नातीगोती

रिलेशनशीपमध्ये तुमच्यासोबतही होत असेल असे, तर आताच करा ब्रेकअप

Leenal Gawade  |  Mar 22, 2019
रिलेशनशीपमध्ये तुमच्यासोबतही होत असेल असे, तर आताच करा ब्रेकअप

रिलेशनशीपमध्ये भांडणं होणं स्वाभाविक आहे.त्या भांडणानंतर काही काळासाठी अबोला धरणेही ठिक आहे. मग सोशल मीडियावर ब्रेकअप स्टेटस शेअर करणे सुरू होते. पण नात्यात तुमची सतत कुंचबणा होत असेल तर त्या नात्यात काहीच अर्थच नाही.आमच्यासोबत काही लोकांनी त्यांच्या रिलेशनशीपमधील अशा गोष्टी शेअर केल्या की ज्याचा शेवट त्यांनी नात्याला फुलस्टॉप देऊन केला. तुमच्या नात्यातही अशा काही गोष्टी असतील तर तुम्हालाही तुमचे नाते संपवण्याची वेळ आली आहे. नाते म्हटले की, तडजोड करणे आलेच. पण ही तडजोड तुमच्या मान-सन्मान आणि प्रतिष्ठेला तडा देणारी नक्कीच नसावी. आमच्यासोबत काहींनी त्यांच्या रिलेशनशीपस्टोरी शेअर केल्या. काहींनी अनुभवातून शहाणे होत योग्यवेळी ब्रेकअप केले. तुमच्यासोबतही असे काही होत असेल तर तुम्ही देखील हे नाते वेळीच संपवायला हवे.

मी एका मुलीला कित्येक वर्षांपासून ओळखतो. अगदी एक दोन वर्षांपासून आम्हाला आमच्या दोघांमध्ये काहीतरी आहे असे वाटले आणि आम्ही रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्या मुलीचे आधी एका मुलासोबत रिलेशन होते हे मला माहीत होते. ती दोघं फिजिकली जवळ होती हे देखील मला माहीत होते. पण त्या मुलाने आई-वडिलांचे कारण देत तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. त्यानंतर ती फार दुखी झाली. त्या काळात माझे तिच्याशी बोलणे वाढले. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. माझे देखील एक रिलेशनशीप काही कारणास्तव तुटले होते. त्यामुळे मला तिच्या मागच्या नात्याशी काहीच घेणे देणे नव्हते. त्यातून ती बाहेर पडावी आणि आमचे चांगले व्हावे अशी आमची इच्छा होती. पण एकदा असे काही घडले की, मला मी काय करु असे झाले. मी तिला घेऊन बाहेर गेलो होतो. त्यावेळी जो प्रकार घडला ते सांगायलाही मला लाज वाटते. कारण जिथे आम्ही गेलो तिथे तिचा तो एक्स बॉयफ्रेंड मला भेटण्यासाठी आला होता. आधी मला हा सगळा प्रकार कळला नाही.पण तो मुलगा ज्याला लग्नानंतर स्वत:चे कुटुंब होते. तो आमच्या स्पेशल दिवशी मला भेटण्यासाठी आला. कारण त्याला त्याची एक्स गर्लफ्रेंड कोणासोबत आहे ते पाहायचे होते. मला काय करु कळत नव्हते. माझ्यासोबत नात्यात असलेली ही मुलगी ज्याने तिला दुखवले त्याला आमच्या विशेष दिवशी बोलावते. मी या धक्क्यातून सावरलो नव्हतो. मला हे सगळे तोडून टाकायचे होते. पण माझे प्रेम त्या गोष्टी मानायला तयार नव्हत्या. पण तिने इतकी मोठी चूक करुनही मी तिला माफ केले. पण त्यानंतरही तिने नात्यात माझी कुचंबना केली. तिच्या चूका तिला दिसायच्या नाहीत. पण एक दिवस माझ्या सहनशक्तीचा बांध सुटला आणि मी कसलाही वाद न घालता सामंजस्याने नाते संपवले. माझ्या निर्णयाचा मला पुन्हा कधी पश्चाताप झाला नाही. उलट मी इतके दिवस का सहन केले ?हेच मला कळले नाही.

