अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीत यश मिळावं म्हणून आपलं 100% त्यासाठी खर्ची करतो, पण तरीही आपल्याला हवं तसं यश मिळत नाही. काहीतरी उलटं होतं आणि अपयश येतं. मग ते ऑफिसमधलं प्रमोशन असो वा परीक्षेत फर्स्ट क्लास मिळवण्यासाठी केलेली तयारी असो वा यशस्वी आयुष्याबाबत असो. प्रत्येकवेळी एखादं काम नाहक रखडतं किंवा होतच नाही. या सर्व गोष्टींसाठी जवाबदार असू शकते तुमची झोप. हो. कारण झोपेचा संबंध तुमच्यातील उर्जेशी असतो. तुम्ही जेवढं गाढ झोपाल तेवढी तुम्हाला चांगली उर्जा मिळते. उशिरा झोप लागणे, रात्री वारंवार झोप मोडणे यांसारख्या समस्या असल्यास याचा संबंध तुमच्या बेडरूमच्या वाईट वास्तूशी असू शकतो. जर तुम्ही तुमच्या बेडरूममधील काही गोष्टींकडे लक्ष दिलंत तर तुमचं गुडलक नेहमीच चांगलं राहील. याकरता तुम्हाला फक्त काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.
Table of Contents
जर तुमच्या बेडरूमच्या वास्तूबाबत सांगितलेल्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतलीत तर वैवाहिक आयुष्यातील सुख-शांती, मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या किंवा तुमच्या करियरमध्ये यश प्राप्त होईल, तसंच घरात कधीच कोणत्याही प्रकारची चणचण जाणवणार नाही. वास्तूमध्ये केलेल्या उपायांमुळे नकारात्मक उर्जा नष्ट होऊन सकारात्मक उर्जेत वाढ होते. आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार बेडरूम टिप्स (bedroom vastu shastra in marathi) शेअर करणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही आयुष्य शांतेतत आणि सुखाने घालवू शकता.
नवरा-बायकोसाठी बेडरूम वास्तू टीप्स
मुलांच्या बेडरूमसाठी वास्तू टीप्स
वास्तूनुसार बेडरूममध्ये ठेवू नयेत या वस्तू
बेडरूम कोणत्या दिशेला असावं
वास्तू शास्त्र म्हणजे काय (What Is Vastu Shastra)
वास्तू टीप्स जाणून घेण्याआधी तुम्हाला वास्तूशास्त्र काय आहे?, हे माहीत हवं. अनेक लोकांना वास्तू शास्त्र आणि ज्योतिष शास्त्र एकच आहे, असं वाटतं. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की, ही दोन्ही शास्त्र एकमेंकाना पूरक आहेत. खरंतर वास्तू हे भारतातील प्राचीन विद्यांपैकी एक आहे, ज्याचा संबंध दिशा आणि उर्जैशी आहे. या दिशांच्या आधाराने एखाद्या विशेष स्थानाच्या आसपास असलेल्या नकारात्मक उर्जैला सकारात्मक करता येतं. ज्यामुळे त्या नकारात्मक उर्जैचा मानवी जीवनावर प्रतिकूल प्रभाव पडत नाही. मुघल काळात बनवण्यात आलेल्या इमारती आणि घरांमध्ये, इजिप्तमधील पिरॅमिडच्या निर्माण करण्यात वास्तू शास्त्राचा आधार घेतल्याचं समोर आलं आहे.
बेडरूम कोणत्या दिशेला असावं (Bed Position As Per Vastu In Marathi)
– कुटुंबामध्ये जितकी लोक असतात तेवढ्या वेगवेगळ्या बेडरूम असतात. वास्तूमध्ये या वेगवेगळ्या बेडरूमच्या दिशाही वेगवेगळ्या सांगण्यात आल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया वास्तूनुसार घरातील कोणत्या सदस्याचं बेडरूम कोणत्या दिशेला असावं ते.
– मास्टर बेडरूम म्हणजे घरातील मुख्य व्यक्ती ज्या खोलीत झोपतात ते बेडरूम नैऋत्य कोन (दक्षिण- पश्चिम दिशेचा कोपरा) मध्ये असलं पाहिजे. हे त्या व्यक्तीसाठी शुभ मानलं जातं.
