घर आणि बगीचा

रक्षाबंधन साजरी करण्यामागे आहे हा इतिहास, जाणून घ्या कारणं

Leenal Gawade  |  Jul 31, 2020
रक्षाबंधन साजरी करण्यामागे आहे हा इतिहास, जाणून घ्या कारणं

 

आज राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन आहे. बहीण भावाला राखी बांधते. राखी हा साधासुधा धागा नाही तर भावाने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन असते. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते. म्हणजेच पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी खास रक्षाबंधन शुभेच्छा संदेश दिले जातात. पूर्वापार चालत आलेल्या या परंपरेबद्दल अनेकांना कुतूहल असेल की, या सणाला नेमकी कशी सुरुवात झाली. रक्षाबंधनाची माहिती, त्याचा इतिहास काय ? या सणामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते ती तुम्हाला माहीत आहे का? आज आपण जाणून घेऊया या दिवसाचे पौराणिक महत्व.

लाडक्या भावाच्या राशीनुसार बांधा त्याला ‘या’ रंगाची राखी

लक्ष्मी मातेने विष्णूंकडे केली भावाची मागणी

Instagram

 

जर तुम्ही राखीपौर्णिमेचा पौराणिक इतिहास विचारलात तर माता लक्ष्मीची एक कथा सांगितली जाते. ती अशी 

बळी नावाचा राजा अश्र्वमेध यज्ञ करत होता. त्याक्षणी तेथे भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले. बळी राजा हा त्याच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता. तेच पाहण्यासाठी भगवान विष्णून वामन अवतार घेऊन त्याच्यासमोर उभे ठाकले. त्यांनी बळी राजाला तीन पाऊल जमीन दान करायला सांगितली. बळी राजा लगेच तयार झाला. त्याने वामन अवतार रुपी विष्णूंना जमिनीवर तीन पावलं ठेवण्यास सांगितली. विष्णूंनी पावलं मोजण्यास सांगितले. त्यावेळी विष्णूंच्या एका पावलात पृथ्वी सामावली. दुसऱ्या पावलात स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळी राजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळात ढकलले.

बळी राजाने तो महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णय मान्य केला. मात्र त्याने विष्णूंकडे एक वचन मागितलं.  राजा बळी म्हणाला की, मला असा आशीर्वाद घ्या की, इथून कोणत्याही क्षणी तुमच्याकडे पाहू शकेन. अगदी झोपेत, जागा असताना अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे. हा आशीर्वाद देवानेही मान्य केला. आणि बळी राजासोबत पाताळात राहणे पसंत केले. 

 देवी लक्ष्मी यांना  भगवान विष्णूंचे दर्शन दुर्लभ झाले.त्यांना चिंता वाटू लागली . त्यावेळी भ्रमंती करत असलेल्या नारद मुनींना त्यांनी पाहिले. त्यांच्याकडे विष्णू यांची चौकशी केली. त्यावेळी नारदमुनींनी घडलेला सगळा प्रकार सांगितला.विष्णूंना वैकुंठात परत बोलावण्यासाठी काय करावे याचा उपाय विचारला, त्यावेळी नारद मुनींनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडे विष्णू भगवानची मागणी करा असे सांगितले. 

ठरल्याप्रमाणे माता लक्ष्मी तातडीने पाताळात गेल्या. विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या. बळी राजाने माता लक्ष्मीकडे त्यांना का रडता असे विचारले? त्यावेळी त्या म्हणा्या की, माझा कोणीही भाऊ नाही. तातडीने बळी राजाने त्यांना धर्म बहीण म्हणून मान्य केले.त्यांनी बळीराजाला भाऊ मानून त्यांच्याकडे भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठण्याती मागणी केली. त्या दिवसापासून बहीण- भावाचे नाते जपणारा असा हा सण केला जातो. 

कालांतराने मनगटावर वेगवेगळ्या प्रकारच्या राखी बांधून हा सण साजरा केला जातो. तुम्हा सगळ्यांना राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा!

दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचं महत्व, अशी करा लक्ष्मीची आराधना

Read More From घर आणि बगीचा