जाणून घ्या राशीनुसार प्रत्येकजण कसं व्यक्त करतं प्रेम

एका कार्यक्रमाला मी एका मुलाला भेटले. मला तो मुलगा चांगला वाटला. पहिल्याच भेटीत आम्ही बरेच बोललो. त्याने माझा नंबर मागून घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा कामासाठी आम्ही भेटलो. आमचे फोनवर चॅटींग सुरु होते. आमच्या दोघांच्याही कामाच्या वेळा खूप वेगळ्या होत्या. त्यामुळे बोलणे कमी व्हायचे. पण आमच्या तारा जुळल्या आम्ही वेळ काढून एकमेकांना भेटू लागलो. मला तो मुलगा इतका आवडला होता की, त्याच्यासाठी मी सगळया सीमा ओलांडल्या. घरी खोटे बोलून त्याच्याकडे राहायला जाणे, एकमेकांच्या कुशीत पडून राहणे, एकमेकांच्या सहवासात राहणे आम्हाला आवडत होते. तो ज्या पद्धतीने माझ्यावर अधिकार दाखवायच्या ते सगळे मला आवडायचे. तो माझ्यासाठी सगळे काही करायचा. पण त्याने त्याचे नाते कोणालाही सांगितले नव्हते आणि त्यावर मला आक्षेपही नव्हता. आमचे नाते दिवसेंदिवस बहरत होते. आमच्यामध्ये सेक्सही झाले त्यानंतर आम्ही आणखी जवळ आलो. दर वीकेंडला मला त्याची ओढ असायची आणि त्याला माझी.. पण कालांतराने मला काही गोष्टी खटकू लागल्या. तो मुंबईचा नसल्यामुळे भाड्याच्या घरी राहायचा. (त्या घरातील प्रत्येक वस्तू माझ्या पसंतीची होती.) त्याच्या घरात माझ्या व्यतिरिक्त अन्य मुलींचा सतत वावर होता. त्याच्या कपाटात सतत मुलींचे कपडे असायचे. बाथरुममध्ये शॅम्पू, बॉडीवॉश  असायचे. खरंतरं मला वाईट वाटायचं. पण पुन्हा एक मन म्हणायच की, नाही मी चुकीचा अर्थ घेत असेन. पण काही दिवसांनी मी पुन्हा त्याच्या घरी गेले त्यावेळी तो काही कारणास्तव खाली गेला. पण तो फोन घरीच विसरुन गेला. मी कधीच कोणाच्या फोनला हात लावत नाही. पण का माहीत नाही माझा हात त्याच्या फोनकडे गेला. मी गॅलरी ओपन केली तर त्याचे इतर मुलींसोबतचे आक्षेपार्ह फोटो होते. ते फोटो पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी अगदी काहीच वेळ थांबून तेथून निघाले. बाहेर पडून खूप रडले. मला त्या फोटोवर काहीच एस्कप्लनेशन नको होते. मला आता हे नातेच नको होते. फक्त त्याला ते सांगायचे होते की, मला सगळे कळले आहे. तुला तुझी शारीरिक गरज भागवण्यासाठी मी हवे होते. पण आता नाही.

डेटवर तुम्ही या चुका तर करत नाहीत ना?