– मुलांचं बेडरूम हे नेहमी पश्चिम दिशेला असाव. हे त्यांच्या प्रगतीमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ देत नाही.
– अविवाहीत मुलगी आणि पाहुण्यांसाठी असलेलं बेडरूम हे उत्तर-पश्चिम दिशेला असावं. कारण या दिशा येण्याजाण्याशी निगडीत आहेत.
या दिशेला असू नये बेडरूम (Direction For Bedroom Should Not Be)
– उत्तर-पूर्व दिशेला कधीही बेडरूम असू नये कारण या दिशेला देवी-देवतांचं स्थान आहे आणि या दिशेला बेडरूम असल्यास बेडरूममध्ये धनाची हानी आणि अशांती कायम राहते.
– दक्षिण-पूर्व दिशेलाही बेडरूम असू नये कारण ही दिशा अग्नी कोन आहे, जी आक्रमक स्वभावाशी संबंधित आहे.
– घराच्या मध्य भागी बेडरूम असणं योग्य मानलं जात नाही. कारण या भागाला ब्रम्हाचं स्थान मानलं जातं.
वास्तूनुसार निवडा भिंतींचे रंग (Color For Bedroom Wall)
रंगांचं आपल्या आयुष्यात फार महत्त्व आहे आणि हे योग्यही असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. कारण रंग हे आपल्या मनोविश्वावर प्रभाव टाकतात. खरंतर काही खास रंग हे खास भावना निर्माण करतात. त्यामुळे बेडरूममध्ये जिथे आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो, तेथील रंगाचं संतुलन होण गरजेचं आहे. ज्यामुळे सुख-शांतीपूर्ण जीवन आपल्याला जगता येईल. मुलांच्या बेडरूममधील भिंतीना पांढरा किंवा हलका रंग असला पाहिजे. तर मास्टर बेडरूममध्ये निळा रंग हा वास्तूनुसार एकदम परफेक्ट आहे.
नवरा-बायकोसाठी वास्तुशास्त्रानुसार बेडरूम (Couple Bedroom Vastu Shastra In Marathi)
– बेडरूममध्ये कपडे ठेवायचं कपाट हे उत्तर- पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असावं.
– बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक सामान असल्यास ते खोलीच्या दक्षिण- पूर्व कोपऱ्यात ठेवावं.
– बेडरूममधील दक्षिण- पश्चिमी कोपरा कधीही रिकामा असू नये. तिकडे खुर्ची किंवा टेबल आवर्जून असावं.
– बेडरूममध्ये झोपताना कपलचं डोक नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे असावं.
– बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारच्या मुद्द्यावर चर्चा करू नये. कारण ही खोली प्रेम आणि आराम करण्यासाठी आहे. भांडण किंवा वाद करण्यासाठी नाही.
– बेडरूमच्या भिंती कोणत्याही प्रकारे तोडफोड झालेल्या नसाव्या. यामुळे कपलच्या आयुष्यातही दुरावा येण्याची शक्यता असते.
– बेडरूममध्ये असा कोणताही फोटो लावू नये, ज्यामध्ये हिंसा दाखवण्यात आली असेल. तसंच बेडचं डोक असलेल्या बाजूला फ्रेम किंवा घड्याळ लावू नये.
मुलांच्या वास्तुशास्त्रानुसार बेडरूम टीप्स (Vastu Shastra In Marathi For Children’s Bedroom)
– मुलांच्या बेडरूमचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा. तसंच लक्षात ठेवा की हा दरवाजा सिंगल असावा डबन नाही.
– झोपताना मुलांचं डोक नेहमी पूर्व दिशेला आणि पाय पश्चिम दिशेला असावेत. यामुळे बुद्धी तल्लख होते.
– मुलांच्या बेडरूममध्ये स्टडी टेबल किंवा खुर्ची दक्षिण दिशेला ठेवावी. ज्यामुळे एकाग्रता कायम राहते.
– मुलांच्या बेडरूममध्ये बेडसमोर कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू नसाव्यात. यामुळे त्यांच्या आरोग्य आणि मेंदूवर नकारात्मक प्रभाव पडतो.
– लहान मुलांच्या बेडरूममधील लाईटींग कधीही प्रखर असू नये आणि खूप कमीही असू नये.
