फॅशन

Cotton and Handloom Blouse Designs | कॉटन आणि हॅंडलूम ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स

Trupti Paradkar  |  Jan 24, 2019
Cotton and Handloom Blouse Designs | कॉटन आणि हॅंडलूम ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स

साडी हा प्रत्येक स्त्रीचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र कोणत्याही साडीचं रुप खुलून दिसतं ते कानातल्या ज्वेलरीने किंवा त्या साडीसोबत कॅरी केलेल्या ब्लाऊजमुळे. साडीला हटके लुक देण्यासाठी तुम्ही साडीवर कोणत्या स्टाईलचं ब्लाऊज कॅरी करता हे फार महत्त्वाचं असतं. काळानूरुप ब्लाऊजचा ट्रेंड सतत बदलत असतो. पूर्वीसारखं मॅचिंग ब्लाऊज घालण्याचा ट्रेंड आता नाही. पूर्वी साडीला तंतोतंत मॅच होणारे ब्लाऊज वापरले जायचे पण काळानुसार ब्लाऊजचा ट्रेंड बदलत चालला आहे. काही दिवसांपूर्वी मॅचिंग अथवा कॉन्ट्रास्ट ब्रॉकेड ब्लाऊजची फॅशन होती. त्यामुळे तुमच्या वॉर्डरोबमध्ये एखादं गोल्डन, ब्लॅक आणि मल्टीकलर ब्रॉकेड ब्लाऊज असेल तर ते कोणत्याही साडीसोबत मॅच केलं जायचं. कॉन्ट्रास्ट कलर आणि डिझानर ब्लाऊजची फॅशन सध्या इन आहे. हॅंडलूम आणि कॉटन साड्यांवरील खणाचे डिझानर ब्लाऊज तुम्हाला अगदी ट्रेंडी लुक देऊ शकतात. प्लेन सिल्क अथवा कलकत्ता, इंडीगो प्रिंट साड्यांवर हे ब्लाऊज अगदी खुलून दिसतात.

कॉटन, हॅंडलूम ब्लाऊज आणि कलाकारी

आजकाल अनेक ठिकाणी तयार ब्लाऊज मिळतात. पूर्वी बाजारात मॅचिंग सेंटर्स असायचे त्यांची जागा आता रेडीमेड ब्लाऊजच्या दुकानांनी घेतली आहे. प्रोफेशनल ब्लाऊज डिझायनर या डिझाईन्समध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. आजकाल हॅंडलूम ब्लाऊजमध्ये अनेक हटके प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. हे ब्लाऊज तुमच्या विविध साड्यांवर मॅच होऊ शकतात. केवळ साडीच नाही तर हे ब्लाऊज तुम्ही जीन्स, स्कर्ट, प्लाझो आणि इतर वेस्टर्न आऊटफीटसोबत कॅरी करू शकता. आजकालच्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये ब्लाऊज शिऊन घेण्यापेक्षा रेडीमेड ब्लाऊज विकत घेणं सोयीचं होऊ शकतं. कधीकधी कदाचित तुम्हाला हादेखील प्रश्न पडत असेल की, रेडीमेड ब्लाऊजच्या मापाचं काय? तर या दुकानांमध्ये अगदी तुमच्या मापाचे ब्लाऊजही उपलब्ध असतात. वास्तविक आता साडीवर मॅचिंग ब्लाऊज शिवण्यापेक्षा या ब्लाऊजमध्ये तुम्हाला अधिक व्हरायटी तर सापडेतच पण त्यापेक्षाही अधिक याचं फिटींग तुम्हाला अतिशय चांगलं येतं आणि साडीबरोबर हे ब्लाऊज अतिशय खुलून दिसतात. शिवाय एक ब्लाऊज तुम्हाला अनेक साड्यांबरोबर मॅच अथवा मिसमॅच करता येतो.

आनंदा क्रिएशनच्या ब्लाऊज डिझानर प्रियांकाच्या मते, “साडी आणि ब्लाऊजची फॅशन तशी जुनी असूनही  सतत ट्रेंडमध्ये असणारी आहे. तरुण मुलींंमध्येही आजकाल टेंडी ब्लाऊजमुळे साडी नेसण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. मात्र कस्टमाईज ब्लाऊजपेक्षा रेडीमेड ब्लाऊजला जास्त मागणी आहे. वाढत्या मागणीमुळे ब्लाऊजमध्ये महिलांच्या आवडीनुसार नवनवीन बदल करता येतात. निरनिराळ्या गळ्याचे डिझाईन्स, काठ, वर्क आणि लेस वापरुन तुम्ही हे ब्लाऊज डिझाईन करु शकता. शिवाय रेडीमेड ब्लाऊज फिटींगलाही व्यवस्थित बसतात. साडीशिवाय इतर वेस्टर्न आऊटफीटसोबत तुम्ही हे ब्लाऊज कॅरी करू शकतात.

