DIY लाईफ हॅक्स

आषाढ महिन्याचे महत्व आणि काही गोष्टी

Leenal Gawade  |  Jun 29, 2022
आषाढ महिन्याचे महत्व

 भारतीय पंचागांनुसार आणि मराठी महिन्यानुसार आषाढ हा चौथा महिना आहे. सूर्य ज्यावेळी कर्क राशीत प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ हा महिना सुरु होतो. यंदा आषाढ महिना गुरुवार, 30 जून 2022 ला सुरु होणार असून तो गुरुवार, 28 जुलै रोजी संपत आहे. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ येते म्हणून याला ‘आषाढ’ असे नाव पडले असे सांगितले जाते. या महिन्याला शूचि असे देखील म्हटले जाते. प्रत्येक मराठी महिन्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. तसेच आषाढ महिन्याला देखील आहे.या महिन्यात काही गोष्टी केल्या जातात आणि काही गोष्टी टाळायच्या असतात. याच महिन्यात आषाढी एकादशी येते. ज्यानिमित्ताने आवर्जून उपवास केला जातो आणि आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या जातात. जाणून घेऊया आषाढ महिन्यासंदर्भातील काही रंजक गोष्टी. या शिवाय अत्यंत शुभ अशा श्रावण महिन्याच्या शुभेच्छाही पाठवा

आषाढात येणारे सण

आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो. कारण या काळात अनेक मराठी सण येतात. या काळात देवशयनी आषाढी एकादशी येते.  वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र असा काळ असतो. मस्त रिमझिम पावसात या काळात वारी निघालेली असते. त्यामुळे वारकऱ्यांसाठी असलेला सगळ्यात महत्वाचा सण आणि उपवास हा याकाळात असतो. 

आषाढ महिन्यात येणारा दुसरा महत्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंची पूजा केली जाते. महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस ओळखला जातो.  भारतीय संस्कृतीचे मूलाधार आणि शिल्पकार म्हणून त्यांना गौरव केला जातो. पौराणिक दाखल्यानुसार याच काळात महर्षी व्यासांनी महाभारत लिहिले 

नववधूंसाठी आषाढ

ज्या मुलींची लग्न नुकतीच झाली असतील. अशांना आषाढ महिन्यात माहेरपणाला घेऊन जाण्यात येते. असे म्हणतात आषाढ महिन्यात नववधूने तिच्या नवऱ्याला पाहू नये किंवा सासरच्यांना पाहू नये. असे म्हणतात नवीन घरातील कर्ता पुरुष आणि पत्नी सुनेवर जास्त अधिकार गाजवत असेल तर त्यांना आखाडसासरा आणि आखाडसासू असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी मुलींना फारच कमी माहेरी येण्यासाठी मिळत असावे. त्यामुळे त्यांना सासरवासातून थोडी मुक्ती मिळावी यासाठी आषाढ अमावस्येच्या आधी मुलींना घेऊन जाण्याची प्रथा पडली. आजही अनेक जण ही प्रथा पार पाडतात.

अधिक वाचा : रक्षाबंधन माहिती, काय आहे भावाबहिणीच्या नात्याची महती (Raksha Bandhan Information In Marathi)

गुप्त नवरात्रि

हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चार नवरात्री येतात. माघ, चैत्र, आषाढ आणि अश्विन या महिन्यामध्ये नवरात्री येतात. यातील चैत्र नवरात्र ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.  आषाढ आणि माघ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला गुप्त नवरात्री असे म्हटले जाते. तंत्र आणि शक्ती उपासना याच्यासाठी ही नवरात्र साजरी करतात. 

शुभकार्य होतात बंद

आषाढ महिना सुरु झाल्यानंतर सगळी शुभकार्ये थांबवली जातात. कारण त्यानंतर सगळे देव झोपी जातात असे सांगितले जाते. आषाढ महिना सुरु होतो त्याकाळी चातुर्मासाला सुरुवात होते. आषाढ शुक्ल एकादशीपासून त्याची सुरुवात होते. ते पुढे 4 महिने चातुर्मास सुरु असतो. या काळात कोणत्याही यात्रा, होम हवन होत नाही. संत महात्म्यसुद्धा या काळात विसावतात.

प्राण्यांसाठी आषाढ

आषाढ महिन्यात मोठ्या प्रमाणात माशा दिसू लागतात.  याचे कारण ही या महिन्यात माशांची प्रजनन क्रिया सुरु असते. अनेक छोट्याछोट्या माशा या काळात दिसून लागतात. इतकेच नाही. तर आजारांच्या दृष्टिकोनातूनही हा महिना खूप जास्त महत्वाचा आहे. कारण या दिवसात अनेक आजार वर काढतात. त्यामुळे या काळात आहार चांगला असणे गरजेचे असते. 

आषाढ महिन्याबद्दल तुम्हाला काय अधिक माहिती आहे ते आम्हाला नक्की सांगा 

Read More From DIY लाईफ हॅक्स