मालवणी चिकन, माशाचे कालवण, काळ्या वाटण्याची उसळ, ओल्या काजूची भाजी असे अस्सल कोकणी पदार्थ पाहिले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं… मात्र हे पदार्थ चविष्ट होतात ते त्यामध्ये मिसळलेल्या स्पेशल मालवणी मसाला रेसिपीमुळे… कोकणात विशेषतः रत्नागिरी, मालवण, सिंधुदुर्ग या भागात जो साठवणीचा मसाला तयार केला जातो त्याला मालवणी मसाला असं म्हणतात. हा मसाला बनवण्याची एक खास पद्धत आणि प्रमाण आहे. साहित्याचे प्रमाण आणि योग्य पद्धत फॉलो केली तर कुणीही घरच्या घरी खमंग मालवणी मसाला तयार करू शकतं. हा मसाला एक ते दीड वर्ष टिकतो. शिवाय या मसाल्यामुळे स्वयंपाकाला अप्रतिम जव येते. नॉन व्हेज खाद्यपदार्थांची लज्जत या मसाल्यामुळे अधिकच वाढते. या मसाल्याच्या लोकप्रियतेमुळे हा मसाला घरच्या घरी कसा बनवावा हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. यासाठीच वाचा ही स्पेशल मालवणी मसाला रेसिपी जी तुम्हीदेखील अगदी घरच्या घरी स्वतः बनवू शकता.
Table of Contents
- मालवणी मसाला साहित्य (Ingredients For Malvani Masala Recipe In Marathi)
- मालवणी मसाला बनवण्याची योग्य पद्धत (Process Of Malvani Masala Recipe)
- मालवणी मसाला कसा साठवून ठेवावा (How To Store Malvani Masala In Marathi)
- मालवणी मसाला वापरून तयार करा या रेसिपीज (Malavani Masala Recipe In Marathi)
- मालवणी मसाल्याबाबत मनात असलेल निवडक प्रश्न – FAQ’s
मालवणी मसाला साहित्य (Ingredients For Malvani Masala Recipe In Marathi)
मालवणी मसाला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला अनेक ठिकाणी मिळू शकते. मात्र ते घेताना मिरच्या व इतर गरम मसाले नीट पाहून घ्या. कारण साठवणीचा मसाला करायचा असेल तर लाल सुकलेल्या मिरच्या घेणं गरजेचंच आहे. साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये नव्या मिरच्या येतात. फ्रेश मिरच्यांचा बनवलेला मसाला जास्त दिवस टिकतो आणि त्याला चवही चांगली लागते. मुंबईतील मस्चिद, लालबाग, वाशी, कर्जत, कल्याण या ठिकाणी मोठ्या मसाला मार्केटमध्ये होलसेल रेटने तुम्हाला साहित्य मिळू शकते. मसासा बनवण्याआधी साधारणपणे चार-पाच दिवस आधी मसाल्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करावे. मसाला करण्यासाठी साहित्य आणि प्रमाण अचूक असावे
आम्ही तुमच्यासोबत पाच किलोचा मसाला तयार करण्याचे साहित्य शेअर करत आहोत. त्यानुसार तुम्हाला जितका स्पेशल मालवणी मसाला तयार करायचा आहे त्यानुसार साहित्य घ्या आणि मसाला बनवा.
मालवणी मसाला साहित्य आणि त्याचे प्रमाण –
- बेडगी सुकी लाल मिरची १ किलो
- संकेश्वरी सुकी लाल मिरची १ किलो
- काश्मिरी लाल मिरची १ किलो
- पांडी लाल मिरची १ किलो
- धणे अर्धा किलो (धण्याचे प्रमाण तुम्हाला मसाला किती तिखट हवा यानुसार ठरवावे)
- काळीमिरी ५० ग्रॅम
- बडीशेप ५० ग्रॅम
- खसखस ५० ग्रॅम
- लवंग ५० ग्रॅम
- तमाल पत्र २० ग्रॅम
- जायफळ दोन नग
- चक्रीफुल १० ग्रॅम
- नागकेशर १० ग्रॅम
- दगडफूल १० ग्रॅम
- दालचिनी १० ग्रॅम
- शाही जिरे १० ग्रॅम
- मसाला वेलची १० ग्रॅम
- त्रिफळ १० ग्रॅम
- हळकुंड १०० ग्रॅम
- खडे हिंग १० ग्रॅम
मालवणी मसाला बनवण्याची योग्य पद्धत (Process Of Malvani Masala Recipe)
स्पेशल मालवणी मसाला टिकण्यासाठी त्याचे प्रमाण आणि बनवण्याची पद्धत योग्य पद्धतीने फॉलो करणं गरजेचं आहे. हा मसाला तुम्ही कमी प्रमाणात घरी मिक्सरवर दळून बनवू शकता. मात्र तुम्हाला तो किलोच्या प्रमाणात वर्षभरासाठी तयार करायचा असेल तर तो दळून देण्यासाठी खास डंक असतात तिथे तो दळून घ्यावा. मात्र त्याआधी या काही स्टेप्स तुम्हाला घरी करणं गरजेचं आहे.
