Diet

#sugarcraving कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

Trupti Paradkar  |  Aug 1, 2019
#sugarcraving कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

भारतीय संस्कृतीत आनंद साजरा करण्यासाठी गोड पदार्थ खाण्याची पद्धत आहे. त्यामुळे सण-समारंभाला, आनंदवार्ता समजल्यावर घरात लगेच गोडधोड केलं जातं. भारतात प्रत्येक प्रातांत विविध प्रकारचे गोड पदार्थ बनविले जातात. असे विविध प्रकारचे गोड पदार्थ पाहिले की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. मात्र या गोड पदार्थांचा जेव्हा अतिरेक होऊ लागतो तेव्हा त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागतात. शिवाय आजकाल मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकारासारखे लाईफस्टाईल विकार वाढत आहेत. पूर्वी “साखरेचे खाणार त्याला देव देणार”  मात्र आता “साखरेचं खाणार त्याला देव नेणार” असं म्हणावं लागत आहे. थोडक्यात आजच्या काळात प्रत्येकाने गोडधोड पदार्थ खाण्यावर स्वतःहून नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. खरंतर फिट राहण्यासाठी आपण साखरेचे प्रमाण आराहातून कमी करण्याचा काटोकाट प्रयत्न करत असतो. मात्र गोड पदार्थ खाण्याचा मोह अथवा शूगर क्रेविंग कमी करणं ही सोपी गोष्ट मुळीच नाही. यासाठी काय प्रयत्न करावे हे जरूर वाचा.

Shutterstock

गोड पदार्थ खाण्याचा मोह टाळण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

आहारातील साखरेचे प्रमाण हळूहळू कमी करा

बऱ्याचदा साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही अचानक गोड पदार्थ आहारातून कमी करता. मात्र असं करू नका कारण त्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा अधिक तीव्र होऊ शकते. गोड पदार्थ आहारातून हळूहळू प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही दिवसभरात जर दोन ते तीन वेळा गोड पदार्थ खात असाल तर ते तुम्ही हळूहळू दिवसभरात एकदा पुढे आठवड्यातून एक ते दोन वेळा आणि नंतर पूर्णपणे कमी करत जा. दोन्ही वेळच्या जेवणानंतर तुम्हाला गोड खाण्याची सवय असेल तर फक्त दुपारच्या जेवणानंतर गोड खा. रात्रीच्या जेवणानंतर गोड खाणं कमी करा.

हेल्दी स्वीटनर इन मराठी बद्दलही वाचा

आहारात नैसर्गिक साखर असलेले पदार्थ घ्या

ज्यांना गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते त्यांनी आहारातून नैसर्गिक पद्धतीने साखर घेण्यास सुरूवात करावी. म्हणजेच मिठाई, केक, चॉकलेट, आईस्क्रीम असे पदार्थ खाण्यापेक्षा गोड फळं, भाज्या असे पदार्थ आहारात वाढवावे. ज्यामुळे या नैसर्गिक पदार्थांमधून मिळणारी साखर तुमच्या शरीराची गोड खाण्याची इच्छा तृप्त करू शकेल. शिवाय या नैसर्गिक पदार्थांमधून मिळणाऱ्या साखरेमुळे तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाणदेखील वाढणार नाही.

घरात गोड पदार्थ साठवून ठेवू नका

बऱ्याचदा जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते यासाठी घरात आपण गोड पदार्थ साठवून ठेवतो. गोड पदार्थ सहज उपलब्ध झाले तर ते खाण्याचा मोह टाळता येणं शक्य होत नाही. यासाठी घरात मिठाई, चॉकलेट,आईस्क्रीम फ्रीजमध्ये साठवून ठेवू नका.

मुबलक प्रमाणात पाणी प्या

दिवसभरात तुम्ही मुबलक पाणी प्यायला तर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा कमी प्रमाणात निर्माण होऊ शकते. एका संशोधनानुसार माणसाला दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी पिण्याची गरज असते. जेव्हा तुम्ही मुबलक प्रमाणात पाणी पिता तेव्हा तुमचं शरीर हायड्रेट राहतं आणि शूगर क्रेविंग कमी होतं. 

गुळ घातलेले गोड पदार्थ घरीच करून खा

साखरेचे प्रमाण वाढल्यास शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. बाजारात विकत मिळणाऱ्या पदार्थांमध्ये मोठ्याप्रमाणावर साखर वापरण्यात येते. जर तुम्हाला गोड पदार्थ खाण्याचा मोह आवरता येत नसेल तर कमी प्रमाणात घरी तयार केलेल गोड पदार्थ खा. शिवाय घरी केलेल्या पदार्थांमध्ये तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर करा. गुळ आरोग्यासाठी चांगला असतो. त्यामुळे गुळाचा वापर केलेले पदार्थ कधीतरी खाण्यास काहीच हरकत नाही.

नियमित व्यायाम करा

व्यायामाचा  शरीर आणि मन दोघांवर चांगला परिणाम होत असतो. जर तुम्ही नियमित व्यायाम केला तर गोड खाऊनदेखील तुमचे शरीर सुदृढ राहील. शिवाय व्यायामाने तुम्हाला गोड कमी खाण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहनदेखील मिळेल. 

अधिक वाचा

‘या’ कारणांसाठी पावसाळ्यात हे पदार्थ मुळीच खाऊ नका

#WeightLoss : वजन कमी करण्यासाठी करा बर्फाचा वापर

वजन कमी करण्यासाठी जमिनीवर बसून जेवणे ठरेल फायदेशीर

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

Read More From Diet