घरात बाळ असेल तर त्याच्या वाढीचे टप्पे पाहायला पालकांना काय घरातील इतरांनाही आवडते. रांगणारे बाळ, हात घट्ट पकडणारे बाळ, खाणारे बाळ सगळे कसे कौतुकास्पद असते. आपण दिवसभर काय करतो? त्यावर बाळाच्या मेंदूचा विकास अवलंबून असतो. बाळाच्या मेंदूचा विकास योग्य व्हावा असे वाटत असेल तर बाळांसोबत तुम्ही दिवसभर काय काय गोष्टी करायला हव्यात त्या आज आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरुन बाळांच्या मेंदूचा विकास होण्यास मदत मिळेल. इतकेच नाही तर बाळांसोबत वेळ योग्य कसा घालवावा हे देखील तुम्हाला कळेल.
हल्लीच्या काळात खूप जणांना बाळ सांभाळायला तितकासा वेळ नसतो. त्यामुळे होते असे की, मुलांना फोन हातात देऊन पालक आपला माग सोडवून घेतात. यामुळे बाळांच्या मेंदूचा विकास होत नाही तर लहान मुलं अलिप्त होतात. आणि मुले उद्धटही होतात.
रंग ज्ञान
मुलांना डोळ्यासमोर काही गोष्टी दिसल्या की, ते पटकन त्याकडे बघतात. त्यामुळे त्यांची दृष्टी ही अधिक चांगली होण्यास मदत मिळते. मुलांसमोर वेगवेगळी चित्रे आणून दाखवा. ती दाखवल्यामुळे वेगवेगळे रंग आणि चित्र त्यांच्यापुढे येतात. त्यामुळे त्यांना मजा तर येते. पण रंगाची ओळख होण्यास फार चांगली मदत मिळते. मुलांना चित्र किंवा रंग दाखवताना ते ब्राईट असायला हवेत. म्हणजे गडद आणि फ्रेश असे रंग मुलांना दाखवा. उदा. लाल, पिवळा, निळा, गुलाबी असे रंग मुलांना दाखवल्यामुळे पुढे जाऊन त्यांना त्याची ओळख होण्यास मदत मिळते.
स्पर्श ज्ञान
स्पर्श ज्ञान हे कालांतराने मुलांना शिकवले जाते. पण लहान बाळ असतानाच मुलांना तुम्ही स्पर्श ज्ञान शिकवू शकता. कारण बाळ या गोष्टी पटकन शिकते. एखादा कागद, कापड, उशी, खरखरीत, अणुकुचीदार अशा सगळ्याचा स्पर्श अगदी हळुवारपणे त्यांना द्या. असे केल्यामुळे मुलांना चांगला स्पर्श किंवा एखाद्या गोष्टीचा स्पर्श कसा आहे ते कळते. स्पर्श ज्ञान शिकवताना तुम्ही काही फळांचा उपयोगही करु शकता. त्यामुळे मुलांच्या इंद्रियांच्या संवेदना अधिक सक्षम होतात.
मुलांसमोर बोलणे
बाळांनी लवकर बोलावे असे वाटत असेल तर तुम्ही मुलांशी संवाद साधणे फारच जास्त गरजेचे असते. बाळांशी संवाद साधायचा प्रयत्न करा. अगदी लडिवाळपणे किंवा लाडात तुम्ही त्याला काही प्रश्न विचारा किंवा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करा. लगेचच बाळाच्या चेहऱ्यावरील भाव बदलून जातात.त्यांनाही आपण काही तरी बोलावे असे वाटते. ही एक चांगली गोष्ट आहे. यामुळे मुलांचे कान अधिक तीक्ष्ण होतात. इतकेच नाही तर ते बोलण्यासाठी तोंडाची हालचाल करु लागतात. आनंद, राग हे भाव त्यांना लगेच कळून येतात.
गा आणि नाचा
मुलांसमोर बोलण्यासोबतच तुम्ही त्यांच्यासोबत मस्त गाणे गा किंवा अंगाची हालचाल म्हणून नाचा. तुम्ही जसे करता त्याची नक्कल करायला बाळं तयार असतात. त्यामुळे अंगाची हालचाल करु पाहतात. तुम्ही जर एखादा हावभाव किंवा नक्कल केली की, ते तसे करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचा मेंदू अधिक तयार होण्यास मदत मिळते.
बाळाच्या मेंदूची वाढ होण्यासाठी या गोष्टी पालकांनी अगदी अवश्य कराव्यात