उवा हा केसांमध्ये राहणारा एक कीटक आहे. अस्वच्छता आणि अव्यवस्थित राहणीमान यामुळे उवांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. उवा होणं हा कोणताही आजार नाही मात्र योग्य काळजी न घेण्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे तुम्हाला उवांचा सामना करावा लागू शकतो. वास्तविक उवा कोणत्याही वयोगटाच्या लोकांना होऊ शकतात. मात्र बऱ्याचदा शाळेत अथवा वसतीगृहातील लहान मुलांना एकत्र राहिल्यामुळे उवा होऊ शकतात. अशावेळी मुलांकडे वेळीच लक्ष दिले नाहीतर त्यांना याचा त्रास होऊ शकतो. कारण उवा दर पाच तासांनी केसांच्या मुळांमधून त्वचेतील रक्त शोषून घेतात. ज्यामुळे डोक्यात आणि टाळूला खाज येणे, त्वचेला जळजळ, दाह असे त्रास होण्याची शक्यता असते.
Table of Contents
- उवा आणि लिखा यामध्ये नेमका काय फरक असतो (What Is Lice And Nits)
- उवा होण्याची कारणे (Causes Of Lice And Nits)
- उवा झाल्यामुळे तुमच्या केसांवर काय परिणाम होतो (How Lice And Nits Can Affect Your Hair)
- उवांची वाढ अधिक होऊ नये यासाठी प्रतिबंधनात्मक उपचार (Precautions To Prevent The Growth Of Lice And Nits In Hair)
- डोक्यातल्या उवा मारण्यासाठी उपाय (Home Remedies For Lice)
- लिखा मारण्यासाठी घरगुती उपचार (Uva Likha Upay)
- उवांसाठी मेडिकल उपचार (Medical Treatment)
- उवांबाबत मनात येणारे प्रश्न (FAQ’s)
उवा आणि लिखा यामध्ये नेमका काय फरक असतो (What Is Lice And Nits)
उवा या कीटकाच्या अंड्यांना लिखाअसं म्हणतात. उवा साधारणपणे डोक्यावरच्या, जांघेतील, काखेतील, पापण्यावरच्या केसांवर अंडी घालतात. काही दिवसात या अंड्यांमधून लिखा बाहेर पडतात. उवांची अंडी अस्वच्छतेमुळे केसांच्या मुळांना चिकटून राहतात. ज्यामुळे उवांचे प्रजोत्पादन लवकर होते. एक उ महिन्याभरात जवळ जवळ 150 अंडी घालतात. उवांचा रंग काळसर असून त्यांची अंडी म्हणजेच लिखा पांढरट रंगाची असतात.
उवा होण्याची कारणे (Causes Of Lice And Nits)
- उवा या संसर्गातून वाढतात. म्हणजेच शाळेत जाण्याऱ्या मुलांमध्ये जवळ बसणे, डोक्याला डोकं लावणे, एकत्र खेळणे, खाणे यामुळे उवा अथवा लिखा एकमेकांच्या डोक्यात शिरतात.
- बऱ्याचदा पावसात भिजणे, अस्वच्छता यामुळेदेखील उवा होतात.
- उवा झालेल्या लोकांसोबत झोपणे, त्यांचा कंगवा वापरणे, एकत्र राहणे, त्यांचे कपडे वापरणे यामुळेदेखील उवा होऊ शकतात.
उवा झाल्यामुळे तुमच्या केसांवर काय परिणाम होतो (How Lice And Nits Can Affect Your Hair)
सर्वप्रथम उवाची अंडी दिसत नसल्यामुळे उवा झालेल्या समजत नाहीत. मात्र जेव्हा त्या अंड्यांमधून मोठ्या प्रमाणावर लिखा आणि उवांची निर्मिती होते तेव्हा मात्र डोक्याला खाज येऊ लागते. उवा आणि लिखा केसांच्या मुळांना चिकटून राहत असल्यामुळे त्वचेला एकप्रकारची जळजळ होऊ लागते. उवा केसांच्या मुळांमधून माणसाच्या शरीरातील रक्त पिऊ लागतात. ज्यामुळे केस आणि त्वचेला दाह जाणवू लागतो.
