पुस्तकं

10 बेस्ट प्रेरणादायी पुस्तके (Best Motivational Books To Read In Marathi)

Trupti Paradkar  |  May 10, 2021
10 बेस्ट प्रेरणादायी पुस्तके (Best Motivational Books To Read In Marathi)

पुस्तकांमधून आपल्या ज्ञानाची कवाडे हळू हळू उघडली जातात. लहानपणी अगदी शालेय जीवनापासून आपली पुस्तकांची ओळख होते. पुढे शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त अवांतर वाचन करण्याची सवय जडते आणि पुस्तकरूपी मित्र आपल्या जीवनात येतात. जगात निरनिराळ्या विषयांवरील पुस्तके आहेत. त्यामुळे आपण आपली आवडनिवड पाहून करमणुकीसाठी पुस्तकांचा छंद जोपासतो. मात्र पुस्तके आपलं केवळ मनोरंजन करतात असं नाही. अशी अनेक मराठीतील दर्जेदार साहित्य अर्थात पुस्तके आहेत जी वाचल्यामुळे आजवर अनेकांना जगण्याचं बळ मिळालं आहे. जीवन जगण्याची कला शिकवणारी, जीवनात प्रोत्साहन देणारी प्रेरणादायी पुस्तके (best motivational books to read in marathi)  यासाठी आपल्या वाचनात असायलाच हवी. 

मन में है विश्वास (Man Mein Hai Vishwas)

लेखक – विश्वास नांगरे पाटील

पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे विचार नेहमीच तरूणांना प्रेरणादायी ठरले आहेत. व्याखानामधून त्यांनी व्यक्त केलेला त्यांचा जीवनप्रवास अनेकांना प्रोत्साहित करतो. विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचे विचार आणि त्यांचा आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास पुस्तकांमधून पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. एका ग्रामीण भागातून आलेल्या तरूणाने केलेला संघर्ष आणि उत्तुंग अशी घेतलेली गगन भरारी नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे ज्यांना पोलीस दलात करिअर करायचे आहे, ज्यांना आयुष्यात एखाद्या अपयशाला सामोरं जावं लागलं आहे, ग्रामीण भागातून आल्याचा न्यूनगंड ज्यांच्या मनात आहे त्यांनी मन मे है विश्वास एकदा तरी वाचायलाच हवं. काही जणांना कदाचित हे पुस्तक थोडं आत्मकेंद्रित आहे असं वाटेलही पण या विश्वास नांगरे पाटील यांची मेहनत आणि जिद्द पाहून आपण आयुष्यात असंच काही तरी करावं अशी इच्छादेखील नक्कीच निर्माण होईल. यासाठीच यासोबत वाचा विश्वास नांगरे पाटील कोट्स 

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार (You Are The Architect Of Your Destiny)

लेखक – सदगुरू श्री वामनराव पै

जीवनविद्या मिशन या शैक्षणिक, सेवाभावी, सामाजिक संस्थेचे प्रणेते समाजसुधारक, तत्त्वज्ञ सदगुरू श्री वामनराव पै यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. जीवनविद्या तत्त्वज्ञानामधील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” कारण या तत्वज्ञानानुसार आपले आयुष्य आपण आपलेच विचार, उच्चार आणि आचार यांच्यामार्फत आपण घडवत असतो. मात्र याबाबत अज्ञान असल्यामुळे माणसाचा जीवनाकडे  पाहण्याचा दृष्टिकोन हा  नेहमीच दैववादी, प्रारब्धवादी, नशीबवादी असतो. वास्तविक निसर्गाने माणसाला कर्म स्वातंत्र्य दिलेले आहे. या गोष्टीचा शहाणपणाने वापर करत आपले जीवन आपण कसे घडवायचे याबद्दल यात सखोल मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या पुस्तकांच्या आजवर लाखो प्रती लोकांपर्यंत पोहचल्या आहेत आणि अनेकांनी या तत्त्वज्ञानाचे आचरण करून आपले सुंदर जीवनशिल्प देखील घडवले आहे. यासोबतच वाचा जीवन जगताना मानसिक समाधान देणारे हे आध्यात्मिक सुविचार 

अग्निपंख (Agnipankh)

लेखक – डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवासदेखील अनेकांना प्रेरणा देणारा आहे. आजवर आपण शाळा, कॉलेजमधून त्यांच्याबद्दल नक्कीच ऐकलं असेल. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी बक्षीस म्हणून अग्निपंख दिलं जातं. यामागचा उद्दिष्ट या पुस्तकातील ज्ञानाने त्या विद्यार्थ्यांची अधिकाधिक प्रगती व्हावी हा असतो. डॉ. कलामाचे विचार आणि कार्य पाहून आपल्या मनात नवचेतना निर्माण होते. या पुस्तकात डॉ. कलाम यांचे बालपण, जडणघडण, शाळेतील दिवस, शास्त्रज्ञ ते राष्ट्रपती होण्यापर्यंतचा प्रवास रेखाटण्यात आलेला आहे. राष्ट्रभक्तीने प्रेरीत डॉ. कलामांचा हा जीवनप्रवास तुम्हाला जीवनात यशाच्या पायऱ्या चढताना नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल.

