बॉलीवूड

प्रेमाच्या नात्याला लागलेला ‘कलंक’

Dipali Naphade  |  Apr 17, 2019
प्रेमाच्या नात्याला लागलेला ‘कलंक’

निर्माते – धर्मा प्रॉडक्शन्स, नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट, फॉक्स स्टार स्टुडिओज

दिग्दर्शक – अभिषेक वर्मन

कलाकार – वरूण धवन, आलिया भट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित, कुणाल खेमू, कियारा अडवाणी आणि संजय दत्त

स्टार – 2.5

रागात घेतलेला निर्णय हा नेहमीच चुकीचा ठरत असतो. समजामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. नात्यांची गुंतागुंत ही माणसांच्या वागण्यावर ठरत असते. पण ती उलगडवणं हे कधीकधी आपल्याही हातात नसतं. नात्याकडे कसं बघायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. ‘कलंक’ हा प्रेमालाच लागतो हे जरी खरं असलं तरीही प्रेम कसं जपायचं आणि व्यक्त करायचं हे मात्र प्रत्येकाच्या हातात नक्कीच आहे. हेच प्रेम एखाद्यासाठी प्रेरणा आहे, तर एखाद्यासाठी कलंक आहे. पण या प्रेमाकडे कोणत्या दृष्टीने पाहायचं हे मात्र आपल्यावर आहे. प्रेमाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी ही वेगळी असते. ‘कलंक’ या चित्रपटाची कथाही अशीच आहे. ही प्रेमाची गुंतागुंत नक्की कशी सोडवली जाते आणि त्याचा शेवट काय होतो हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळतं.

राग, सूड आणि प्रेमाचं समीकरण

सत्या (सोनाक्षी सिन्हा) आणि आदित्य रॉय कपूर (देव चौधरी) यांचं एकमेकांवर अतोनात प्रेम असूनही सत्याला रूप (आलिया भट) बरोबर आपल्या नवऱ्याचं लग्न लाऊन द्यावं लागतं. कारण तिला कॅन्सर झाला असून तिच्याकडे फक्त एक वर्ष असतं आणि आपला नवरा उद्धस्त होईल या भावनेने ती हे लग्न लाऊन देते. 1945 च्या आसपासची ही कथा आहे.  रूपने रागात घेतलेला निर्णय चौघांचं आयुष्य कसं गुंतागुंतीचं करतो हेच या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे. आपल्या आजूबाजूलादेखील अशा कथा घडत असतात. पण त्याकडे अनैतिकपणाचं लेबल लाऊन नेहमीच समाजाने अशा नात्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं आहे. पण कोणत्या परिस्थितीत कोणती माणसं कशी वागतात हे कोणीच सांगू शकत नाही. झफरचं (वरूण धवन) रूपच्या आयुष्यात तिचं देवशी लग्न झाल्यानंतर येणं हे त्याकाळी साहजिकच पटणार नव्हतं. त्यानंतर घडणारं कथानक म्हणजे हा चित्रपट. एका सूडाच्या भावनेने पेटून उठलेला झफर, प्रेमासाठी आसुसलेली रूप. कथानक घडत असताना रूपच्या प्रेमामुळे बदलणारा झफर या सगळ्या गोष्टी या चित्रपटाला बांधून ठेवातात. प्रेम ही एक फुलत जाणारी भावना आहे. पण या चित्रपटाच्या बाबत मात्र ती एक ठिणगी ठरली आहे. माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या भूमिका जरी लहान असल्या तरी महत्त्वपूर्ण आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध थोडा लांबला आहे. पण उत्तरार्धात चित्रपट वेग घेतो. प्रेक्षक म्हणून रूप आणि झफरच्या आयुष्याशी तुम्ही या भागात नक्की समरूप होता. एकीकडे रूप आणि झफरचं प्रेम तर दुसरीकडे हिंदू – मुस्लीम वाद, फाळणी या सगळ्याचं कथानक एकत्र करण्यात आलं आहे. यामुळे कथेला गती देण्याचं काम करण्यात आलं असलं तरीही काही गोष्टी मनाला खटकतात. त्याकाळी एक महिला म्हणून रूपचं इतकं बिनधास्त वागणं मनाला पटत नाही. पण आलिया आणि वरूणने आपल्या व्यक्तीरेखा अप्रतिम साकारल्या आहेत. काही संवाद वगळता दमदार संवाद नाहीत. पण रूप आणि झफर मनात घर करून नक्कीच जातात. माधुरी दीक्षितच्या बहार बेगमने मात्र पुरती निराशा केली आहे. संजय दत्तने आपली भूमिका नेहमीप्रमाणेच चांगली साकारली असली तरीही त्याच्या वाटेला आलेली भूमिका जास्त नाही. या जोडीसाठी चित्रपट बघायला जाणाऱ्यांची नक्कीच निराश होईल.

भव्यदिव्य सेट आणि गुंतागुंत

1945 च्या आसपासची ही कथा दाखवण्यात आली असल्यामुळे या चित्रपटातील भव्यदिव्य काही गोष्टी एक प्रेक्षक म्हणून पटत नाहीत. या चित्रपटामध्ये सर्वात जास्त भाव खाऊन गेला आहे तो म्हणजे देवची भूमिका साकारणार आदित्य रॉय कपूर आणि खलनायकाच्या भूमिकेत असलेला कुणाल खेमू. प्रमोशनच्या वेळी कुणाल खेमू समोर कुठेही आला नसला तरीही या चित्रपटामध्ये कुणालचा ‘अब्दुल’ अप्रतिम साकारला गेला आहे. भव्यदिव्य सेट आणि गाणी या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. पण काही गाण्यांची या चित्रपटामध्ये गरज नव्हती असं वाटतं. तुम्ही जर वरूण – आलिया या जोडीचे चाहते असाल तर, तुम्ही एकवेळ हा चित्रपट त्यांच्यासाठी नक्कीच पाहू शकता. पण थिएटरबाहेर येताना तुमच्या डोक्यात आदित्य आणि कुणालच्या कामाबद्दल नक्कीच विचार येतील. नातं हे प्रेमाशिवाय पूर्ण होत नाही…आणि नात्यात अपेक्षा असतातच. अपेक्षा आल्या की, गुंतागुंत आली. त्यामुळे या सगळ्याचं एक समीकरण म्हणजे ‘कलंक’.

फोटो सौजन्य – Instagram 

हेदेखील वाचा 

‘कलंक’ ट्रेलर प्रदर्शित, गुंतागुंतीच्या नात्याची कहाणी

वरूणची गर्लफ्रेंड नताशाला चाहत्याची विचित्र धमकी

‘इन्शाअल्लाह’ सलमान आणि आलिया पहिल्यांदाच येणार एकत्र

Read More From बॉलीवूड