Budget Trips

मुंबईत आलात आणि इथे नाही गेलात तर तुमच्या मुंबई दौऱ्याला नाही अर्थ

Leenal Gawade  |  May 20, 2019
मुंबईत आलात आणि इथे नाही गेलात तर तुमच्या मुंबई दौऱ्याला नाही अर्थ

‘मुंबई नगरी बडी बाका जशी रावणाची दुसरी लंका…. वाजतो डंका’ मुंबईच्या झगमगटाबद्दल, लाईफस्टाईलबद्दल अनेक ठिकाणी भरभरुन लिहिले जाते. त्यामुळेच मुंबईपासून दूर राहणाऱ्यांना मुंबईचे आकर्षण असते. मुंबईत येऊन त्यांना अनेक गोष्टी करायच्या असतात. पण जर तुम्हाला शॉपिंग आणि मस्त खाऊगल्लीची मजा घ्यायची असेल तर आज आम्ही मुंबईतील अशी काही ठिकाण सांगणार आहोत. जिथे तुम्ही उत्तम शॉपिंग करु शकता आणि मस्त मुंबई स्पेशल खाण्याचा आस्वाद घेऊ शकता. मग करायची का सुरुवात

चर्नीरोड

जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरला तर तुम्ही थेट टॅक्सीकरुन किंवा 66 नंबरची बस पकडून चर्नी रोडला जाऊ शकता. मूळ मुंबईमध्ये चर्नीरोडचा समावेश होतो.

काय खाल?

खिचिया पापड, वडापाव, मिसळपाव असे काही खास पदार्थ खावे तर ते केवळ चर्नीरोड येथेच. तुम्हाला सुजाता, विनय. तांबे उपहारगृह, कोल्हापुरी चिवडा आणि पणशीकर यांच्या येथे मिळणारा अस्सल मराठी मिसळपाव तुम्ही चाखलाच पाहिजे. या शिवाय तुम्हाला नाक्यानाक्यावर खिचिया पापडच्या गाड्या दिसतील. मस्त पापड रोस्ट करुन त्यावर चटणी, कांदा, टोमॅटो, काकडी, शेव, लिंबू पिळून हा खिचिया पापड दिला जातो.

कुठे कराल खरेदी ?

चर्नीरोड येथे झवेरी बाजार, भुलेश्वर, प्रार्थना समाज, चिरा बझार, मनीष मार्केट अशी काही ठिकाणं आहेत. जिथे तुम्हाला हव्या त्या वस्तू मिळू शकतात.अनेक ठिकाणी वस्तू या होलसेल भावात मिळतात.

बोरिवली

पश्चिम रेल्वेवरील बोरीवली एकदम मस्त ठिकाण आहे.कारण तुम्ही शॉपिंग करुन दमल्यानंतर तुमचे पोट तृप्त करणारी खाऊ गल्ली येथे आहे. जर तुम्ही दादरवरुन ट्रेन पकडली असेल तर थेट बोरिवलीस्टेशनवर उतरा. तेथून तुम्हाला पश्चिमेला बाहेर पडायचे आहे. स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला दिसतील दुकान आणि खादाडीची ठिकाणं.. सरदार वल्लभभाई पटेल रोडवर तुम्हाला हे सगळे पाहायला मिळेल.

काय खाल?

बोरिवली भागात गुजराती वस्ती जास्त असल्यामुळे तुम्हाला चटपटीत व्हेज पदार्थ जास्त पाहायला मिळतात. पिझ्झा शेवपुरी, बाहुबली सँडवीच, पावभाजी, पाणीपुरी, चाटचे पदार्थ, खिचिया पापड, समोसा असे काही प्रकार या ठिकाणी मिळतात.

कुठे कराल खरेदी?

स्वस्त आणि मस्त चपला तुम्हाला हव्या असतील तर बोरिवली एकदम परफेक्ट ठिकाण आहे. याशिवाय लेटेस्ट फॅशनचे कपडे, ज्वेलरीचे ट्रेंड तुम्हाला या ठिकाणी अगदी सहज मिळतील. त्यामुळे मुंबईत आल्यानंतर एक फेरी बोरीवलीला होऊन जाऊ द्या.