वास्तूनुसार बेडरूममध्ये ठेवू नयेत या वस्तू (Items Should Not Be In Bedroom)
1 – बेडच्या आसपासची जागा नेहमी स्वच्छ असली पाहिजे. शक्य असल्यास बेड सरकवून खालील धूळही साफ करावी. कारण जर बेडच्या खाली धूळ-घाण असेल तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. घरातील कोणी ना कोणी सदस्य आजारी राहतो, त्यामुळे बेडच्या खालील धूळही नेहमी स्वच्छ करावी.
2 – तुमची खोली अशी असावी की, जेणेकरून पाहूणे आल्यास दरवाज्यातून त्यांना तुमच्या बेडरूममधील बेड समोरच दिसणार नाही. जर तुमचा बेड दरवाज्यासमोर असेल तर तो थोडा शिफ्ट करावा, नाहीतर वास्तूदोषामुळे तुमच्या दांपत्य जीवनात संकट येऊ शकतं. जर तुमची खोली छोटी असेल आणि बेड शिफ्ट करणं शक्य नसल्यास दरवाज्याला पडदा लावा.
3 – तुमच्या बेडरूममध्ये अशी कोणतीही गोष्ट नसावी, ज्याने आवाज होईल. जसं रेडिओ, टीव्ही किंवा कोणतंही वाद्य. यामुळे आर्थिक समस्या, मानसिक तणाव, आजार यासारख्या समस्या कायम राहतात. तुमच्या बेडरूममध्ये अश्या ठिकाणी विंडचाईम लावा जिथे हवा खेळती असेल. विंडचाईमचा मधुर आवाज तुमच्या कानावर पडत राहिला पाहिजे, म्हणजे त्याच्या मधुर आवाजाने तुम्हाला शांतता मिळेल आणि तणावही कमी होईल. तसंच घरात भरपूर सकारात्मक उर्जाही निर्माण होईल.
4 – बेडच्या समोर कधीही आरसा नसावा. वास्तूशास्त्रानुसार, सकाळी उठून कधीच पहिल्यांदा आरसा पाहू नये. जर तुम्ही असं केलंत तर दिवसभर तुमच्यासोबत अयोग्य गोष्ट होऊन तुम्ही दुःखी व्हाल. सकाळी उठून असा फोटो पाहावा, ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक उर्जा मिळेल.
5 – आजकालच्या मॉडर्न काळात बेडरूममध्येही चपला-बूट ठेवण्यात येतात. जे योग्य नाही. झोपण्याच्या खोलीत कधीही बाहेर घालायच्या चपला किंवा बूट ठेऊ नये. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे प्रयत्न करा की, बेडरूमच्या बाहेर चपला-बूट ठेवण्यासाठी वेगळी जागा करा.
6 – चूकूनही बेडच्या आसपास खाण्याच्या कोणत्याही गोष्टी ठेऊ नका किंवा बेडरूममध्ये खाऊ नका. असं करणं दारिद्र्याचं चिन्ह होतं. जेवण हे नेहमी किचन किंवा डायनिंग रूममध्ये बसून स्वच्छ जागेवर खावं.
7 – लक्षात ठेवा की, बेड कधीही छताच्या खांबाखाली नसावा. जर अशा ठिकाणी तुमचा बेड असल्यास तो हलवावा. कारण खांबाच्या खाली झोपल्याने तणाव जाणवतो.
8 – बेडच्या मागे कोणतीही खिडकी किंवा उघडी जागा नसावी. यामुळे तुमच्या आसपासची सगळी सकारात्मक उर्जा बाहेर निघून जाते. त्यामुळे बेडच्या मागील बाजूस भिंत असावी. म्हणजे तुम्हाला जास्त उर्जा मिळेल.
9 – बेडरूममध्ये झऱ्याचा किंवा पाणी असलेला फोटो कधीही नसावा. यामुळे घरात नेहमी आर्थिक तंगी कायम राहते.
10 – बेडरूममध्ये डोक नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे असावं. यामुळे झोपेत कोणताही अडथळा येत नाही.
फोटो सौजन्य – Instagram
हेही वाचा –
यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स (Goodluck Vastu Tips)
उशांमुळे घराला आणा वेगळा ‘लुक’
‘साईबाबांची ११ वचनं’ जी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता दूर करतील
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade