कधीकधी घरी तेच तेच खाऊन कंटाळा येतो. विशेषत: काही भाज्या या अगदी नकोशा होतात. एरव्ही बटाटा हा खूप जणांच्या आवडीचा असला तरीदेखील बटाट्याची भाजी ही अगदी तशीच करुनही कंटाळा येऊ लागतो. पिवळ्या बटाट्याची भाजी, बटाट्याचा रस्सा, तळसलेल्या पिवळ्या बटाट्याची भाजी अशा भाज्या आपण सर्रासपणे करतो. पण तुम्ही कधी चमचमीत अशी दम आलूची रेसिपी करुन पाहिली आहे का? बटाट्याची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी दम आलू हा काश्मिरी रेसिपीचा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करायला हवा. दम आलू ही रेसिपी करणे फारच सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला अगदी थोडेसे साहित्य लागेल. जाणून घेऊया नेमका काश्मिरीची खासियत असलेला हा चमचमीत दम आलू हा प्रकार करायचा तरी कसा
चमचमीत दमआलूची सोपी रेसिपी
घरच्या घरी दम आलू बनवायचा असेल तर जाणून घेऊया त्यासाठीचे साहित्य
साहित्य: बेबी पोटॅटो, काश्मिरी लाल तिखट, दही, धणे पूड, काळे मीठ, चाट मसाला, कसुरी मेथी, लाल तिखट,टोमॅटो, हिरवी मिरची, आलं-लसूण, जीरं, लवंग, दालचिनी
मस्त झणझणीत भरली वांगी एकदम परफेक्ट पद्धत
कृती:
- बाजारात हल्ली छोटे छोटे बटाटे मिळतात. हे बटाटे अगदी छोटे छोटे असतात. जर तुमच्याकडे असे बटाटे नसतील तर तुम्हाला आहे त्या बटाट्याचे छोटे छोटे तुकडे केले तरी चालू शकतील.
- छोटे बटाटे किंवा अगदी लहान लहान केलेले बटाटे एका कढईतील तेलात चांगले तळून घ्या. छान गोल्डन रंग येईपर्यंत तुम्ही त्यांना तळणे अपेक्षित असते.
- टोमॅटो, हिरवी मिरची, आलं,लसूण याची एक ग्रेव्ही करुन घ्यायची आहे. आता ग्रेव्हीसाठी तुम्हाला एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये जीरं, लवंग, दालचिनी परतवायचे आहे. आता त्यात टोमॅटोची पेस्ट घालून तुम्हाला चांगले तेल सुटेपर्यंत परतवायचे आहे.
- आता यामध्ये चाट मसाला, लाल तिखट,धणे पूड, कसुरी मेथी, काळे मीठ घालायचे आहे. चांगली उकळी आल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दोन चमचे दही घालायचे आहे. या ग्रेव्हीला दह्यामुळेच एक चांगले टेक्श्चर मिळते.
- ग्रेव्ही चांगली उकळल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तळलेले बटाटे घालायचे आहेत. ग्रेव्ही चांगली उकळून मग त्यावर कोथिंबीर भुरभुरून ही डिश सर्व्ह करायची आहे.
आनंद घ्या असा
काश्मिरी दम आलू रेसिपी ही थोडी आंबट- गोड लागते. थोडीशी लोणच्याच्या नजीक जाणारी अशी ही डिश आहे. त्यातच यामध्ये असलेले मसाला तोंडाला अधिक चव आणतात. आता ही रेसिपी कशासोबत सर्व्ह करायची असा तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही ही रेसिपी मस्त चपातीसोबत खाऊ शकता. चपातीसोबत किंवा मस्त फुलका, नानसोबत ही रेसिपी एकदम छान लागते.
आता एकदा तरी बटाट्याची ही रेसिपी नक्की ट्राय करा.
टिप: तळलेला बटाटा हा सुद्धा नुसता खायला मस्त लागतो.