वाचा – मुंबईतील बेस्ट वडापाव (Best Vada Pav In Mumbai In Marathi)

दादर

मुबंईच्या मध्यभागी दादर आहे. सगळ्या ट्रेन,बस या दादरला हमखास येतातच. त्यामुळे दादरला कायमच गर्दी असते. शेकडोनी लोकं या स्टेशनवर उतरत असतात. दादरची खासियत सांगायची झाली तर बरेच काही आहे. म्हणजे इकडे तुम्हाला शॉपिंगपासून खाण्यापर्यंत वेगवेगळे पर्याय आहेत. जर तुम्ही दादर स्टेशनला उतरणार असाल तर फारच छान. तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस दादरमध्ये अगदी आरामात घालवू शकता. शिवाजी पार्क, नारळी बाग, दादर चौपाटी या ठिकाणी तुम्ही तुमचा थोडा निवांत वेळ घालवू शकता.

काय खाल?

दादर पश्चिमेला श्रीकृष्ण लस्सीचे दुकान आहे. गेली कित्येक वर्ष लस्सीचे हे तुकान अनेकांनी तहान आणि जिभेची चव भागवत आहे. हे दुकान अगदी चिंचोळे आहे.त्यामुळे ते पटकन दिसत नाही. पण साधारण नक्षत्र मॉलच्या समोर हे दुकान आहे.तुम्ही या दुकानात गेलात तर तुम्हाला कळेल की,ही लस्सी का स्पेशल आहे. कारण ही थंडगार लस्सी सर्व्ह करताना त्यावर जाड मलई दिली जाते. ती खाण्यात एक वेगळीच मजा आहे. जरी तुम्हाला दूध, दही आवडत नसेल तरी तुम्हाला ही लस्सी आवडल्यावाचून राहणार नाही.

स्टेशनपासून थोडं लांब पार्कात गेल्यानंतर तुम्हाला खाण्याचे बरेच पर्याय दिसतील. पण संध्याकाळच्या वेळी पार्कात मिळणारी भजी… म्हणजे क्या बात है. तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर भजी आणि चहा मस्त कॉम्बिनेशन आहे.

आता तुम्ही म्हणाल याचे एवढे वैशिष्ट्य काय? काकूंच्या स्टॉलवर मिळणारी भजी गरम तर असतेच पण सोबत मिळणारी चटणी ही एकदम खास असते. तिखट आणि आंबट चटणी ही येथील खासियत आहे. साधारण दुपारी 4 नंतर या काकू येथे बसतात. नारळी बागेच्या विरुद्ध दिशेला आणि वनिता समाज सभागृहाच्या रांगेत तुम्हाला मध्येच काकूंचा स्टॉल तुम्हाला दिसेल.

मुंबईत आलात आणि वडापाव नाही खाल्ला असे कसे होईल. दादरच्या किर्ती कॉलेजकडे वडापाव आहे. जो खूप प्रसिद्ध आहे. हा वडापावही नक्कीच चाखून पाहा

कुठे कराल खरेदी?

मुंबई आणि उपनगरातही अनेक जण शॉपिंगसाठी दादरची निवड करतात. तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अगदी सहज मिळू शकतात. उदबत्तीपासून ते फॅशनेबल ज्वेलरीपर्यंत सगळं काही इथे अगदी सहज मिळते. येथील किर्तीकर मार्केटमध्ये तुम्ही नक्कीच जायला हवे.साड्या, ड्रेसेस, दागिने,घरी वापरण्यासारख्या वस्तू असे बरेच काही तुम्हाला या ठिकाणी अगदी योग्य दरात मिळेल. या शिवाय

दादरमध्ये तुम्हाला ठिकठिकाणी फेरीवाले आणि होलसेल दुकाने दिसतीलच.

*जर तुम्हाला कपड्यांची खरेदी करायची असेल तर हिंदमाता मार्केट ही आहेच.

