्यता असते.
शरीराच्या तापमानात बदल –
हिवाळ्यात मोजे घालणं गरजेचं आहे कारण त्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहते. मात्र जर तुम्ही चुकीचे म्हणजेच हवा खेळती न राहणारे मोजे घातले तर यामुळे तुमच्या पायाचे तापमान अचानक वाढून तुम्हाला ओव्हर हिटिंगचा त्रास होऊ शकतो. कारण शांत झोप येण्यासाठी तुमच्या शरीराचे तापमान अती प्रमाणात कमी अथवा अती प्रमाणात जास्त वाढून चालणार नाही. यासाठीच नेहमी झोपताना सुती, हवेशीर मोजेच घालावे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
हिवाळ्यात कधीच करू नका ‘या’ चुका
पावलांना येणारा घामाचा वास घालवण्यासाठी करा या सोप्या टिप्स
पायांच्या भेगांपासून होतोय त्रास तर, घरच्या घरी करा ‘हे’ उपाय (How To Heal Cracked Heels In Marathi)
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade