Festival

मंगळागौर माहिती जाणून घ्या (Mangala Gauri Information In Marathi)

Dipali Naphade  |  Aug 3, 2021
mangalagaur-information-in-marathi

नवीन लग्न झाल्यावर अनेक विधी असतात. अनेक सण साजरे करायचे असतात. श्रावण महिन्यात तर अनेकविध पूजा आणि सण साजरे केले जातात. नव्या नवरीचा असाच एक साजरा करण्यात येणारा सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर हा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने पहिली पाच वर्षे पूजण्याचा सण आहे. लग्नाला पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक श्रावणातील मंगळावारी मंगळागौरीची पूजा करण्यात येते. नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांना बोलावून हा सण साजरा करण्यात येतो आणि पूजा झाल्यावर रात्री जागरण करण्यात येते. मंगळागौरीची पूजा नक्की काय असते, याचे उद्यापन कसे होते, मंगळागौरीच्या पूजेचा विधी काय असतो या सगळ्याची मंगळागौर माहिती (mangala gauri information in marathi) तुम्हाला या लेखातून आम्ही देत आहोत. 

मंगळागौर माहिती (Mangala Gauri Information In Marathi)

Mangala Gauri Information In Marathi

मंगळागौर हे हिंदू धर्मातील नवविवाहित स्त्री ने करण्याचे एक व्रत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी लग्नानंतर पाच वर्षे हे व्रत करण्यात येते. यासाठी नवविवाहित महिला सकाळी स्नान करून सोवळे नेसून पूजा करण्यासाठी बसतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची अगदी षोडशोपचाराने पूजा करण्यात येते. मंगळागौर अर्थात पार्वती. शेजारी महादेवाची पिंडही ठेवली जाते. पूजा झाल्यावर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी मंगळागौरीची आरती करण्यात येते. यानंतर एकत्र बसून सर्वजणी मंगळागौरीची कथा (कहाणी) भटजींकडून ऐकतात. त्यानंतर पंचपक्वान्नांचे जेवण आणि सवाष्णींना वाण देण्याची प्रथा आहे. पूजेनंतर रात्री जागरण करण्यात येते. जागरणाच्या वेळी मंगळागौरीला विविध खेळ खेळण्याचा अनादी काळापासून चालत आलेला प्रघात आहे. यामध्ये मंगळागौरीची आरती केल्यानंतर रात्री जेवण करून अनेकविधी गाणी म्हणत हे खेळ खेळण्यात येतात. यामध्ये लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, फू बाई फू, अठूडं केलं गठूडं केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची खूपच मजा असते. आजकाल तर मंगळागौरीचे खास कार्यक्रमही आखले जातात. नऊवारी साडी, नाकात पारंपरिक नथ, दागिने असा पेहराव करून नव्या नवरीला नटण्यासाठी आणि आपल्या घरातील विविध लोकांची ओळख करून घेण्यासाठी हा खास कार्यक्रम आखला जातो. त्याशिवाय आपल्या पतीला सुखाचं आणि निरोगी आयुष्य मिळावं म्हणूनही हे व्रत करण्यात येते. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की या मंगळागौरीचे पूजा विधी कसे असतात. तर त्याचीही खास माहिती (mangala gauri information in marathi) आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. 

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा (Shravan Month Wishes In Marathi)

मंगळागौरीचा पूजा विधी (Manglagaur Pooja Vidhi)

Manglagaur Pooja Vidhi

मंगळागौरीची पूजा करताना या दिवशी काही महिला उपवास ठेवतात. सकाळी स्नान केल्यानंतर मंगळवारच्या दिवशी ही पूजा करण्यात येते. 

वाचा – नागपंचमीचं महत्त्व (Significance Of Nag Panchami In Marathi)

मंगळागौरीची कथा (Manglagaur Katha)

मंगळागौरीची कहाणी पूजेच्या वेळी भटजींद्वारे सांगण्यात येते. ही कहाणी नक्की काय आहे आणि हे व्रत का करण्यात येते अथवा या व्रतामुळे कोणते फळ मिळते हे या कथेतून कळते. अनादी काळापासून ही कथा सांगण्यात येते ती अशी – 

आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा आम्ही घेत नाही,” असें म्हणून तो चालता झाला. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या मागे लपून बस, अल्लख असे म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाहीं असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणालें, “आपल्या नवर्‍याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला हवा तसा पुत्र देईल.” असं बोलून तो बुवा निघून गेला. तिने आपल्या पतीला सांगितलं.

वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणल. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आंत देवीची मूर्ती आहे. मनोभावें पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “माझ्याकडे घरेदारे, गुरेढोरे, धन द्रव्य सर्व काही आहे; मात्र पोटी पुत्र नाहीं, म्हणून मी दुःखी आहे.” देवी तिला म्हणाली, “तुला संततीचं अर्थात पुत्र सुख नाही, मात्र मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते. अल्पायुषी पुत्र मागितलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी मागितलास तर जन्माध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. जशी इच्छा तुझी असेल ते मागून घे.” त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपती आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या बेंबीवर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; भरपूर घरी नेण्याकरितां घेतले. खाली उतरून त्याने पाहिले तर मोटेत आंबा एकच आहे. असं चार ते पाच वेळा घडलं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे.” फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. तिच्या पोटी गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासां वाढूं लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं असा माझा नवस आहे. असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. त्यामध्ये होती एक सुंदर गोरी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणाली, “काय द्वाड रांड आहे! काय द्वाड रांड आहे! तेव्हा ती गोरी मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणीच रांड होऊ शकत नाही. मी तर तिची मुलगी आहे, मग मी कशी होईन.” हे भाषण त्याच्या मामानं ऐकलं आणि त्याच्या मनांत आलं हिच्याशी आपल्या भाच्याचे लग्न लावून द्यावे, म्हणजे तो दीर्घायुषी होईल. पण हे नक्की कसं घडवून आणायचं ? त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला. इकडे काय झालं ? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढे जर कोणी प्रवासी मिळाला तर बरं होईल, त्याला आपण पुढे करू आणि वेळ साजरी करूं, म्हणून धर्मशाळा शोधू लागले. तर त्यांच्या मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं.

उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोंपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अग अग मुली, तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प क-यात शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे.” तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. कांही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणूं लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बि-हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. दुसरे दिवशीं काय झालं? हिनं सकाळीं उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आईने ते उघडून पाहू लागली, त्यामध्ये हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मंडपात आला. मुलीला खेळयला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाही.” रात्रीची लाडवांची व आंगठीची खूण कांहीं पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो ? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेंकडो लोक येऊन जेवूं लागले.

इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा अचानक जागा झाला, त्यावेळी त्याने आपल्या मामाला सांगितले की, “मला अशा प्रकारचं स्वप्न पडलं.” मामा त्याला म्हणाला, “आता हे ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरी जाऊ.” परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाही.” दासींनीं यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नव-यानं अंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असता. ही सगळी तिचीच कृपा.” सासर आणि माहेरची सर्व माणसं एकत्र आली आणि त्यांनी व्रताचं उद्यापन केलं.

जशी मंगळागौरी देवी तिच्यावर प्रसन्न झाली, तशी ती तुम्हांला आम्हांवर होवो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, हीच देवाची प्रार्थना करा. अशी धर्मराजाला श्रीकृष्णानं सांगितलेली ही कथा साठां उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

अशी ही कहाणी सर्व उपस्थित सवाष्णींना ऐकवण्यात येते. आपले सौभाग्य मंगळागौरीच्या कृपेने अखंड राहो अशीच प्रार्थना या कथेतून करण्यात येते. यानंतर खेळण्यात येतात ते म्हणजे मंगळागौरीचे खेळ. ते आपण जाणून घेऊया. 