उवांची वाढ अधिक होऊ नये यासाठी प्रतिबंधनात्मक उपचार (Precautions To Prevent The Growth Of Lice And Nits In Hair)
- शाळेतील जाणाऱ्या मुलांच्या केसांची अधिक काळजी घ्या कारण लहान मुलांच्या डोक्यात उवा पटकन शिरतात.
- उवा झाल्यास त्यावर ताबडतोब घरगुती उपचार करा.
- उवा काढण्ययासाठी एक विशिष्ठ प्रकारचा कंगवा मिळतो. केस धुतल्यानंतर लगेचेच त्या कंगव्याने केस विंचरावे. ज्यामुळे तुमच्या डोक्यातील उवा कमी होतील. नियमित हा उपाय केल्यास उवा कमी होऊ शकतात.
- उवा झालेल्या व्यक्तीच्या सर्व वस्तू, कंगवे, कपडे उकळत्या पाण्यातून काढणे. कारण गरम पाण्यात उवा जिंवत राहू शकत नाहीत. त्याचप्रमाणे उवा केसांमधून बाहेर काढल्यावर एक दिवसाच्या वर जिंवत राहू शकत नाहीत. लिखा मात्र कमीत कमी दहा दिवस केसांबाहेर जिंवत राहू शकतात.
- घरातील बेड, सोफा, कपडे व्हॅक्युम क्लिनरने स्वच्छ करा.
- अनोळखी व्यक्तीचे कपडे, कंगवा, टोपी, उशी, हेअर क्लिप्स, पांघरून वापरू नका.
- पार्लरमध्ये सौंदर्योपचार घेताना शक्य असल्यास स्वतःची साधने वापरा. ज्यामुळे इतरांच्या संपर्कात आलेल्या साधनांमुळे तुमच्या केसांमध्ये उवा होणार नाहीत.
- कोणत्याही घरगुती उपचाराने उवा कमी झाल्या नाहीत तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्यामुळे मेडिकल उपचारांनी उवा कमी करता येतील.
वाचा – धूप लावण्याचे फायदे
डोक्यातल्या उवा मारण्यासाठी उपाय (Home Remedies For Lice)
उवा मारण्यासाठी अनेक घरगुती उपचार करता येतात. आपल्या घरात अनेक निर्जंतूकीकरण करणाऱ्या नैसर्गिक गोष्टी असतात. त्यांचा वापर करून तुम्ही अगदी सहज केसांमधील उवांना नष्ट करू शकता.
नारळाचे तेल आणि कापूर
केसांमधील उवा कमी करण्यासाठी केसांना नारळाच्या तेलामध्ये कापूर विरघळवून लावा. ज्यामुळे तुमच्या केसांमधील उवा नक्कीच कमी होऊ शकतील. कापराला एक प्रकारचा विशिष्ठ गंध असतो. ज्यामुळे कापूर लावल्यावर केसांना थंडावा आणि कापराचा वास येऊ लागतो. उवा या वासामुळे मरतात आणि केसांबाहेर पडतात. शिवाय कापूर आणि नारळाच्या तेलाचा केसांच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणामदेखील होत नाही.
कांद्याचा रस
कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सल्फर असतं. ज्यामुळे जेव्हा तुम्ही कांद्याचा रस केसांच्या मुळांना लावता तेव्हा केसांमधील उवांचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते. केसांमध्ये कांद्याचा रस लावल्याने या रसामुळे उवा लगेचच मरू लागतात. म्हणूनच कांद्याचा रस लावल्यावर केस काही मिनीटे बांधून ठेवा. अर्धा ते एक तासाने केस थंड पाण्याने धुवा आणि विंचरून घ्या. ज्यामुळे केसांमधून मेलेल्या उवा बाहेर पडतील.
सीताफळाच्या बिया
या उपायाने (kesatil uva upay) तुमच्या केसांमधील उवा नक्कीच नष्ट होऊ शकतात. यासाठी सिताफळाच्या बिया मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. या बीयांची पावडर वस्त्रगाळ करा. कारण ती डोळ्यांमध्ये गेल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. गाळलेली पावडर नारळाच्या तेलात मिसळून केसांना लावा. ज्यामुळे केसांमधील उवा नष्ट होण्यास मदत होईल.