स्टाइलिश ब्लाउज बॅक डिझाइनबद्दल देखील वाचा

आम्ही तुम्हाला प्रियांकाने डिझाईन केलेल्या काही हटके आणि ट्रेडिंग ब्लाऊज डिझाईन्स देत आहोत. या सर्व डिझाईन्स कॉटन आणि हॅंडलूम फॅब्रिकमध्ये करण्यात आल्या आहेत. कॉटन कापडामुळे ब्लाऊज घातल्यावर तुम्हाला गरमदेखील होत नाही. शिवाय सतत असे ब्लाऊज बाहेर ड्रायक्लीनला द्यायची गरजही भासत नाही. अशा स्वरुपाचे ब्लाऊजदेखील तुम्हाला सहज दुकानांमध्ये मिळतात. याची किंमतही जास्त नसते. साधारणतः 300 पासून या ब्लाऊजची किंमत सुरु होते पण याची रेंज वाढत जाते.  तुमच्या आवडीनुसार आणि तुम्हाला परवडतील असे ब्लाऊज तुम्ही बाजारातील दुकानातून घेऊ शकता. पण काही विशिष्ट डिझाईनरकडून तुम्हाला असे ब्लाऊज घ्यायचे असल्यास, याच्या कापडानुसार त्याची किंमत बदलत जाते. थोडे महागही वाटण्याची शक्यता असते. पण हे ब्लाऊज बऱ्याच कालावधीपर्यंत टिकून राहतात. शिवाय या ब्लाऊज्सची डिझाईनदेखील युनिक असते त्यामुळे त्याची किंमत जास्त असते.

इरकल खणाच्या कापडावर केलेलं हटके पेटिंग डिझाईन

या तिन्ही ब्लाऊजमध्ये खणाच्या कापडाचा वापर केलेला आहे. इरकल बॉर्डर वर्क आणि त्यामधे केलेल्या हटके पेटिंग्जमुळे या ब्लाऊजला अगदी एथनिक लुक आला आहे. शिवाय हे ब्लाऊज तुम्ही कोणत्याही हॅंडलूम अथवा कॉटन साडीसोबत कॅरी करू शकता. अशा प्रकारचे ब्लाऊज घातल्यामुळे तुम्हाला एक वेगळा लुक मिळू शकतो शिवाय त्यामुळे तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचं ‘सेंटर ऑफ अटरॅक्शन’ होऊ शकता. केशरी ,काळा आणि डार्क निळा अशा रंगाचा वापर यात करण्यात आला आहे.

ग्रीन अॅंड ऑरेंज इकत डिझाईन

या ब्लाऊजमध्ये हिरव्या रंगाच्या खणाच्या कापडासोबत केशरी रंगाचं इकत डिझाईन वापरण्यात आलं आहे. तुमच्या कोणत्याही पारंपरिक कॉटनसाडीसोबत हे ब्लाऊज खुलून दिसेल. शिवाय तुम्हाला जर लहान हात आवडत नसतील तर अशा स्वरूपाचे ब्लाऊज तुम्हाला नक्कीच आवडतील. कारण मुळात हे ब्लाऊज तुम्हाला टोचत नाहीत आणि शिवाय घालायलाही कम्फर्टेबल असतात.

स्टाइलिश ब्लाउज पाहा

कलमकारी कापडातील ट्रेंडी ब्लाऊज

कलमकारी डिझाईन्सची सध्या फॅशन आहे. अनेकजणींना कलमकारी ब्लाऊज फार आवडतात. या दोन्ही डिझाईन्समध्ये हटक्या प्रिंटचं कलमकारी कापड वापरण्यात आलं आहे. शिवाय या ब्लाऊजसाठी पाठच्या बाजूने केलेली डिझाईन आणि बेल स्लीव्ज तुम्हाला एक फंकी लुक नक्की देऊ शकतात. शिवाय हे ब्लाऊज टिपिकल ब्लाऊजसारखे वाटत नाहीत.

लॉंग अथवा टॉप ब्लाऊज

लॉंग ब्लाऊज अथवा टॉप ब्लाऊजची फॅशन तशी जुनीच आहे. मात्र तुम्ही हे टॉप ब्लाऊज साडीशिवाय जीन्स, प्लाझोवरदेखील घालू शकता. कलमकारी आणि इंडीगो प्रिंटमध्ये डिझाईन केलेल्या या टॉप ब्लाऊजवर एखादा दुपट्टा घेऊन तुम्ही जरा हटके स्टाईल नक्कीच करू शकता.

