Diet

ओमेगा-3 युक्त आहार घेतल्यास हार्ट अटॅकमुळे येणाऱ्या मृत्यूचा धोका होतो कमी

Trupti Paradkar  |  Nov 2, 2020
ओमेगा-3 युक्त आहार घेतल्यास हार्ट अटॅकमुळे येणाऱ्या मृत्यूचा धोका होतो कमी

जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नवीन अभ्यासातील संशोधनानुसार, चरबीयुक्त माशांसारख्या जलचरांमध्ये सापडणारे इकोसॅपेण्टेनॉइस अॅसिड (ईपीए) व अक्रोडासारख्या वनस्पतीजन्य पदार्थामध्ये सापडणारे अल्फा-लिनोलेनिक अॅसिड अशा ओमेगा-3 ने समृद्ध अन्नपदार्थांचे नियमित सेवन करणा-या लोकांना हृदयविकाराच्या धक्काने येणारा मृत्यूचा धोका कमी झालेला आढळला आहे. याशिवाय, एएलए आणि ईपीए अशा ओमेगा-3 च्या दोन्ही प्रकारांनी समृद्ध अन्नपदार्थांचे सेवन करणाऱ्यांना आरोग्याचे सर्वोत्तम लाभ मिळतात असंही सिद्ध झालं आहे. याचं कारण असं की या दोन्ही प्रकारांच्या ओमेगा-3 च्या समन्वयाचा प्रभाव म्हणून शरीरात अनन्यसाधारण संरक्षक गुणधर्म तयार होतात आणि त्यापासून ह्रदयाचे संरक्षण होते.

Shutterstock

काय सांगते हे संशोधन

कॅलिफोर्निया वॉलनट कमिशनचे सहाय्य लाभलेल्या तसेच याच नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या “अ रिव्होल्युशन इन ओमेग्रा-३ फॅटी अॅसिड रिसर्च” या संपादकीयाने शेअर केलेल्या या निरीक्षणात्मक अभ्यासात ९४४ जणांचा सहभाग करण्यात आला होता. या सर्वांना तीव्र हार्ट अॅटॅक येऊन गेलेला होता व त्यांच्या हृदयाकडे जाणा-या प्रमुख धमन्यांपैकी एक धमणी ब्लॉक झालेली होती. क्लिनिशिअन्स या अवस्थेला एसटी-सेगमेंट इलिव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन (एसटीईएमआय) असं म्हणतात तर सामान्य लोकांमध्ये ही अवस्था ‘विडो-मेकर’ हार्ट अॅटॅक म्हणून अधिक परिचित आहे. या अभ्यासातील प्रमुख संशोधक आयएमआयएम (हॉस्पिटल डेल मार मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) आणि बार्सिलोना बीटा ब्रेन रिसर्च सेंटरमधील सहयोगी संशोधक डॉ. अलेक्स साला-व्हिला यांनी स्पष्ट केलं आहे की, “हार्ट अॅटॅक्स आजही खूप मोठ्या प्रमाणात आढळणारी अवस्था आहे आणि रुग्णाला जिंवत ठेवण्यासाठी दिल्या जाणा-या उपचारांसोबतच, हार्ट अॅटॅक येऊन गेल्यानंतर रुग्णाच्या आयुष्याचा दर्जा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून संशोधक अजूनही संशोधन करत आहेत. या संशोधनातील नावीन्यपूर्ण बाब म्हणजे हार्ट अॅटॅक येऊन गेलेल्या रुग्णांची प्रकृती सुधारण्यातील दीर्घकालीन निष्पत्तीत एएलए आणि ईपीएल हे दोन्ही जोडीने काम करतात असे दिसून आले आहे. त्यामुळे मासांहार म्हणजेच समुद्री जलचर व शाकाहारींनी वनस्पतीजन्य पदार्थ अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांतून ओमेगा-3 घेतल्यास, म्हणजेच मासे, अक्रोड आणि जवस या अशा पदार्थांचे सेवन केल्यास अशा लोकांना सर्वात जास्त संरक्षण मिळेल असे या संशोधनात आढळून आले आहे.” 

