लाईफस्टाईल

म्हणून मकर संक्रांतीला असतं तिळाचं महत्त्व (Importance Of Sesame Seeds In Marathi During Makar Sankranti)

Dipali Naphade  |  Jan 9, 2019
म्हणून मकर संक्रांतीला असतं तिळाचं महत्त्व (Importance Of Sesame Seeds In Marathi During Makar Sankranti)

इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की, मराठी सणांनाही सुरुवात होते. सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. दरवर्षी जानेवारीच्या 14 तारखेला संक्रांत हा सण साजरा करण्यात येतो. भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये मात्र मकर संक्रांत म्हणूनच हा दिन साजरा होतो. तिळगूळ घ्या गोड गोड बोला अशाप्रकारे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जातात. खरं तर मकर संक्रांतीला अध्यात्मिक जितकं महत्त्व आहे, तितकंच शास्त्रीय महत्त्वही आहे. हा दिवस येण्याआधी रात्र मोठी असते तर दिवस लहान असतो. मात्र या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात. शिवाय संक्रांतीनंतर ऋतूबदल होत थंडी कमी होऊ लागते. पण सर्वात महत्त्व असतं ते या दिवशी तिळाला. तीळ इतके महत्त्वाचे का? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण पूर्वी प्रचंड प्रमाणात थंडी असायची आणि तिळामुळे शरीर उष्ण राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खाण्याची पद्धत सुरु झाली. त्यातूनच तिळाचे लाडू आणि विविध पदार्थ बनण्यास सुरुवात झाली.

मकर संक्रांती म्हणजे नेमकं काय? (What Is Makar Sankranti)

मकर संक्रांत म्हणजे पतंग उडवणे हे सध्याच्या मुलांच्या मकर संक्रांतीची व्याख्या आहे. पण नेमकं मकर संक्रांत म्हणजे काय? याची संपूर्ण माहिती तुम्हाला आहे का? आज आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत. मकर ही रास असल्याचं सर्वांनाच ज्ञात आहे. या मकर राशीतून सूर्य दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश करत असतो. त्या प्रक्रियेला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. दुसऱ्या राशीत प्रवेश करणं म्हणजे संक्रमण. त्यामुळे मकर संक्रांत असं म्हटलं जातं. आता हा सण दरवर्षी एकाच दिवशी कसा काय येतो ? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधीतरी येतोच. हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो. त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते. सोलर सायकल ही साधारणतः दर आठ वर्षांनी एकदा बदलते. त्याचवेळी मकर संक्रांत 15 जानेवारी रोजी येते. यापूर्वी 2016 या वर्षात मकर संक्रांत 15 जानेवारीला येऊन गेली आहे. काही ठिकाणी हा सण पतंगांचा सण म्हणून ओळखला जातो मात्र त्यामागे असणारे शास्त्रीय कारण खूपच कमी लोकांना माहीत आहे. सकाळी सकाळी उन्हात उठून पतंग उडवल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि शिवाय शरीराला व्हिटामिन डीदेखील मिळते त्यामुळे पतंग उडवायची प्रथा पडली.

वाचा – मकरसंक्रांतीला संपूर्ण भारतात करण्यात येणारे ‘15’ पदार्थ

तिळगुळाचं इतकं महत्त्व का? (Why Is Sesame Seeds Important)

मकर संक्रांत आणि तीळगूळ हे समीकरणच आहे. पण तुम्हालाही कधीतरी प्रश्न सुचला असेलच ना? की याच सणाला तीळगूळ का खायचा किंवा गुळाच्या पोळ्या याचवेळी का मिळतात. बाकीच्या वेळी हवं असेल तरी मिळत नाहीत. तर त्यासाठीदेखील एक शास्त्रीय कारण आहे. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. तसंच गुळातही उष्णता असते. थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असल्यामुळे यावेळी तीळगूळ बनतात. शिवाय भूतकाळात झालेल्या कटू आठवणींना विसरून नव्याने त्यामध्ये तीळ आणि गुळाचा गोडवा भरून नात्याला सुरुवात करायची असे म्हटले जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असंही म्हटलं जातं.