कॉलेजमध्ये असताना मला एक मुलगी खूप आवडायची. तिच्याशी मी माझ्या मनातली गोष्ट कधी सांगेन असे झाले होते. ती कॉलेजमधील सगळ्यात सुंदर मुलगी होती. एक दिवस माझे मन मोकळे करायची संधी मिळाली आणि तिने मला होकार दिला. मला विश्वासच होत नव्हता की, तिने मला होकार दिला आहे. मी खूप आनंदात होतो. आता आयुष्यात काही नको होते.दिवसेंदिवस आमचे नाते घट्ट होत चालले होते. आम्ही सगळ्याच बाबतीत एकमेकांजवळ होतो. पण मी मध्यावर कॉलेज सोडून माझ्या घरी परतलो. त्यामुळे आमच्यात अंतर आले. पण तिच्या सतत संपर्कात होतो. तिला काही मदत लागली की मी तातडीने करायचो. तिला अभिनेत्री व्हायचे होते. तिच्या सतत ऑडिशन्स असायच्या त्यासाठी तिला लांब लांब जावे लागायचे. माझ्या प्रिन्सेसला कोणता त्रास नको म्हणून मी मुक्त हस्ताने खर्च करायचो. काही दिवसांनी ती माझ्याकडे सतत पैशांची मागणी करु लागली. पण मला तेव्हाही काही चुकत आहे असे वाटत नव्हते. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर ती माझ्याशी फोनवर आठवडा आठवडा बोलायची नाही. पुन्हा पैसे हवे असले की फोन करायची. माझ्या मित्राला कळत होते. घरातल्यांना कळत होते की, मी नाहक पैसे उडवतोय. त्यांनी मला अडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मी तरी ऐकत नव्हतो.पैसे पाठवतच होतो. पण ती माझ्याशी चार शब्द प्रेमाने बोलत नाही याची जाणीव मला झाली. एकदा असेच पैसे ट्रान्सफर करायला जात असताना माझ्यापेक्षा लहान मुलाने मला सांगितले की,दादा तू चुकतोयस ती मुलगी तुझ्याकडे केवळ पैसा आहे म्हणून बोलतेय. ती तुझ्यासोबत प्रेम करत नाही. त्याच्या त्या बोलण्याने मला अस्वस्थ केलं आणि मग मी पैसे का लागतात ? हे तिला विचारलं त्याबरोबर तिने मला उलट बोलायला सुरुवात केली. खूप शोध घेतल्यानंतर तिला मित्रमैत्रिणींसोबत पार्टीला जाण्यासाठी हे पैसे हवे होते हे मला कळले. तिचे इतरांसोबतचे फोटो पाहून मला कळून चुकले की, हिने मला इमोशनल करुन तिने मला नाचवले आणि पैशांसाठी वापरले होते. मी त्या क्षणापासून माझे नाते तोडून टाकले. आजही ती मला फोन करते जे झाले ते समजावण्यासाठी पण मला आता त्यात पडायचेच नाही. कारण नात्यात खोट्याला कधीच जागा नसावी,असे मला वाटले.

वाचा कसा होता काही महिलांचा पहिल्या सेक्सचा अनुभव

 नात्यात पार्टनरने पझेसीव्ह असणे अनेकांना आवडते. पण ही काळजी जेव्हा चुकीच्या दिशेने जाऊ लागते तेव्हा मात्र त्रास होऊ लागतो. मी एका मुलासोबत ४ वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. मला अजूनही आठवते पहिले वर्ष स्वप्नवत प्रेमासारखे होते. खूप छान! मी माझ्या मास्टर्सला होते. तर त्याचे शिक्षण झाले होते. त्याला पुढे शिकायची इच्छा नव्हती. आता तो काम करेल अशी मला अपेक्षा होती. कारण मी माझ्या करीअरच्या बाबतीत फारच अॅम्बिशिअस होते. त्याने मला माझ्या करीअरसाठी कधीच अडवले नाही. पण कालांतराने माझ्या कामांमुळे मला त्याला भेटणे शक्य व्हायचे नाही. तर त्याला मला रोज भेटण्याची इच्छा असायची. पण ते शक्य नसायचे. शिवाय तो नोकरी करत नसल्यामुळे त्याला काहीच फरक पडत नव्हता. माझ्या कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्यामुळे मला नोकरी करणे गरजेचे होते. त्यामुळे त्याला आमच्यात अंतर पडत आहे असे वाटू लागले. पण तसे खरेच काही नव्हते. कारण मी लहान होते. मला अनेक गोष्टी शिकायच्या होत्या. माझ्याच वयाचा असून त्याला मात्र कशाचीही आवड नव्हती. आमच्यात खटके उडू लागले. तो कारण नसताना संशय घेऊ लागला.माझ्या ऑफिसखाली येऊन थांबू लागला. मला घरी सोडण्याची काम करु लागला. पण मला त्याच्या अशा वागण्याचा कंटाळा आला होता. मला तो नकोसा होत होता. माझे कोणासोबत ऑफिसमध्ये अफेअर होऊ नये म्हणून तो मला फिजिकली जास्त जवळ करत होता.ते सगळे मी सहन करत होते.त्याला नाही म्हटलं तर तो माझ्यावर हात उगारायचा. एकदा मला ऑफिसला ड्रॉप करण्यासाठी तो माझ्या घरी आला. मी काहीच पर्याय नसल्यासारखी त्याच्या गाडीत बसले. मला एटीएममधून पैसे काढायचे होते. मी माझा फोन गाडीत ठेवला. मी पैसे काढून आले तेव्हा त्याचा चेहरा लालबूंद झाला होता. मी गाडीत बसले आणि त्याने माझा फोन हातात घेऊन फोटोत तुझ्या बाजूला असलेला मुलगा कोण? त्याने काही ऐकायच्या आत मला अर्वाच्य शिव्या द्यायला सुरुवात केली. माझाही राग अनावर होत होता. इतक्यात त्याने माझ्या कानाखाली वाजवली आणि तो शांत झाला. मला दोन मिनिटं काय झाले कळले नाही. माझा चेहरा सुजून गेला. पण मला कळले होते. हीच ती वेळ हे नाते संपवण्याचे कारण आता काहीच चांगले होणार नाही. मी त्याच्याकडे रागाने पाहिले आणि गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडले आणि त्याच्या तोंडावर दार बंद केले ते पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

