Travel in India

नाताळ साजरा करायला गोव्याला जात आहात, तर या ठिकाणांना नक्की भेट द्या

Dipali Naphade  |  Dec 14, 2019
नाताळ साजरा करायला गोव्याला जात आहात, तर या ठिकाणांना नक्की भेट द्या

नाताळ आणि गोव्याचं एक अतूट नातं आहे. बऱ्याच ठिकाणाहून नाताळ साजरा करण्यासाठी गोव्यात लोक येत असतात. पण जेव्हा नाताळ साजरा करायला गोव्याला जायचं असतं तेव्हा नक्की कुठे जायचं यावर बरीच चर्चा होते. पुन्हा पुन्हा तिच ठिकाणं फिरण्यात काहीच अर्थ नसतो. नाताळच्या दरम्यान गोव्यातील वातावरण अतिशय अप्रतिम असतं. थंडी आणि सगळीकडे नाताळमधील उत्साहाचं वातावरण. सेलिब्रेशनची तयारी आणि धूम हे सर्व गोव्यात जास्त प्रमाणात असतं. खरं तर इथे ख्रिश्चन लोकवस्ती जास्त असल्याने तिथे नाताळची खरी मजा लुटण्यासाठी बऱ्याच प्रमाणात गर्दी होत असते. आम्ही तुम्हाला इथे गोव्यातील अशी काही ठिकाणं सांगणार आहोत जिथे तुम्ही मनसोक्त नाताळची मजा घेऊ शकता आणि हा नाताळ आयुष्यभरासाठी अविस्मरणीय करू शकता. पाहूया नक्की कोणती आहेत ही ठिकाणं – 

ओल्ड गोव्यातील नाताळ

Instagram

गोव्यामधील प्रत्येक भाग सुंदर आहे. पण ओल्ड गोवा अधिक सुंदर आहे आणि नाताळच्या वेळी इथे खरी मजा अनुभवता येते असं म्हटलं जातं. त्याचं कारणही खास आहे. कारण ओल्ड गोव्यामध्ये जास्त प्रमाणात चर्च आहेत. त्यामुळे नाताळदरम्यान ओल्ड गोवा पूर्णवेळ झगमगाटामध्ये असतो. त्याशिवाय इथली सजावटही पाहण्यासारखी असते. तसंच नाताळच्या वेळी इथे करण्यात येणारी आतषबाजी हे इथलं प्रमुख आकर्षण आहे. त्याशिवाय इथे मिळणारं जेवण. तुम्ही मांसाहारी असाल तर नाताळच्या वेळी तुमची इथे नक्कीच चंगळ होते. ओल्ड गोवामध्ये अशी अनेक हॉटेल्स आहेत जिथे तुम्हाला ताव मारण्यासारखी मेजवानी मिळते. 

अंजुना बीच पार्टी

Instagram

नाताळ म्हटलं की पार्टी आली. तुम्ही जर सोशल असाल आणि पार्टीप्रेमी असाल तर नाताळमध्ये गोव्यात जाऊन अंजुना बीच पार्टी तुम्ही नक्की एन्जॉय करायला हवी. इथली बीच पार्टी प्रसिद्ध आहे. नातापासून ते अगदी न्यू ईअर नाईटपर्यंत रात्रीपासून अगदी पहाटेपर्यंत इथे पार्टी चालू राहाते. त्यामुळे तुम्हाला जर पार्टी आणि नाचाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच गोव्यात नाताळमध्ये अंजुना बीचला भेट द्यायला हवी. कारण सेलिब्रेशनचा आनंद यामध्ये दुप्पट होतो. 

अंजुना फ्ली मार्केट

Instagram

पार्टीला जायचंय किंवा नाताळमध्ये गोवा फिरायचंय तर शॉपिंग तर करायलाच हवं. शॉपिंगशिवाय फिरण्याला महत्त्व येतच नाही. हो की नाही? मग त्यासाठी नाताळमध्ये खास फ्ली मार्केट आहे ते म्हणजे अंजुना फ्ली मार्केट. खरेदी करण्याची मजा घ्यायची आहे तर तुम्ही या फ्ली मार्केटला भेट द्यायलाच हवी. इथे दर बुधवारी बाजार भरतो. तुम्हाला गोव्याला येऊन नक्की काय घेऊन जायचं आहे हे जर कळत नसेल तर या मार्केटमध्ये येऊन नक्कीच तुमचा प्रश्न सुटेल. इथे आल्यानंतर तुम्ही ठरवून आलेल्यापेक्षाही जास्त खरेदी करून जाणार हे नक्की. 