सावरकरांचे विचार सावरकरांच्या जयंतीनिमित्त

माझी आत्मकथा (Mazi Atmakatha)

लेखक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारताला अनेक थोर समाजसुधारकांचा वारसा लाभलेला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे चरित्र या पुस्तकातून तुमच्या समोर येते. बाबासाहेबांच्या आयुष्यातील घटनांना ज. गो. संत यांनी कथेच्या  स्वरूपात यात गुंफलेले आहे. बाबासाहेबांना त्यांचे चरित्र स्वतः लिहायचे होते मात्र त्यांना कामाच्या व्यापातून यासाठी वेळ मिळाल नाही. त्यामुळे ज. गो. संत यांनी बाबासाहेबांचे अनेक लेख यात संकलित केले आहेत. या पुस्तकात डॉ. बाबासाहेब यांचे जुने फोटोदेखील असल्यामुळे वाचताना स्वतः बाबासाहेब तुमच्यासोबत संवाद साधत आहेत असा तुम्हाला भास होत राहतो. तेव्हा मराठी प्रेरणादायी पुस्तकांच्या (top motivational books in marathi) यादीत डॉ. आंबेडकरांचे चरित्र तुमच्याजवळ अवश्य ठेवा. यासोबतच प्रत्येकाने वाचायलाच हव्या या मराठी ऐतिहासिक कादंबरी यादी 

वाचा – Love Story Book In Marathi

सावरकर एक धगधगते अग्निकुंड (Savarkar Ek Dhagadhagat Agnikunda)

लेखक – वि.र. काळे

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे विचार म्हणजे समाजासाठी जणू एक धगधगते अग्निकुंडच आहे. या अग्निकुंडातील असंख्य ज्वालारूपी विचार अनेकांना प्रेरणा देणारे ठरू शकतात. त्यांचे चरित्र म्हणजे राष्ट्रप्रेम, निष्ठा, हिंदुत्व, विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिमत्तेचे अलौकिक दर्शनच. काळाच्या पुढे विचार करणारे सावरकर एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. सावरकरांचे विचार भविष्यातही राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्तीसाठी प्रेरणा देणारे ठरतील. त्यामुळे प्रत्येकाने सावरकरांचे हे चरित्र नक्कीच वाचायला हवे. 

मुसाफिर (Musafir)

लेखक – अच्युत गोडबोले

अर्थशास्त्र, संगीत, साहित्य, राजकारण, समाजशास्त्र आणि कंम्युटरसारख्या क्षेत्रात मुशाफिरी करण्याची संधी या निमित्ताने लेखक अच्युत गोडबोले यांच्यामुळे तुम्हाला मिळू शकते. लेखकाने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीचा वेध मुशाफिरमधून घेतलेला आहे. त्यांच्या या सर्व विषयांमधील सखोल अभ्यासाचा वाचकांना नक्कीच फायदा होऊ शकतो. अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या सोलापूरच्या शाळेपासून ते थेट आयआयटी पर्यंत आणि आदिवासी भागापासून ते थेट अमेरिकेतील आयटी क्षेत्रापर्यंतचा प्रवास मांडला आहे. लेखकाच्या बुद्धीमत्तेला चिंतनाची जोड मिळालेली आहे त्यामुळे वाचकांनना एकाचवेळी अनेक क्षेत्रातील माहिती आणि यशाचा मंत्र यातून मिळू शकतो. 

प्रकाशवाटा (Prakashwata)

डॉ. प्रकाश आमटे 

मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचा जीवनप्रवास त्यांनी प्रकाशवाटामधून मांडलेला आहे. आनंदवन, हेमलकसा सारख्या दुर्गम भागात गेली अनेक दशकं घालवलेला काळ, आदिवासी लोकांच्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी केलेले अथक प्रयत्न यावर यात प्रकाश टाकलेला आहे. आदिवासींसाठी आयुष्य वेचणाऱ्या आमटे कुटुंबाचा सेवाभाव, या प्रवासात अनेकदा आलेले कसोटीचे प्रसंग आणि प्रयत्नपूर्वक केलेली मात, हेमलकशामधील पोरक्या झालेल्या जंगली प्राण्यांसाठी असलेला उदार भाव पाहून प्रत्येकाचं मन भारावून जातं. आता या जीवनाचा एक भाग झालेल्या प्रकाश आमटेंचे उदार विचार ऐकून आपल्याला देखील समाजासाठी काहितरी चांगलं करण्याची प्रेरणा मिळते.

