आपल्याकडे कितीही आधुनिक कपड्यांचे फॅड असले तरीही साडीला दुसरा पर्याय आतापर्यंत मिळालेला नाही. महिलांना साडी म्हणजे जीव की प्राण. कोणत्याही खास कार्यक्रमाला आजही साडी हीच फॅशन प्राधान्याने केली जाते. तर काही महिलांना साडी नेसणे आवडत असले तरीही ती नक्की कशी नेसायची आणि कशी सावरायची या विचाराने नेसली जात नाही. साडी पिन अप करणे ही एक कला आहे आणि ती जर तुम्ही शिकलात तर साडी नेसणे आणि ती सावरणे अत्यंत सोपे होते. साडी नेसण्यासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे पिन अप न करता येणं. अनेकदा दिसून येते की, साडीला अधिक पिन्स लावल्या तर साडी खराब होते. पण तुम्हाला साडी नेसणे शिकायचे असेल तर कसे आणि कुठे साडी पिन व्यवस्थित वापरायला हवी हेदेखील शिकून घ्यायला हवे. जेणेकरून तुमचा लुक खराब होणार नाही. तुम्ही योग्य सेफ्टी पिन (Safety Pin) वापरलीत आणि योग्य पद्धतीने साडीला लावली तर साडीचे फिटिंग अगदी चांगले दिसून येईल आणि साडी खराबही होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाला साडीला नक्की पिन कुठे लावायला हवी हे जाणून घ्यायला हवे.
साडीच्या पदराला अशी लावावी पिन (How To Pin Up Saree Pallu)
साडीचा पदर हा साडी संपूर्ण नेसण्याआधीच काढता येतो. यासाठी तुम्हाला पिन फायदेशीर ठरते. तुम्ही साडीच्या पदराच्या निऱ्या व्यवस्थित काढून घ्या आणि सेट करून घ्या आणि त्याला पहिले पिन लावा. अर्थात ही पिन तुम्हाला साडीच्या डाव्या खांद्यावर ब्लाऊज आणि पदर घेऊन लावायला हवी. असं केल्यामुळे तुम्हाला पदर किती लांब आहे आणि व्यवस्थित सेट झाला आहे की नाही ते कळते. तुम्ही साडी नेसण्यासाठी अगदी नवखे असाल तर साडीचा पदर काढल्यावर मागच्या बाजूलाही पदराला खालून लहानशी पिन लावावी. जेणेकरून साडीचा पदर निऱ्यांसह व्यवस्थित राहातो.
ब्लाऊजच्या मागे पिन (Pin Up Near Back of Blouse)
ब्लाऊजच्या मागे पिन अनेक कारणांमुळे लावली जाते. ब्लाऊजच्या मागे नक्की कुठे कुठे पिन्स आणि का लावायला हव्यात ते जाणून घेऊया –
- तुम्ही जर कॉटन साडी नेसत असाल आणि तुमचा साडीचा पदर फुलला असेल तर तुम्ही पदराच्या मागे मध्यभागी पिन लाऊ शकता
- तुम्ही साडी चापूनचोपून नेसणार असाल तर तुम्ही ब्लाऊजला मागून पिन अप करू शकता. मात्र लक्षात ठेवा की, पिन ही नेहमी आतल्या बाजूने असायला हवी अन्यथा साडीचा आणि ब्लाऊजचा लुक खराब होऊ शकतो
- तुमचे पोट साडीमध्ये दिसू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मागून जेव्हा ब्लाऊजजवळून निऱ्यांसाठी एक भाग घेता तेव्हा तुम्ही ब्लाऊज आणि त्या पदराला पिन लावावी. असं केल्यामुळे साडीची फिटिंग चांगली राहाते. तसंच तुमचे पोट मोठे असेल तर ते दिसून येत नाही
निऱ्यांना कशी लावावी पिन (Pins for Saree Pleats)
साडीच्या निऱ्या काढणं तसं तर कठीण नाहीये. पण ज्यांनी आताच साडी नेसायला सुरूवात केली आहे त्यांच्यासाठी हे नक्कीच थोडे टेक्निकल आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी साडीची पिन फायदेशीर ठरू शकते. लोअर प्लेट्स बनवताना तुम्ही या टिप्सचा वापर करा –
- तुम्ही जेव्हा साडी नेसण्यासाठी पहिल्यांचा परकरमध्ये खोचाल तेव्हा समोरच्या बाजूला लोअर प्लेट्स बनविण्याआधी पिन लाऊन दोन्ही बाजू साडीच्या मध्यभागी आणा आणि पिन्स लावा. असं केल्यामुळे तुम्हाला निऱ्या काढणे अधिक सोपे होईल
- साडीच्या निऱ्या काढल्यानंतर त्या व्यवस्थित जोडून घ्या आणि सेट करून घ्या. त्यानंतर आतल्या बाजूने सर्व निऱ्या जोडून पिन लावा. असं केल्यामुळे निऱ्या स्थिर राहतात आणि हलत नाहीत
- तुमच्याकडे स्टायलिश साडी पिन असेल तर साडीच्या निऱ्या काढल्यानंतर तुम्ही ती निऱ्यांवर लावा. असं केल्यामुळे साडी अधिक सुंदर दिसते.
तुम्हीही साडीचे फिटिंग योग्य असायला हवे असेल आणि तुमचा लुक खराब व्हायला नको असेल तर अशा पद्धतीने साडी पिनचा वापर करून पाहा आणि दिसा अधिक सुंदर!