स्टेप १ – सर्व प्रकारच्या मिरच्या दोन ते तीन दिवस कडक उन्हात वाळवाव्या असं न केल्यास तिखटामध्ये किडे पडू शकतात. यासाठीच ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे.
स्टेप २ – मिरचीसोबत साहित्यात असलेलं गरम मसाल्याचं इतर साहित्यही उन्हात वाळवून घ्यावे
स्टेप ३ – वाळवलेल्या मिरच्यांचे देठ खुडून घ्यावे आणि एका जाड बुडाच्या भांड्यात कडक होईपर्यंत भाजून घ्याव्या (हे करत असताना मिरच्यांच्या वासाने ठसका लागण्याची आणि हातांना जळजळ होण्याची शक्यता असते. यासाठी मिरच्या हाताळताना हाताला तेल लावावे आणि भाजताना तोंडावर मास्क लावावा)
स्टेप ४ – सर्व खडे मसाले देखील कढईत भाजून घ्यावे, मसाला कमी तिखट हवा असेल तर त्यामध्ये धण्याचे प्रमाण वाढवावे.
स्टेप ५ – मिश्रण थंड झाल्यावर कमी प्रमाणात असेल तर घरीच मिक्सरवर दळावे. मात्र वर्षभरासाठी किलोच्या प्रमाणात करायचे असेल तर मिरची कुटण्याच्या डंकावर दळून आणावे
स्टेप ६ – मसाल्यामध्ये खड्या हिंगाचे तुकडे टाकावे ज्यामुळे मसाला जास्त दिवस टिकतो
स्टेप ७ – घरी दळलेला अथवा डंकावरून दळून आणलेला मसाला थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावा.
स्टेप ८ – मसाला वापरताना तो थोडा थोडा काढून घ्यावा ज्यामुळे लवकर खराब होणार नाही.
वाचा – खमंग चिवडा रेसिपी, बनवा घरच्या घरी (Chivda Recipe In Marathi)
मालवणी मसाला कसा साठवून ठेवावा (How To Store Malvani Masala In Marathi)
मालवणी मसाला वर्षभर टिकतो कारण हा कोरड्या घटकांपासून तयार केलेला साठवणीचा मसाला आहे. मात्र असा वर्षभराचा मसाला चांगला टिकण्यासाठी तो बनवतानाच काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
- मसाल्यासाठी निवडलेल्या सुक्या मिरच्या ओलसर नसाव्या
- मिरच्या मसाला बनवण्यापूर्वी दोन ते तीन दिवस कडक उन्हात वाळवाव्या
- मिरचीसोबतच इतर सहित्यही उन्हात चांगले वाळवलेले असावे
- मसाला बनवल्यावर तो थंड करून साठवणीच्या चिनी मातीच्या अथवा काचेच्या मोठ्या बरणीत साठवून ठेवावा
- बरणीचे झाकण घट्ट असावे
- बरणीचे झाकण घट्ट बसण्यासाठी बरणीच्या झाकणावर एखादे सुती कापड बांधून ठेवावे
- मसाला ठेवलेली ही मोठी बरणी कोरड्या आणि सतत वापर नसलेल्या ठिकाणी ठेवावी
- ही बरणी वारंवार उघडू नये नाहीतर मसाला खराब होऊ शकतो.
- स्वयंपाकासाठी लागणारा मसाला दर पंधरा दिवसांसाठी अथवा महिन्याभरासाठी एका छोट्या बरणीत काढून घ्यावा.