लसूण
लसणाचा वास अतिशय उग्र असतो. ज्यामुळे उवांना हा वास सहन होत नाही. यासाठी आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या लिंबाच्या रसामध्ये वाटून घ्या. या मिश्रणाची पेस्ट एकजीव करा. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा. अर्धा तासाने केस कोमट पाण्याने धुवून टाका. ज्यामुळे केसांमधील उवा मरून जातील. मेलेल्या उवा लगेच कंगव्याच्या मदतीने काढून टाका.
हेअर ड्रायर
हेअरड्रायरच्या मदतीनेदेखील तुम्ही केसांमधील उवा कमी करू शकता. कारण उवांना अती उष्णता सहन होत नाही. केसांमध्ये हेअर ड्रायर फिरवल्यास केसांना उष्णता मिळते. या उष्णतेमुळे केसांमधील उवा केसांच्या मुळांपासून बाहेर पडतात. मात्र हा उपाय घरात करू नका. कारण यामुळे उवा तुमच्या घरात अथवा कपड्यांवर पसरण्याची शक्यता असते. त्याऐवजी घराबाहेर केसांवर ड्रायर फिरवून तुम्ही केसांमधून उवांना बाहेर काढू शकता. लक्षात ठेवा हा उपाय लहान मुलांवर करणे टाळा. कारण त्यामुळे लहान मुलांच्या मेंदूला उष्णता लागू शकते. जे त्यांच्या आरोग्यासाठी हितकारक नाही.
लिखा मारण्यासाठी घरगुती उपचार (Uva Likha Upay)
केसांमधील उवांप्रमाणेच लिखांचा म्हणजेच उवांच्या अंड्यावर योग्य उपचार करणे गरजेचे आहे. कारण जर उवा मेल्यापण केसांमध्ये लिखा तशाच असतील तर त्यांचे उवांमध्ये रुपांतर होऊ शकते. दहा दिवसांमध्ये लिखांंमधून उवा बाहेर पडतात. यासाठी केसांमधून लिखांना लवकर नष्ट करणे गरजेचे आहे.
व्हिनेगर
शुद्ध व्हिनेगर केसांना लावल्यामुळे तुमच्या केसांमधील उवा आणि लिखा कमी होऊ शकतात. यासाठी उवा झालेल्या केसांवर हळूवारपणे व्हिनेगर लावून मसाज करा. अर्धा तास ते एक तासाने केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा. केस ओले असतानाच ऊवा काढण्याच्या कंगव्याने केस विंचरा. ज्यामुळे केसांमधील उवा आणि लिखा बाहेर निघतील.
टी ट्री ऑईल
केसांमधील लिखांना मारण्यासाठी हा एक चांगला घरगुती उपाय आहे. यासाठी केसांमध्ये टी ट्री ऑईल लावून बोटांनी हळूवारपणे मसाज करा. एखाद्या स्वच्छ टॉवेलने केस काही मिनीटे झाकून ठेवा. टी ट्री ऑईलमधील अॅरोमामुळे केसांमधील लिखा आणि उवा मरतात. त्यानंतर केस स्वच्छ धुवा आणि केस विंचरून उवा आणि लिखा काढून टाका.
कडूलिंबाचे तेल
कडूलिंब ही एक अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म असलेली औषधी वनस्पती आहे. कडूलिंब अथवा कडूलिंबाच्या पानांच्या रसामुळे तुमच्या डोक्यातील उवा नक्कीच नष्ट होऊ शकतात. यासाठी उवा झालेल्या व्यक्तीच्या केसांमध्ये कडूलिंबाचे तेल लावून मसाज करा अथवा कडूलिंबाची पाने वाटून त्याचा ताजा रस काढा आणि तो केसांच्या मुळांना लावा. कडूलिंबाच्या रस अथवा तेलाच्या वासाने तुमच्या डोक्यातील उवा मरून बाहेर पडतील. शिवाय केसांमधील लिखादेखील मरून जातील. ज्यामुळे तुमच्या केसांमध्ये पुन्हा उवा अथवा लिखा होणार नाहीत. कडूलिंबामुळे तुमच्या केसांमधील त्वचा निंर्जतूक होईल आणि त्वचेला येणारी खाज, जळजळ, दाह कमी होण्यास मदत होईल.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा वापरूनदेखील तुम्ही तुमच्या केसांमधील उवा कमी करू शकता. जर तुम्हाला उवांपासून कायमस्वरूपी सुटका हवी असेल तर नारळाच्या तेलात बेकिंग सोडा मिसळून तो केसांच्या मुळांना लावा. अर्धा तासाने केस न धुता केस बारीक दातांच्या कंगव्याने विंचरून घ्या ज्यामुळे तुमच्या डोक्यातील उवा सोड्याच्या प्रभावाने मरून बाहेर पडतील. नारळाच्या तेलामुळे सोड्याचा तुमच्या केसांच्या त्वचेवर विपरित परिणाम होणार नाही. केसांमधील उवा बाहेर पडल्यावर केस कोमट पाण्याने धुवून टाका. लिखा कमी होण्यासाठी महिन्यातून एकदा हा प्रयोग करा. ज्यामुळे केसांमधील लिखादेखील नष्ट होण्यास मदत होईल.