मी एका मुलीला वर्षभर डेट करत होतो. आमचे चांगले पटायचे. वाढदिवस, सण आम्ही छान एकत्र साजरे करायचो. माझी आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. पण मी तिच्यासाठी शक्य असेल तितके करायचो. पण तिला नाराज कधीच करायचो नाही. माझ्यापेक्षा ती दोन वर्ष लहान असल्यामुळे तिचे मित्र-मैत्रीण फार वेगळे होते. मला त्याचा काहीच त्रास नव्हता म्हणा. पण तिच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या. मला अमुक हवे आहे. मला ते वाढदिवसाला गिफ्ट म्हणून देच. माझ्या मैत्रिणीला तिच्या बॉयफ्रेंडने महागडा फोन दिला तू मला काहीच देत नाहीस अशी ती सतत तुलना करु लागली. आमचे सतत खटके उडत होते. तिला काहीना काही हवे असायचे आणि मला ते तिला देता येणे शक्य नव्हते. तिला अनेक वेळा माझी परिस्थिती समजून सांगितली. ती स्वत:ही मध्यमवर्गीय घरातील होती. पण तरीसुद्धा तिला तिचे हट्ट पुरवणारा बॉयफ्रेंड हवा होता. एकदा तिने रागाच्या भरात माझी लायकी काढली. शिवाय तिला बॉयफ्रेंड फक्त तिला काही तरी देणारा हवा याची कबुली दिली आणि मग मी ते नाते तोडून टाकले. कारण घेवाण-देवाणीवरुन तुमचे प्रेम आणि नाते असूच शकत नाही. अशा स्वभावाच्या मुली किंवा मुलं संतुष्ट कधीच होऊ शकत नाही.

 

* नात्यात चढ- उतार तर येतातच पण ज्यावेळी तुम्ही त्या नात्यात काहीतरी खूप चुकते आहे असे वाटेल त्यावेळी तुमचा निर्णय घ्या.

* नाते कोणतेही असो त्यात तुमचा आदर राखलाच गेला पाहिजे. 

* तुमच्यासाठी योग्य कोण हे तुम्हाला स्वत:ला निवडता आले पाहिजे

* सगळ्यात महत्वाचे म्हणजे लोग क्या सोचेंगे याचा विचार करु नका. कारण नाते तुम्हाला टिकवायचे आहे. तुमच्या नात्यात काही झाले तर इतर कोणीही ते सगळे प्रश्न सतत निस्तरायला येणार नाहीत. 

(फोटो सौजन्य- Instagram)

 

Read More From नातीगोती