Natural Care

लॉकडाऊनच्या काळातही त्वचेवरील ग्लो कायम ठेवायचा आहे, मग करा हे नैसर्गिक उपाय

Trupti Paradkar  |  Apr 13, 2020
लॉकडाऊनच्या काळातही त्वचेवरील ग्लो कायम ठेवायचा आहे, मग करा हे नैसर्गिक उपाय

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. खरंतर यामुळे वातावरणातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारल्याचे दिसून येते. स्वच्छ आकाश, शुध्द हवा, भरपूर सुर्यप्रकाश या सा-या गोष्टी त्वचेच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता न आल्याने घरातल्यांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. सतत टिव्ही, मोबाईल, लॅपटॉप आदींच्या वापराने डोळ्यांवर ताण येणे, त्वचा कोरडी पडणे, डोळ्या भोवती काळं वर्तुळं येणं, थकवा जाणवणे अशा समस्या निर्माण होऊ शकताता. वास्तविक या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तुमच्याकडे सध्या पुरेसा मोकळा वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही तुमची त्वचा आणखी तजेलदार करू शकता. डॉ रिंकी कपूर, दी एस्थेटिक क्लिनिक्स’च्या सल्लागार डरमॅटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डरमॅटोलॉजिस्ट आणि डरमॅटो सर्जन यांच्या सल्लानुसार घरीच हे काही उपाय यासाठी करा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक चमक कायम राहील.

घरात सतत काहीतरी शारीरिक हालचाल करत राहा –

लॉकडाऊनमध्ये केवळ आराम केल्यास शरीर आणखी सुस्तावण्याची शक्यता आहे. शारीरिक हालचाल न झाल्याने शरीराची चयापचय क्रिया मंदावते. यामुळे त्वचा आणि केसही निस्तेज होतात. आपल्या त्वचेची चमक पुन्हा आणण्यासाठी घरगुती पर्यायांचा वापर करा. यासाठी आपल्याला जिममध्ये जाण्याची आवश्यकता नाही. घरीदेखील बरेच व्यायामप्रकार करता येऊ शकतात. धावणे, दोरी उड्या खेळणे, नृत्य करणे, योगा अशा व्यायाम प्रकाराचा आधार घ्या. सुडौल बांध्यासाठी रोजच्या रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. किमान 20 मिनिटे कोणत्याही प्रकारचा व्यायाम करणे फायदेशीर ठरेल. शिवाय दर एक तासाने संपूर्ण घरातच चालत एक फेरी मारा ज्यामुळे अंग जड होणार नाही. 

Shutterstock

आहाराकडे विशेष लक्ष द्या –

पचायला जड अन्न त्वचेसाठीही चांगले नसते म्हणूनच याकाळात प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा. दररोज ताजे आणि हलके अन्न तयार करा. आपल्या आहारामध्ये लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा कारण ते शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवतील. भरपूर पाणी प्या आणि जितके शक्य असेल तितकी फळं आणि कोशिंबीर खा. आपण संतुलित आहाराचे सेवन केले तर त्वचेला तजेला येईल. आपल्या आहारात काकडी आणि पुदीनाचे पाणी यासारखे काही डिटॉक्स पेयाचा समावेश करा.

Shutterstock

घरातील नैसर्गिक प्रसाधनांचा वापर करून त्वचेची काळजी घ्या –

आपल्या स्वयंपाकघरातील पदार्थ,  मसाल्यापैकी काही गोष्टींचा वापर यासाठी नक्कीच करता येऊ शकतो. बाजारातील सौंदर्यप्रसाधनाऐवजी आपण घरच्या घरी तयार केलेले लेप, उटणे, मॉइश्चरायझरचा वापर करू शकतो. आणि या दिवसांमध्ये सौंदर्य उजळवू शकतो.दिवसातून किमान दोन वेळा तरी त्वचेला स्वच्छ करणा-या पर्यायांचा वापर करा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर मात्र दिवसातून एकच वेळा अशा पर्यायांचा वापर करा. घरच्या घरी त्वचा स्वच्छ करणारी उत्पादने तयार करा.

shutterstock

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

 

अधिक वाचा –

तांदूळ पीठ वापरा आणि त्वचा बनवा अधिक उजळ

गुलाबपाणी… त्वचा आणि केसांचं सौदर्य खुलवणारा नैसर्गिक उपाय!

उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चेहऱ्यावर लावा ‘पालक फेसमास्क’

Read More From Natural Care