- मसाला काढण्यासाठी वापरण्यात येणारे चमचे ओलसर अथवा दमट नसावे
वाचा – Rajma Recipe in Marathi
मालवणी मसाला वापरून तयार करा या रेसिपीज (Malavani Masala Recipe In Marathi)
मालवणी मसाला हा कोकणातील खास साठवणीचा मसाला असल्यामुळे त्यापासून अनेक अस्सल मालवणी पदार्थ तयार करता येऊ शकतात. यासाठी आम्ही तुमच्यासोबत असे काही मालवणी पदार्थ शेअर करत आहोत. ज्यासाठी तुम्हाला वापरावीच लागेल हा स्पेशल मालवणी मसाला रेसिपी (malvani masala recipe in marathi)
मालवणी मसाला चिकन करी
साहित्य –
- अर्धा किलो चिकन
- एक कप किसलेलं ओलं खोबरं
- एक कप किसलेलं सुकं खोबरं
- दोन चिरलेले कांदे
- आलं लसणाची पेस्ट
- स्पेशल मालवणी मसाला
- हळद
- तमालपत्र
- स्पेशल चिकन मसाला
- लिंबू
- चवीपुरतं मीठ
कृती –
चिकन स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करावे. त्यानंतर त्याला स्पेशल मालवणी मसाला, मीठ, हळद, आले-लसणाची पेस्ट, लिंबाचा रस लावून एक तास मॅरेनेट करण्यासाठी ठेवावे.कढईत थोडं तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्याच कढईत ओलं आणि सुकं खोबरंही परतून घ्यावं. हे मिश्रण वाटून मिक्समध्ये वाटलेला मसाला तयार करावा. कढईमध्ये तेल गरम करून त्यावर तमाल पत्र आणि चिरलेला कांदा टाकावा. त्यात मॅरीनेट केलेलं चिकन टाकून चांगलं परतून घ्यावं. चिकन मध्ये थोडं पाणी टाकून झाकण ठेवून वाफेवर शिजवावं. त्यानंतर त्यात वाटलेला मसाला, स्पेशल मालवणी मसाला, स्पेशल चिकन मसाला, मीठ आणि पाणी टाकून शिजवावं. गरमगरम चिकन मसाला भाजणीच्या वड्यांसोबत मस्त लागतात.
मालवणी फिश करी
मालवणी फिश करीसाठी आपण पापलेट फिश चे तिखले वापरणार आहोत.
साहित्य –
- पापलेटचे कापलेले तुकडे
- पाच सहा लाल सुकलेल्या मिरच्या
- एक वाटी किसलेलं ओलं खोबरं
- धणे
- लसूण पाकळ्या
- कांदा
- लसूण
- टोमॅटो
- कोकमाचे आगळ
- स्पेशल मालवणी मसाला
- तेल
कृती –
पापलेट स्वच्छ धुवून त्याला मीठ व कोकमाचे आगळ लावून मॅरेनेट करावे. लाल सुक्या मिरच्या, धणे पाण्यात भिजत ठेवावे. काही वेळाने ओलं खोबरं, मिरच्या आणि धणे, कांदा, लसूण, टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. कढई गरम करून त्यात तेलात हा वाटलेला मसाला परतून घ्यावा. वाटलेल्या मसाल्यामध्ये चवीसाठी स्पेशल मालवणी मसाला टाकावा. मसाल्याला तर्री सुटू लागली की त्यात गरजेनुसार पाणी टाकावं. पाण्याला उकळू फुटू लागली की त्या फिशचे पीस हळूवारपणे सोडावे. मासे शिजले की गरमगरम फिश करी भातासोबत वाढावी.
सुक्या बोंबलाचे कालवण
साहित्य –
- सुके बोंबील
- एक मध्यम बटाटा
- कांद्या खोबऱ्याचं वाटण
- स्पेशल मालवणी मसाला
- हळद
- टॉमेटो
- आलं,लसूण पेस्ट
- हिरव्या मिरच्या
- कोकम
- मीठ
- तेल
- कोथिंबीर
कृती –
बोंबील स्वच्छ करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते पंधरा मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. कढईत तेल गरम करून चिरलेला कांदा आणि टोमॅटो परतून घ्या. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात हळद, स्पेशल मालवणी मसाला टाका. त्याच बटाट्याचे चिरलेले तुकडे, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरचीचे तुकडे टाकून मिक्स करा. चांगले परतल्यावर त्यात भिजलेले बोंबलाचे तुकडू पिळून टाका आणि पुन्हा परतून घ्या. मिश्रणाला तेल सुटू लागले की त्यात कांद्या खोबऱ्याचे वाटण आणि पाणी टाका. खोबऱ्याचे वाटण जास्त दिवस टिकण्यासाठी या पद्धतीने तयार करा. वाटण टाकल्यावर बोंबलाच्या कालवणाला उकळी येऊन बोंबील शिजले की गरमगरम भाकरी अथवा पोळीसोबत खा.