मुंबईत अशापद्धतीने साजरा करा तुमचा 31 st

सॅटर्डे नाईट मार्केट, अर्पोरा

Instagram

गोव्यामध्ये अनेक बाजार आणि नाईट मार्केट्स उपलब्ध आहेत. पण त्यापैकी अप्रतिम असं मार्केट आहे ते नॉर्थ गोव्याचं अर्पोरा मार्केट. नाताळपासून हे मार्केट उघडतं ते साधारण एप्रिलपर्यंत चालू राहातं. यामध्ये तुम्हाला खरेदीसाठी अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे इथे तुम्हाला विविध प्रकारचे कुझीन मिळतात. तुम्ही जर खाद्यप्रेमी असाल तर तुम्ही या मार्केटला नक्कीच भेट द्यायला हवी. तसंच या मार्केटमध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्सदेखील पाहायला मिळतात.

विचित्र पद्धतीने या देशांमध्ये केला जातो नाताळ साजरा, शहराची वाहतूक केली जाते बंद

अगौडा फोर्ट

Instagram

अगौडा फोर्ट हा 1612 मध्ये डच लोकांच्या आक्रमणातून सुरक्षेसाठी बांधण्यात आला होता. हा किल्ला अतिशय मोठा असून यामध्ये पाण्याचा एक मोठा झरा आहे. स्थानिक भाषेत पाण्याला अगुआ म्हणतात त्यामुळेचा याचं नाव अग्वाडा असं ठेवण्यात आलं. आशियातील सर्वात जुने लाईट हाऊस असून ही चार मजली इमारत आहे. तुम्ही इथे अगौडा जेलदेखील पाहू शकता. 

चापोरा फोर्ट

Instagram

चापोरा किल्ल्याचा इतिहास हा समृद्ध आहे आणि हा किल्ला आजही तितकाच सुंदर आणि शांत आहे. अनेक आक्रमण आणि शासनांखाली या किल्ल्याने श्वास घेतला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. याची सुंदरता इतकी आहे की त्या काळी बादशाह अकबरदेखील या किल्ल्याच्या सुंदरतेला भुलला होता. बादशाह अकबरने हा किल्ला जिंकून या किल्ल्याला आपला महत्त्वाचा कँप बनवल्याचं सांगण्यात येतं. चापोरा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या किल्ल्यावरून सुर्योदय आणि सूर्यास्त पाहणं खूपच सुखावह आहे.  त्यामुळे वर्ष संपताना या किल्ल्यावरून खास सूर्यास्त पाहण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. 

ख्रिसमसचा आनंद द्विगुणित करा या शुभेच्छा, मेसेजेस, स्टेटस आणि कोट्सनी

सलीम अली पक्षी अभयारण्य

Instagram

नाताळच्या वेळी तुम्हाला जर मनःशांती हवी असेल आणि तुम्हाला तुमचा वेळ अगदी छान  घालवायचा असेल तर हा उत्तम पर्याय आहे. भारतातील प्रसिद्ध पक्षी विशेषतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावावरील हे अभयारण्या अप्रतिम आहे. इथे तुम्हाला शेकडोच्या संख्येने विविध प्रजातीचे पक्षी दिसतील. त्यांचे आवाज तुमच्या मनाला नक्कीच सुख देतील. याजवळच एक वायसराय मीनार आहे आहे. जे काळ्या दगडांनी बनवण्यात आलं आहे आणि 16 व्या शतकात याचं निर्माण करण्यात आलं आहे. हे स्थळ खूपच सुंदर आहे. 

हा नाताळ आणि नवीन वर्षाची सुरूवात तुम्ही जर गोव्यात जाऊन करणार असाल तर तुम्ही नक्की या ठिकाणांना भेट द्या आणि गोव्यातील वास्तव्याचा आनंद लुटा. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From Travel in India