अॅक्सेसरीज

पावसाळ्यातही राहा ‘स्टायलिश’, छत्री बदलेल तुमचा लुक

Dipali Naphade  |  Jun 9, 2019
पावसाळ्यातही राहा ‘स्टायलिश’, छत्री बदलेल तुमचा लुक

जून महिना सुरु झाला की, वेध लागतात ते पावसाचे. पाऊस म्हटला की, चिखल आणि सगळीकडे पाणीच पाणी. अशावेळी आपल्या स्टाईलचे तीन तेरा वाजतात. पण आजकालचं जग हे अधिक फॅशनेबल झालं आहे. सध्याच्या तरूणाईला प्रत्येक गोष्टीत स्टाईल हवी असते. नेहमीच स्टायलिश राहणं हे कोणाला नाही आवडणार? त्यामुळे पावसाळ्यामध्ये कशा प्रकारे स्टायलिश राहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खरं तर रोज आपण वेगवेगळ्या पद्धतीची फॅशन करत असतो. वनपिस, शॉट्स, गाऊन अथवा सँडल अशा विविध फॅशन आपल्या रोजच्या रोज बदलत असतात. पण पावसाळ्यात सुंदर कपडे घालून स्टायलिश राहणं बऱ्यापैकी कठीण आहे. पण मैत्रिणींनो तुम्हीदेखील पावसाळ्यात फॅशन करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट पावसाळ्यात लागते ती म्हणजे ‘छत्री’. छत्री म्हटल्यानंतर प्रश्न पडला ना की, याचा आणि स्टाईलचा काय संबंध? पण याचा संबंध आहे. सध्या छत्र्यांच्याही बऱ्याच स्टाईल्स आल्या आहेत आणि या स्टायलिश छत्री वापरून तुम्हीदेखील अधिक स्टायलिश राहू शकता. जाणून घेऊया मग पावसाळ्यात कसं राहायचं स्टायलिश.

अॅनिमल प्रिंट –

प्राण्यांविषयी प्रेम असणाऱ्या व्यक्तींसाठी या अशा प्रकारच्या छत्री नक्कीच चांगल्या आहेत. या दिसायला वेगळ्याही दिसतात आणि तुम्हाला त्यामुळे एक वेगळा लुक मिळतो.

आर्मी प्रिंट –

आर्मीचे कपडे घालायला सगळ्यांनाच आवडते. पण आर्मी प्रिंटच्या छत्री आकर्षक दिसतात. ही छत्री हातात घेतल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच लुक मिळतो. आर्मी प्रिंट दिसायला अतिशय आकर्षक असल्यामुळेच तुम्हालाही एक वेगळा लुक यामुळे मिळतो.

कलर व्हील स्टीक –

रंगबेरंगी अशी ही छत्री दिसायला तर छान असतेच. पण मोठी असल्यामुळे पावसामध्ये कमी भिजायला होते. या छत्रीचा तुम्हाला जास्त फायदा होतो. कारण तुमच्याबरोबर असणारं सामान आणि तुम्ही या दोन्ही गोष्टी या छत्रीमुळे सुरक्षित राहतात. ही छत्री मोठी असल्यामुळे कितीही पाऊस पडत असला तरीही तुम्ही कमी प्रमाणात भिजता.

चेक्स प्रिंट –

कॉर्पोरेट विश्वात आवर्जून वापरलं जाणारं चेक्स प्रिंट आता छत्र्यांमध्येही दिसतं आहे. यामध्ये काळा, पांढरा, गुलाबी आणि निळा हे रंग जास्त प्रमाणात दिसतात. कॉर्पोरेटमध्ये चेक्स प्रिंटला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुमच्या या स्टायलिश ड्रेससह अशी छत्रीही शोभून दिसते.

जम्बो –

एकाच वेळी दोन माणसांना आरामात सामावून घेणारी ही जम्बो छत्री, कितीही जोराचा पाऊस आला तरी तुम्हाला भिजू देत नाही. फक्त तुमची उंची कमी असली तर तुम्हाला ही छत्री सांभाळायचा थोडा त्रास होण्याची शक्यता असते. पण तुम्ही ती व्यवस्थित सांभाळू शकणार असाल तर पावसाळ्यात ही छत्री हा सर्वात उत्तम पर्याय आहे.

डोम शेप्ड –

बाजारात आजकाल या डोम शेप्ड छत्रीची चलती आहे. त्यातही भारतातली विविध प्रेक्षणीय स्थळांची चित्रं असलेल्या डोम शेप्ड छत्र्यांना तरुणाईची विशेष पसंती आहे. ही जरा जास्त स्टायलिश लुक तुम्हाला मिळवून देते. त्यामुळे कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींमध्ये या छत्रीला जास्त पसंती आहे.

पोलका डॉट –

रेट्रो फॅशनची ओळख असणारे हे पोल्का डॉट म्हणजे तरुणाईचं ऑल टाइम फेव्हरेट. पण फक्त तरूणाई नाही तर सगळ्यांनाच हा प्रकार आवडतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही छत्री पटकन सुकते आणि दिसायलाही स्टायलिश आहे.

फ्रिल

आकर्षक रंगाच्या या छत्र्यांना कडेला फ्रिल आहे. पिवळ्या, गुलाबी, लाल रंगांबरोबर प्रिंटेड कपड्यातही या फ्रिल असलेल्या तुमचा पावसाळी लुक अधिक आकर्षक बनवतात. यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रंगांची उधळण दिसून येते.

यावर्षी तुम्ही कोणत्या प्रकारची छत्री घेऊन तुमचा लुक स्टायलिश बनवणार आहात हे लवकर ठरवा.

फोटो सौजन्य – Instagram  

हेदेखील वाचा 

जाणून घ्या कोणत्या जीन्सवर कोणता Top दिसेल Perfect!

उंची जास्त असलेल्या मुलींसाठी खास फॅशन टीप्स

इंडियन वेअरमध्ये स्लीम दिसण्यासाठी फॉलो करा या टीप्स

Read More From अॅक्सेसरीज