मंगळागौरीचे खेळ (Manglagaur Khel)

मंगळागौरीचे खेळ खूपच प्रसिद्ध आहेत. हल्ली तर खास मंगळागौरीच्या खेळांचे कार्यक्रमही आयोजित करण्यता येतात. यामध्ये फुगडी हा प्रकार खूपच प्रसिद्ध आहे. त्याशिवाय झिम्मा आणि इतर खेळही गाण्यांसह खूपच मजेशीर असतात. यामध्ये साधारण 110 खेळांचा समावेश आहे. या सर्व खेळांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो. पूर्वीच्या काळी सतत घरकामात असणाऱ्या महिलांना या मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणींशी खेळण्याच आनंद घेता यायचा. हे खेळ खेळताना महिला गाणी म्हणत आनंद घेत असत. मंगळागौरीचे हे व्रत कष्टाचे आणि दमायचे नसून चपलता देणारे, चैतन्य आणणारे आणि एकजुटीचा आनंद देणारे आहे असे म्हटले जाते. यामध्ये बस फुगडी, वटवाघूळ फुगडी, फिंगरी फुगडी, तवा फुगडी, आगोटापागोटा, गाठोडे, लाटा बाई लाटा, करवंटी झिम्मा, सासू – सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, साळुंकी असे अनेक खेळ खेळवण्यात येतात. साधारणतः 21 प्रकारच्या फुगड्या आणि 6 प्रकारचे आगोटेपागोटे यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे मंगळागौरीच्या पूजेला महिलांना नेहमीच मजा येते. यावेळी खास मराठी उखाणेही घेतात. आपल्या नवऱ्याचे नाव उखाण्यातून घेण्याची मजाच काही वेगळी आहे. 

पाहा उखाणे मराठी नवरदेवासाठी (Marathi Ukhane For Male)

मंगळागौरीची आरती (Manglagaur Aarti)

मंगळागौरीची आरती (Mangla Gauri Aarti) हीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. कोणतीही पूजा संपन्न करताना देवीदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण आरती म्हणतो. पूजा झाल्यावर ही आरती म्हटली जाते. तशीच रात्रभर जागरण करून सकाळी पुन्हा स्नान करून दहीभाताचा नेवैद्य या मंगळागौरीला दाखविण्यात येतो आणि पुन्हा एकदा मंगळागौरीची आरती करण्यात येते. त्यानंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिचे विसर्जन करण्यात येते.  मंगळागौरीची आरतीही अशीच प्रसिद्ध आहे. पारंपरिकता जपणारी ही आरती – 

जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।। रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।

मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।। तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।1।।

पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।। 

सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।। 

पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।2।। 

साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।

आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।3।।

डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।

शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।4।।

न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।5।।

सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।

करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।6।।

लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।

मागुती परतु‍नीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।7।।

मंगळागौर उद्यापन (Manglagaur Udyapan)

कोणत्याही व्रताचे उद्यापन होणे हे तितकेच गरजेचे असते. मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन हे पाच वर्षानंतर करण्यात येते. लग्न झाल्यापासून पाचव्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी या व्रताचे उद्यापन सहसा करण्यात येते. तसे शक्य नसल्यास आणि मंगळागौरीचा थाट मांडला असेल तर त्यासोबतही व्रताचे उद्यापन करता येते. पुण्याहवाचन ठेवण्यासाठी आणि होमहवनासाठी भटजींना पाचारण करण्यात येते. उद्यापनाच्या वेळी आई – वडिलांना हे वाण देण्यात येते. मुलीने आईला सापाची मूर्ती देण्याची पद्धत आहे. तर आईने मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू अथवा वड्या घालून देण्याची पूर्वपरंपरागत पद्धत चालून आली आहे. यामागेही पारंपरिक कथा असून नवरदेव अल्पायुषी असून त्याला साप चावतो आणि नववधूच्या मातेने व्रत केल्यामुळे नवरदेव वाचतो असे सांगण्यात येते. त्या सापाचे रूपांतर हारामध्ये होते आणि म्हणूनच मुलीच्या आईला उद्यापनात वाण म्हणून एकसर (काळे मणी आणि सोन्याचा मणी), जोडवी, कुंकू, कंगवा आणि आरसा असे देण्याची पद्धत आहे. तर मुलीच्या वडिलांना शर्ट, धोतर, टोपी आणि उपरणे अशी भेट देण्यात येते. 

Read More From Festival