झुमका डिझाईन ब्लाऊज

सध्या झुमका डिझाईन खूपच लोकप्रिय आहे. या ब्लाऊजवर तुमची कोणतीही पारंपरिक साडी छान दिसेल. या प्रिंटमध्ये आम्ही तुम्हाला निरनिराळ्या प्रिंटचे ब्लाऊज डिझाईन्स देत आहोत. खरं तर कोणत्याही पारंपरिक कार्यक्रमात आपल्याला पारंपरिक कपडे आणि दागिनेदेखील घालयला आवडतात. त्यामुळे अशा स्वरुपाचे ब्लाऊजही आता महिलांना आवडू लागले आहेत. कोणत्याही कॉटनच्या साडीवर असे झुमका डिझाईन्सचे ब्लाऊज आणि त्यावर कानात ऑक्सिडाईज्ड झुमके घातल्यानंतर कोणत्याही कार्यक्रमात तुमच्यावरून लोकांचं लक्ष हटणार नाही.  

नथ प्रिंट ब्लाऊज

मराठी मुलींना नेहमीच नथ या दागिन्याचं अप्रूप आणि आकर्षण वाटत आलं आहे. अगदी वेगवेगळ्या गोष्टीत नथींचा वापर केला जातो. हेच अप्रूप लक्षात घेऊन नथ प्रिंट ब्लाऊज तयार करण्यात आले आहेत. काळ्या आणि गुलाबी कॉम्बिनेशनमध्ये  डिझाईन केलेलं हे नथ प्रिंट ब्लाऊज तुमच्यावर नक्कीच खुलून दिसेल. या प्रकारचे ब्लाऊज तुम्ही तुमच्या पैठणीवरदेखील कॅरी करू शकता किंवा एखादी सिल्क पारंपरिक साडी या ब्लाऊजवर नक्कीच उठून दिसेल.

ब्लॅक अॅन्ड रेड इकत डिझाईन ब्लाऊज

इकत अथवा पटोला डिझाईन अनेकींचा जीव की प्राण असते. या हटके स्टाईलमध्ये डिझाईन केलेल्या या ब्लाऊजमुळे तुम्हाला एक ट्रेंडी लुक नक्कीच मिळू शकेल.

डिजीटल प्रिंट ब्लाऊज

आजकाल डिजीटल प्रिंटची फॅशन लोकप्रिय होत आहे. साड्या, ओढण्यांमध्ये डिजीटल प्रिंट पाहायला मिळतात. पण या डिजीटल प्रिंट ब्लाऊजवर कोणतीही प्लेन साडी नक्कीच सुंदर दिसेल.

मल्टीकलर चेक्स डिझाईन्स

मल्टीकलर ब्लाऊज कोणत्याही साडीवर मॅच होऊ शकतं. ब्लाऊजमुळे तुमच्या साडीला एक हटके लुक येऊ शकतो. बऱ्याच जणींना चेक्सचे डिझाईन्स आवडत असल्यामुळे तुम्हाला बऱ्याच कार्यक्रमांमध्येही आजकाल ही फॅशन दिसते. तुम्हीही ही फॅशन करून बघायला नक्कीच हरकत नाही.

ऑल टाईम फेव्हरेट ब्लॅक डिझाईन

काळ्या रंगाचे ब्लाऊज कोणत्याही साडीवर मॅच करता येतात. यासाठी आम्ही तुम्हाला निरनिराळ्या प्रिंटमधील काळ्या रंगाचे ब्लाऊज देत आहोत.

कलमकारी, इंडीगो आणि इकत कॉंबिनेशन

कलमकारी आणि इकत, कलमकारी आणि इंडीगो असं कॉम्बिनेशन्स वापरुन डिझाईन केलेले हे ब्लाऊज तुम्हाला एक फॅशनेबल लुक देऊ शकतात.

आम्ही दिलेल्या या डिझाईन्स तुम्हाला नक्कीच आवडतील.यानुसार तुम्ही तुमचे ब्लाऊज डिझाईन करु शकता. या ब्लाऊजसह साडी नेसून त्यावर एखादं एथनिक गळ्यातलं आणि कानातलं घाला आणि हटके लुक करा. त्याच त्याच साड्या आणि ब्लाऊज सोडून थोडंसं वेगळं आणि तितकंच एलिगंट दिसण्यासाठी तुम्हाला हे ब्लाऊज नक्कीच मदत करतील. यावर एलिगंट लुकसाठी हातात एखादं एथनिक कडं घाला आणि कोणत्याही कार्यक्रमात अगदी आकर्षक तयार होऊन जा.  

अधिक वाचा

मकर संक्रांत स्पेशल: संक्रांतीला नेसण्यासाठी काळ्या रंगाच्या साड्यांचे ‘18’ प्रकार

हे ‘30’ ग्लॅमरस आणि हटके पंजाबी सूट तुम्हाला नक्कीच आवडतील

खास तुमच्यासाठी टीव्ही सेलिब्रिटी अनिता हसनंदानीचे ’61’ सुंदर आणि स्टाईलिश ब्लाऊज डिझाईन्स(Stylish Blouse Designs)

Read More From फॅशन