महानायक (Mahanayak)

लेखक – विश्वास पाटील 

महानायक ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. याचे लेखक विश्वास पाटील असून 2005 मध्ये राजहंस प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक थोर देशभक्त होते त्यांनी देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले होते. नेताजींच्या आयुष्याचा हा प्रेरणादायी इतिहास जाणून घ्यायचा असेल तर महानायक कादंबरी वाचायलाच हवी. कारण महानायक वाचता वाचता हळू हळू तुम्हाला तुमच्या आयुष्याचं देखील महत्त्व कळू लागतं, अचानक जगण्याचा एक नवा दृष्टिकोन तुम्हाला मिळू शकतो. म्हणूनच महानायक हे एक एक प्रेरणादायी पुस्तक (Best Motivational Books In Marathi) आहे आणि प्रत्येकाने ते एकदातरी वाचायलाच हवे. 

मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा (How To Win Friends And Influence People)

लेखक – डेल कार्नेजी

डेल कार्नेजी यांची सर्वच पुस्तके जीवनाला नवी दिशा देणारी आहेत. मात्र जर तुम्हाला सुसंवादाचे तंत्र शिकून घ्यायचे असेल, नात्यातील गोडवा वाढवायचा असेल आणि लोकांवर चांगली छाप पाडायची असेल तर हे पुस्तक तुम्ही वाचायलाच हवे. कारण जीवन जगत असताना आपण अनेक लोकांच्या संपर्कात येत असतो. या लोकांशी जर आपण चांगला संवाद करू शकलो, लोकांना मनाने जोडू शकलो तर याचा तुमच्या जीवनावर नक्कीच चांगला परिणाम होतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी डेल कार्गेजीने दिलेला हा एक कानमंत्रच आहे असं म्हणण्यास काहीच हरकत नाही.

एक होता कार्व्हर (Ek Hota Carver)

लेखिका – वीणा गवाणकर

एक होता कार्व्हर म्हणजे जॉर्ज वॉशिग्ंटन कार्व्हर यांचा जीवनप्रवास आहे. शरीर प्रकृती अशक्त असल्यामुळे झाडं, फुलं, प्राण्यांच्या सहवासात रमणाऱ्या कार्व्हरने यशाच्या एक पायऱ्या कशा सर केल्या हे यात उत्तमरित्या मांडण्यात आलं आहे. प्रत्येक लहान मुलाने वाचावे असे हे एक चांगले पुस्तक आहे. कार्व्हरच्या कष्ट आणि सकारात्मक दृष्टिकोनाला अक्षरशः सलाम आहे. व्यक्तिचे कतृत्त्व त्यांच्या बाह्य सौदर्यांत नाही तर त्याच्या गुणांमध्ये आणि बुद्धीमत्तेवर असते हे यातून सिद्ध होत जाते. मुलांमध्ये चांगल्या गुणांचे बीजारोपण करायचे असेल तर मुलांना अशी  चांगली पुस्तके वाचायला द्यायला हवे. 

प्रेरणादायी पुस्तकांबद्दल निवडक प्रश्न – FAQ’s

1. मी स्वतःला जीवनात कसं प्रोत्साहित करू शकते ?

चांगले विचार नेहमीच जीवनाला प्रेरणा देतात. यासाठीच चांगली पुस्तके वाचून अथवा चांगली पुस्तके ऑडिओबुकवर ऐकून तुम्ही स्वतःला प्रोत्साहित करू शकता. यासाठी वर दिलेली प्रेरणादायी पुस्तके नक्की वाचा (best motivational books to read in marathi)

2. प्रत्येकाने वाचावं असं प्रेरणादायी पुस्तक कोणतं ?

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पुस्तके आपल्याला दिशा दाखवत असतात. मात्र जर तुम्हाला लहानांपासून थोरांपर्यंत वाचता येईल असं उत्तम पुस्तक मराठीतून (Best Motivational Books To Read In Marathi) हवं असेल तर तुम्ही वरीलपैकी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, अग्निपंख, एक होता कार्व्हर नक्कीच वाचू शकता.

3. मनाला प्रोत्साहित करणारा उत्तम सुविचार अथवा मोटिवेश्नल कोट्स कोणता ?

आमच्या मते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा एक उत्तम सुविचार आहे. हा सुविचार सदगुरू श्री वामनराव पै यांनी जगाला दिलेला आहे. या विचारानुसार तुमचे जीवनशिल्प फक्त तुम्हीच घडवू शकता. तेव्हा नशिबावर अवलंबून न राहता चांगले कर्म करा आणि सुंदर जीवन घडवा.

Read More From पुस्तकं