वाचा – मकर संक्रांत स्पेशल: संक्रातीला नेसण्यासाठी काळ्या रंगाच्या साड्यांचे ‘18’ प्रकार

काय आहे तिळाचं महत्त्व? (Importance Of Sesame Seeds In Marathi)

मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं महत्त्व अगदी पूर्वीपासून आपल्या सगळ्यांनाच सांगण्यात आलं आहे. पण तीळ का महत्त्वाचे आहेत याचं कारण बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्यामुळे आम्ही खास तुमच्यासाठी ही माहिती आणली आहे. याविषयीची माहिती –

तीळ दिसायला अगदी लहान असतात. पण त्याचं महत्त्व खूप आहे. तिळामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते. जी थंडीच्या दिवसामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी उष्णता तीळ आणि गूळ खाण्याने मिळते. अगदी पूर्वापार चालत आलेल्या आयुर्वेदातही तिळाचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. तिळाचं सेवन करणं हे शरीरासाठी आरोग्यदायी असतं. शिवाय तीळ अतिशय पौष्टिक असतात. यामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त प्रमाणात असते. शिवाय यामध्ये लोह, सेलेनियम, ब जीवनसत्त्व, मँगनीज आणि इतर तंतुमय पदार्थांची मात्रादेखील असते. तिळामधील असणारे कॅल्शियम आणि झिंक हे शरीराराती हाडांचा ठिसूळपणा रोखण्यासाठी मदत करते. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर स्त्रियांना तीळ खाण्याचा फायदा होऊ शकतो. शिवाय ज्यांना मासिक पाळीचा त्रास आहे, अशा स्त्रियांनाही तिळातील कॅल्शियममुळे बराच फायदा होतो. संधीवातावर तिळाच्या तेलाने मालिश केल्यास, संधीवाताच्या रूग्णांनाही बराच फरक पडतो. त्यामुळे अशा तिळामध्ये गूळ मिक्स करून तिळाचे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक सर्व पौष्टिक गोष्टींचा फायदा होतो. तसंच तिळाची चटणी, थालिपिठात तीळ असा रोज वापर केल्यास, बऱ्याच आजारांपासून दूरही राहता येते.

वाचा – हलव्याच्या गोड दागिन्यांनी करा यंदाची संक्रांत अधिक गोड

दोन प्रकारचे तीळ (Two Types Of Sesame Seeds)

तिळामध्ये दोन प्रकार असतात. एक पॉलिश केलेले तीळ आणि एक पॉलिश न केलेले तीळ. काळे तीळ अर्थात हे न पॉलिश केलेले तीळ असतात. हे सहसा आहारामध्ये वापरले जात नाहीत. पण या तिळामध्ये कॅल्शियम आणि इतर पौष्टिक घटकांचं प्रमाण जास्त असतं. तसंच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी याची मदत होते. म्हणूनच तिळाचं तेल हे त्वचा चांगली ठेवण्यासाठी वापरतात. दरम्यान पॉलिश केलेले तीळ हे खाण्यासाठी चांगले असतात. जेवणातील पदार्थांमध्ये हे तीळ वापरता येतात. त्याची वेगळी चव असते. शिवाय तीळ रोजच्या आहारामध्ये वापरल्यास, तुमचा कोठा साफ राहतो आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो. कॅन्सरपासून संरक्षण करण्यासाठीदेखील तिळाचा फायदा होतो. जेवणासाठी तिळाचं तेल वापरणंही आरोग्यासाठी चांगलं असतं. या तेलामुळे रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत होते. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये जेवणासाठी तिळाचं तेल वापरलं जातं. याचा वास जरी काही लोकांना आवडत नसला तरीही त्याचे फायदे चांगले असल्यामुळे घरी भाज्या करण्यासाठी हे तेल चांगला पर्याय आहे.

आम्ही तुम्हाला या मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ का महत्त्वाचे आहेत याची माहिती दिली. त्याचप्रमाणे या संक्रांतीला चविष्ट आणि उत्कृष्ट तिळगूळ कसे बनवायचे याची कृतीदेखील आम्ही देत आहोत.  

वाचा – बोरन्हाणसाठी तयारी (Preparation Of Bornahan)

तिळगूळ रेसिपी (Sesame Recipe)

साहित्य (Material) 

१०० ग्रॅ. तीळ

अर्धा किलो गूळ

२०० ग्रॅ. सुकं खोबरं किसलेले

१ च. तूप

१५० ग्रॅ. शेंगदाणे कूट (जाडसर)

सुका मेवा (हवा असल्यास)

कृती (Recipe)

सर्वप्रथम तीळ भाजून घेणे त्यानंतर किसलेले सुकं खोबरं भाजून घेणे. पाक करण्यासाठी गूळ बारीक कापून घेणे. त्यानंतर पाक करताना गुळात थोडं पाणी अंदाजाने घालणे (गूळ भिजेपर्यंत) आणि पाक करून घेणे. पाक करताना त्यामध्ये १ चमचा तूप घालणे. तुमचा पाक तयार झाल्यावर त्यामध्ये वरील भाजलेले तीळ, कूट आणि खोबरं मिक्स करून घेणे. गरम असतानाच त्याचे लाडू बनवणे. हवा असल्यास, यामध्ये सुका मेवा घालणे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From लाईफस्टाईल