 घाटकोपर

खादासाठी घाटकोपरची खाऊगल्ली अगदीच प्रसिद्ध आहे. डोसा, सँडवीच,फ्रँकी, पावभाजी, मसाला पाव आईस्क्रिम, गोळा, पान असे कैक वेगळे पदार्थ इथे मिळतात. घाटकोपर पूर्वेला ही खाऊ गल्ली आहे. स्टेशनपासून अगदी दोन ते तीन मिनिटांवर ही खाऊ गल्ली आहे.

आता या खाऊ गल्लीचा तुम्हाला थोडा फेरफटका मारावा लागेल. कारण ही खाऊ गल्ली थोडी पसरलेली आहे. जर तुम्ही मेल्टेड चीझ डोसाचा व्हिडिओ पाहिला असेल तर तो याच खाऊ गल्लीचा आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारातील डोसा आणि सँडवीच मिळतात. त्यांची चव इतकी अप्रतिम असते की, तुम्ही मुंबईत आलात तर ती चाखून पाहायला हवी.

मुंबईतील या 5  ठिकाणी मिळतात उत्तम इनरवेअर्स

कुठे कराल खरेदी?

खादडी झाली पण आता तुम्हाला शॉपिंग कुठे करायची ते देखील कळायला हवे. तर आता तुम्हाला घाटकोपर पूर्वेकडून पश्चिमेकडे जायचे आहे. मिलन शॉपिंग सेंटर असे या बाजाराचे नाव आहे. या ठिकाणी तुम्हाला कपडे, ज्वेलरी, मेकअपचे सामान असे सगळे काही मिळेल.

 मुलुंड

सेंट्रल रेल्वेवरील मुलुंड हे देखील खरेदीसाठी योग्य असलेले ठिकाण आहे. शिवाय या ठिकाणी खाण्यापिण्याची चंगळ आहे ती वेगळीच.

कुठे खाल?

मुलुंडमध्ये अशी कितीतरी ठिकाणे आहेत जिथे खाण्याचे इतके पर्याय आहेत की, तुम्ही मुलुंडला कुठेतरी मुक्काम केला तरी चालेल. मुलुंड पूर्वेकडील स्टेशन परीसरात पावभाजीच्या गाड्या आहेत. मस्त खडा पावभाजीच्या आस्वाद तुम्हाला या ठिकाणी घेता येईल. शिवाय तुम्हाला थंडगार पाणीपुरी आणि चाटचे पर्याय मिळतील.

स्टेशन रोड व्यतिरिक्त तुम्हाला कालिदास सभागृहाच्या समोरील गल्लीतही अनेक स्टॉल्स आहेत.

कुठे कराल खरेदी?

कपड्यांच्या बाबतीतही मुलुंडही तसेच आहे. एकदम टकाटक अगदी फॅन्सी साड्यांपासून ते डिझायनर ड्रेसपर्यंत तुम्हाला सगळे काही अगदी रिझनेबल दरात तुम्हाला अनेक गोष्टी मुलुंडमध्ये मिळू शकतात.

 ठाणे

दादरनंतर जर गाड्या थांबतात त्या ठाण्याला. ठाण्यातही अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. ठाण्याला जाणार असाल तर तुम्हाला लोकं तलावपाळीला गेलात का असा प्रश्न नक्कीच विचारतील.

काय खाल?

ठाण्याला गेलात तर मामलेदार मिसळ,गजानन वडा,राजमाता वडापाव, मोमोज असे काही पदार्थ तुम्ही ठाण्यात आवर्जून खायला हवेत.

राम मारुती रोड, स्टेशन रोड या ठिकाणी हे पदार्थ तुम्हाला आवर्जून खायला मिळतील. नौपाडा रोड येथील अॅपेटाईट मोमोज हे सध्या येथील हाय पॉईंट आहे. कारण इथे तरुणाईची खूप गर्दी असते.

कुठेे कराल खरेदी?

ठाण्यात सगळीकडेच तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू खरेदी करता येतील.अनेक ठिकाणी छोटं मोठी दुकानं आहेत.शिवाय तुम्हाला स्ट्रीट शॉपिंगचा तुम्हाला आनंद घेता येईल.  

(फोटो सौजन्य-Instagram)

Read More From Budget Trips