निलगिरीचे तेल
निलगिरीच्या तेलाला एक उग्र वास असतो. शिवाय या तेलाच्या वासाने कोणतेही जीवजंतू मरू शकतात. यासाठीच डोक्यातील लिखा नष्ट करण्यासाठी हा उपाय जरूर करा. यासाठी दोन चमचे नारळाचे तेल, एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये काही थेंब निलगिरीच्या तेलाचे टाकून हे मिश्रण एकजीव करा. या तेलाने केसांच्या मुळांना हळूवार मसाज करा आणि अर्धा तासाने केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका. निलगिरी तेलाच्या वासाने केसांमधील उवा आणि लिखा मरतात. केस धुतल्यावर कंगव्याने केस लगेच विंचरा.
उवांसाठी मेडिकल उपचार (Medical Treatment)
घरगुती आणि इतर उपचार करून फायदा न झाल्यास उवांवर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही औषधे आणि शॅम्पू वापरून तुम्ही उवा नष्ट करू शकता.
अॅंटि लीस शॅंम्पू
उवा मारण्यासाठी केमिस्टच्या दूकानात अॅंटि लीस शॅम्पू उबलब्ध असतात. ते शॅंम्पू आणून त्याने केस धुवावे. या शॅम्पूच्या प्रभावामुळे उवा मरतात. मात्र यासाठी शॅम्पू नंतर लगेचच उवा काढण्याच्या कंगव्याने केस विंचरून डोक्यातील मेलेल्या उवा काढून टाकाव्या.
पर्मेथ्रीन (Permethrin)
डॉक्टरांच्याकडे उपचार करताना ते या औषधाचा वापर करतात. या औषधाचे लोशन तुमच्या केसांना लावण्यास दिले जाते. हे एक प्रकारचे कीटकनाशक असल्यामुळे या औषधाने तुमच्या डोक्यातील उवा नक्कीच मरू शकतात. मात्र हे औषध डॉक्टरांच्या सल्लानेच घ्यावे कारण त्याच्या प्रमाणात कमी जास्त झाल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते. शिवाय हे औषध तुमच्या तोंडात अथवा डोळ्यांमध्ये जाणार नाही याची विशेष काळजी घ्या.
मॅलॅथिऑन (Malathion)
हे औषध एकप्रकारचे जंतूनाशक असल्याने यामुळे डोक्यातील उवा मरू शकतात. हे औषधदेखील फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लावावे कारण या औषधाचा ओव्हरडोस झाल्यास तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
बेन्झाइल अल्कोहोल (Benzyl Alcohol)
डोक्यातील उवा कमी करण्यासाठी या औषधाचा वापर केला जातो. मात्र उवा कमी करण्यासाठी डॉक्टरांकडून या औषधाचा वापर करून घेण्यापूर्वी तुम्हाला असलेल्या अॅलर्जीची माहिती त्यांना जरूर द्या. कारण या औषधाच्या दुष्परिणामांमुळे तुम्हाला इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
तोंडावाटे घेण्यात येणारे उपचार
उवा मारण्यासाठी डॉक्टर तुम्हाला कधी कधी ओरल औषधे देखील देतात. ज्यामुळे एक ते दोन आठवड्यांमध्ये तुमच्या केसांमधील उवा नष्ट होतील. या आणि अशा अनेक मेडीकल औषधांमुळे तुमच्या डोक्यातील उवा नक्कीच कमी होऊ शकतात. मात्र कोणतेही वैद्यकीय उपचार करताना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उवांबाबत मनात येणारे प्रश्न (FAQ’s)
1. उवा आणि लिखांमधील मुख्य फरक कोणता?