काळ्या वाटण्याची उसळ
साहित्य –
- रात्रभर भिजवलेले काळे वाटाणे
- बटाटा
- कांद्या खोबऱ्याचं वाटण
- तेल
- मोहरी
- जिरे
- हिंग
- हळद
- स्पेशल मालवणी मसाला
- कांदा
- तमालपत्र
- मीठ
कृती –
रात्रभर भिजलेले वाटाणे चाळणीत निथळून अथवा कापडात बांधून ठेवून त्याला मोड आणावे. कुकरमध्ये वाटाणे आणि बटाटा उकडून घ्यावा. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात थोडासा कांदा परतून घ्यावा. फोडणीत तमालपत्र, मोहरी, हिंग, जिरे, हळद टाकून परतावे. या मिश्रणावर कांद्या खोबऱ्याचे वाटण टाकावे. चांगली उकळ आली की हवं असल्यास चवीपुरतं मीठ टाकून भाजी सर्व्ह करावी. मालवणात ही भाजी खूपच प्रसिद्ध आहे. पण या भाजीला चव येते ती अस्सल मालवणी मसाला रेसिपीमुळे
ओल्या काजूची उसळ
साहित्य –
- पाव किलो ओले काजू
- एक वाटी ओलं अथवा सुकं किसलेलं खाबरं
- एक कांदा
- दोन चार लसणाच्या पाकळ्या
- एक मध्यम आकाराचा बटाटा
- स्पेशल मालवणी मसाला
- कोकम अथवा चिंच
- चवीप्रमाणे मीठ
- तेल
कृती –
कांदा बारीक जाडसर चिरून घ्या. कढईत थोडं तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्या. कांद्यातच दोन लसणाच्या पाकळ्या टाका. कांदा, लसूण परतल्यावर ते काढून एका भांड्यात ठेवा आणि त्याच कढईत ओलं खोबरं बाजून घ्या. कांदा, लसूण, खोबरं जिन्नस थंड झाले की ते मिक्सरमध्ये वाटून वाटप तयार करा. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात ओले काजू आणि मध्यम आकाराच्या चिरलेल्या बटाट्याच्या फोटी परता. त्यात वाटलेला मसाला टाकून चांगले परतावे. मिश्रणात हळद, मालवणी मसाला आणि चवीपुरतं मीठ टाका. वरून कोमट पाणी टाकून भाजी चांगली शिजू द्या. उकळी आल्यावर गॅस बंद करताना चिंच अथवा कोकम टाका आणि कोथिंबीर पेरून झाकण लावून ठेवा. गरमागरम भात आणि भाकरीसोबत ओल्या काजू ची उसळ अगदी मस्त लागते. मात्र या भाजीची खरी लज्जत वाढते ती स्पेशल मालवणी मसाला रेसिपीमुळेच.
मालवणी मसाल्याबाबत मनात असलेल निवडक प्रश्न – FAQ’s
मालवणी मसाला हा साठवणीचा मसाला आहे. शिवाय तो कोरड्या जिन्नसांपासून केला जातो. उन्हात वाढवलेल्या मिरच्या आणि इतर गरम मसाल्यापासून तयार केलेला हा मसाला जवळजवळ एक वर्षभर चांगला टिकतो. यासाठीच अनेक घरांमध्ये वर्षभराचा स्पेशल मालवणी मसाला तयार करून ठेवला जातो.
मालवणी मसाल्यापासून रत्नागिरी, सिंधुर्दुर्ग विभागातील अस्सल मालवणी पदार्थ बनवता येतात. विेशेष म्हणजे सर्वच व्हेज आणि नॉनव्हेज मालवणी पदार्थांमध्ये हा स्पेशल मालवणी मसाला वापरला जातो.
मालवणी मसाला हा थोडा झणझणीतच असतो. कारण त्यामुळे चिकन, मासे अशा नॉनव्हेज पदार्थांना खमंगपणा आणि स्वाद येतो. मात्र यातील लाल तिखट मिरचीचे प्रमाण कमी करून तुम्ही तो कमी तिखट करू शकता. शिवाय मसाला कमी तिखट करण्यासाठी त्यात धण्याचं प्रमाण वाढवावं ज्यामुळे त्याचा तिखटपणा कमी होतो. याचप्रमाणे स्वयंपाकात मसाल्याचा वापर थोडा कमी केल्यासही पदार्थांचा तिखटपणा कमी करता येऊ शकतो. मात्र अस्सल झणझणीत मालवणी पदार्थ खायचे असतील तर स्पेशल मालवणी मसाला वापरायलाच हवाच.