हे संशोधन करण्यात आलेल्या रुग्णांचे सरासरी वय 61 होते आणि त्यात 78 टक्के पुरुष होते. हे रुग्ण रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. संशोधकांनी त्यावेळी त्यांच्या रक्तातील ओमेगा-3ची पातळी निश्चित केली. हार्ट अॅटॅक येण्यापूर्वीच्या काही आठवड्यांत त्यांच्या आहारात ओमेगा-3चे प्रमाण किती होते हे जाणून घेण्याचा हा खात्रीशीर मार्ग होता. पुढील पायरी म्हणजे हार्ट अॅटॅक आला त्यावेळी ज्या रुग्णांमध्ये ओमेगा-3ची पातळी अधिक होती, या रूग्णांच्या आयुष्यात पुढील तीन वर्षांमध्ये कोणतीही आरोग्याबाबत गुंतागुंतीची समस्या निर्माण होण्याचा धोका यामुळे कमी झाला का, या मुद्यांवर या संशोधनात  अभ्यास करण्यात आला.ज्या रुग्णांच्या रक्तामध्ये एएलएची पातळी अधिक दिसून आली त्यांना पुढील तीन वर्षे एकंदर मृत्यूचा धोका कमी झालेला होता, असे संशोधकांना आढळले. त्याचप्रमाणे ज्यांच्या रक्तात ईपीएची पातळी अधिक होती, त्या रुग्णांमध्येही मृत्यूचा धोका तसेच कार्डिओव्हस्क्युलर कारणांमुळे त्यांना भविष्यात पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागण्याचा धोका कमी झालेला आढळला. हार्ट अटॅकची लक्षणं माहीत असल्यासही तुम्हाला काळजी घेता येते. 

कार्डिओव्हस्क्युलर आजार हे भारतातील मुख्य आजारांपैकी एक आहेत. भारतात सीव्हीडी व सीव्हीडीच्या दृष्टीने धोक्याच्या घटकांचे प्रमाण अधिक असल्याने हे एपिडिमिओलॉजिकल स्थित्यंतर घडत आहे. 2016 मध्ये भारतात सीव्हीडींचे अंदाजे प्रचलन 54.5 दशलक्ष होते. आज भारतात होणा-या 4 मृत्यूंपैकी एक हा इस्केमिक हृदयविकारांसह होणारे सीव्हीडी आणि पक्षाघात यांच्यामुळे होत असल्याचे आढळून आलेलं आहे. या विकारांचे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक आहे. हे आजार रुग्णाच्या सर्वांत उत्पादनक्षम कालखंडात होऊ शकतात आणि त्याचे विध्वंसक सामाजिक व आर्थिक परिणाम रुग्णाला भोगावे लागतात. 

Shutterstock

जाणून घ्या याबाबत तज्ञ्जांचा सल्ला

प्रख्‍यात कार्डियोलॉजिस्‍ट पद्मश्री डॉ. मोहसीन वाली यांच्या मते, “अक्रोड हृदयाला निरोगी ठेवणारा एक अन्नपदार्थ आहे, या मता फार पूर्वीच मान्यता मिळालेली आहे. कोलेस्टरॉल, रक्तदाब, दाह, एण्डोथेलिअल फंक्शन व प्लाक तयार होणे यांसारख्या कार्डिओव्हस्क्युलर आरोग्यात बाधा आणणा-या अवस्था सुधारण्यासाठी अक्रोड उपयुक्त पदार्थ आहे. असे जवळजवळ 30 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या संशोधनांतून दिसून आले आहे. ओमेगा-3 एएलएचा अक्रोड हा सर्वोत्तम वनस्पतीजन्य स्रोत आहे. दर 28 ग्रॅम अक्रोडांतून 2.5 ग्रॅम ओमेगा-3 एएलए मिळते. एक निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाला आहारात काही बदल करणे भाग आहे. प्रत्येक जेवणात फळे-भाज्या खाण्याचा तसेच अक्रोडासारख्या हृदयासाठी आरोग्यकारक पदार्थाचा उपयोग असलेले खाद्यपदार्थ स्नॅक्स म्हणून घेण्याचा संकल्प आपण करू शकतो. मूठभर किंवा 28 ग्रॅम अक्रोड आपल्याला दैनंदिन आहारात समाविष्ट केल्यास निरोगी हृदयासाठी तो निर्णायक घटक ठरेल.”

या सर्व निष्पत्ती प्रोत्साहक असल्या, तरी त्या कारण व परिणाम सिद्ध करत नाहीत. ईपीए व एएलएचे ग्रहण विशेषत्वाने निष्पत्तीत योगदान देते की यावर सामाजिक-आर्थिक दर्जा, शिक्षण व फार्माकोलॉजिक उपचारांचाही परिणाम होतो हे निश्चित करण्यासाठी अतिरिक्त संशोधनांची गरज आहे. डोकोसॅहेक्झॉनिक आम्लाचा (डीएचए, चरबीयुक्त माशांद्वारे पुरवला जाणारा ओमेगा-3चा आणखी एक प्रकार) अभ्यास या संशोधनात करण्यात आलेला नाही.

 

 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

निरोगी जीवनशैलीचे रहस्य दडले आहे आयुर्वेदात

दुधाच्या या रेसिपी तुमचं वजन घटविण्यासाठी ठरतील फायदेशीर

आहारात गव्हाचा समावेश करुनही कसं कमी करावं वजन

Read More From Diet