केसांची योग्य निगा राखण्यासाठी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींबाबत सावध असायला हवं. तुम्ही केसांसाठी कोणतं तेल, शॅम्पू, कंडिशनर निवडता याचप्रमाणे तुम्ही केस कोणत्या पाण्याने धुता हे ही खूप महत्त्वाचे आहे. कारण जरी तुम्ही खूप महागडे हेअर स्पा करत असाल, केसांसाठी योग्य शॅम्पू आणि कंडिशनर वापरत असाल मात्र केस गरम पाण्याने धुत असाल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. गरम पाणी केस आणि त्वचेसाठी हानिकारक आहे हे तर तुम्हाला माहीत असेलच यासाठीच केस नेमके कोणत्या पाण्याने धुवावे हे अवश्य जाणून घ्या.
Shutterstock
गरम पाण्याने केस धुतल्यामुळे काय नुकसान होते –
गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे अथवा केस धुण्यामुळे तुम्हाला काही क्षणांसाठी खूप बरे आणि फ्रेश वाटू शकते. मात्र यामुळे तुमच्या त्वचा आणि केसांचे खूप नुकसान होऊ शकते. कारण यामुळे तुमच्या स्काल्पचे पोअर्स आणि केसांचे क्युटिकल्स मोकळे होतात. ज्यामुळे त्यांच्यामधील मऊपणा निघून जातो आणि ते कमजोर होतात. स्काल्प आणि केस मजबूत राहण्यासाठी त्यांना नैसर्गिक तेलाची आणि मऊपणाची गरज असते. मात्र गरम पाण्यामुळे केस खोलवर स्वच्छ झाल्यामुळे ते कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. असे कमजोर, कोरडे झालेले केल लवकर तुटतात, गळतात. यासाठीच कोणत्याही सिझनमध्ये अती गरम पाण्याने कधीही केस धुवू नका. गरम पाण्याच्या ऐवजी तुम्ही कोमट पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करू शकता. कारण कोमट पाण्यामुळे तुमचे केस स्वच्छही होतात आणि त्यांचे फार नुकसान होत नाही.
Shutterstock
केस धुण्यासाठी थंड पाणी वापरण्यामुळे काय होतं –
थंड पाण्याचा गरम पाण्याच्या अगदी उलट परिणाम होतो. थंड पाण्याचा तुमच्या स्काल्पचे पोअर्स आणि केसांचे क्युटिकल्सवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे ते बंदच राहतात आणि तुमच्या केसांचा मऊपणा टिकून राहतो. केसांना शॅम्पू अथवा कंडिशनर केल्यानंतर केस थंड पाण्याने धुतल्यास त्या शॅम्पू आणि कंडिशनरचा परिणाम केसांवर लगेच होतो. ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार दिसू लागतात. केसांना सुंदर टेक्चर मिळते. केसांमधील नैसर्गिक तेल निघून न गेल्यामुळे केसांचे योग्य पोषण होते.
मात्र ज्यांचे केस अतिशय पातळ आणि नाजूक आहेत. त्यांचे केस थंड पाण्याचा वापर केस धुण्यासाठी केल्यामुळे एकदम सपाट आणि आणखी पातळ दिसू शकतात. कारण यामुळे केसांचा व्हॉल्युम कमी होतो. त्यामुळे अशा लोकांना केस थंड पाण्याने धुतल्याचा हवा तसा फायदा होईलच असं नाही. अशा लोकांना केस कोमट पाण्याने धुतल्यास चांगला फायदा होऊ शकतो. लक्षात ठेवा केस कोमट पाण्याने धुण्यासोबत तुम्ही वापरत असलेल्या शॅम्पू आणि कंडिशनरमधून केसांना योग्य पोषण मिळत आहे ना याचीही काळजी घ्या. कारण यातून तुमच्या केसांना वेळच्या वेळी पोषण मिळेल आणि ते मजबूत आणि चमकदार होतील.
केस धुण्याची योग्य पद्धत –
- केस कोमट अथवा थंड पाण्याने धुवून घ्या
- तळहातावर थोडा शॅम्पू घ्या त्यात थोडं पाणी टाकून तो डायल्यूट करा.
- शॅम्पू नेहमी तुमच्या स्काल्पसाठी योग्य असा निवडा
- केस आणि स्काल्पवर शॅम्पू लावा आणि केस स्वच्छ धुवा
- गरज असल्यास पुन्हा एकदा केसांवर शॅम्पू लावून केस धुवा
- केसांमधील पाणी निथळून काढा. केस कोरडे करण्यासाठी तुम्ही सॉफ्ट टॉवेल अथवा जुन्या टी-शर्टचा वापर करू शकता
- केसातील पाणी निथळल्यावर केसाच्या टोकाकडील भागावर कंडिशनर लावा
- कंडिशनर कधीच स्काल्पवर लावू नका यासाठी तुमच्या केसांसाठी योग्य असं कंडिनशर निवडा
- कंडिशनर लावल्यानंतर तीन ते चार मिनिटांना केस पुन्हा स्वच्छ धुवा
- केस कोरडे करण्यासाठी नेहमी सुती टॉवेल अथवा जुन्या टी-शर्टचाच वापर करा ज्यामुळे केस तुटणार नाहीत.
- केस रगडून अथवा घासून पुसू नका. ते फक्त टॉवेलने टिपून घ्या आणि कोरडे करा
- केस वाळण्याआधी केसांवर चांगलं हेअर सिरम लावा
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
पांढरे केस काळे करण्यासाठी आवळ्यापासून तयार करा नॅचरल डाय
जाणून घ्या डॅन्ड्रफ आणि ड्राय स्काल्प यातला फरक कसा ओळखावा
हेअर टाईप बघून निवडा हेअर मास्क, मिळवा बाऊन्सी आणि चमकदार केस