उवा हा केसांमध्ये अस्वच्छतेमुळे अथवा संक्रमणामुळे पसरणारा एक कीटक आहे. उवांच्या अंड्यांना लिख असे म्हणतात. उवा केसांमधून बाहेर काढल्यावर एक दिवसाच्या वर जिंवत राहू शकत नाहीत. लिखा मात्र कमीत कमी दहा दिवस केसांबाहेर जिंवत राहू शकतात. त्यामुळे उवा कमी होण्यासाठी उवांप्रमाणेच लिखा कमी करण्यावर भर दिला पाहिजे.
2. उवा आणि लिखा इतरांच्या केसांमधून आपल्या केसात येऊ शकतात का?
उवा कपडे, पांघरूण, कंगवा, हेअर क्लिप अशा वस्तूंच्या माध्यमातून एकमेकांच्या केसांमध्ये शिरू शकतात. यासाठी उवा असणाऱ्या व्यक्ती अथवा लहान मुलांमध्ये मिसळणे टाळावे.
3. उवा मारण्याच्या औषधांनी केसांचे नुकसान होऊ शकते का?
उवा मारण्यासाठी तयार केलेली औषधे अथवा अॅंटि लीस शॅंम्पू हे केसांना नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन तयार केलेले असतात. मात्र उवा कमी झाल्यावर अथवा संपूर्णपणे नष्ट झाल्यावर केसांवर ही औषधे लावू नयेत. वारंवार या औषधांच्या वापराने केस नक्कीच खराब होऊ शकतात.
4. मीठाच्या पाण्याने उवा मरतात का?
मीठाचे पाणी हे निर्जतूकीकरणासाठी वापरले जाते. त्यामुळे केसांमधील उवा मारण्यासाठी मीठाच्या पाण्याचा वापर नक्कीच केला जाऊ शकतो. हा प्रयोग करताना मीठाचे पाणी तुमच्या डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या.
5. उवा कशामुळे वाढतात?
उवा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे, उवा झालेल्या व्यक्तीच्या वस्तू वापरल्यामुळे, सतत भिजल्यामुळे, केस नियमित न धुतल्यामुळे, केसांची योग्य निगा न राखल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला उवा होऊ शकतात. उवा झाल्यावर त्या लगेच केसांमधून काढून टाकणे गरजेचे आहे. मात्र असे न केल्यास त्यांचे प्रमाण झपाट्याने वाढते.
6. लहान मुलांना उवा होऊ नयेत यासाठी काय करावे?
लहान मुलांना उवा झाल्यास त्यांंच्या डोक्यातून उवा बाहेर काढण्यासाठी लगेच प्रयत्न करावे. कारण लहान मुले शाळेत अथवा खेळताना उवा झालेल्या मुलांच्या संपर्कात आल्यामुळे मुलांच्या केसात उवा वाढू लागतात. जर तुमच्या मुलांच्या डोक्यात उवा झाल्या असतील तर आम्ही दिलेले घरगुती उपाय करून तुम्ही उवा नष्ट करू शकतात.
7. उवा कमी होत नसतील तर काय करावे?
उवा नष्ट करण्यासाठी घरगुती उपाय करून बारीक दातांच्या कंगव्याने केस विंचरावे. ज्यामुळे तुमच्या डोक्यातील उवा नष्ट होण्यास मदत होते. मात्र जर हे उपाय करून तुमच्या अथवा लहान मुलांच्या डोक्यातील उवा कमी झाल्या नाहीत. तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
8. उवा होऊ नयेत यासाठी काय करावे?
उवा होऊ नयेत यासाठी केसांची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. केस वारंवार भिजले आणि सुकले नाहीत की उवा होतात. यासाठी पावसात भिजल्यावर केस लगेच कोरडे करावे. शिवाय आठवड्यातून दोनदा केस स्वच्छ धुवावे. शिवाय उवा झालेल्या लोकांच्या संपर्कात येणे अथवा त्यांनी वापरलेल्या वस्तू वापरणे टाळावे. योग्य खबरदारी घेतल्यास उवा होत नाहीत.