लाईफस्टाईल

New Year Plans: ऊर्मिला निंबाळकरचं ट्रॅव्हलिंग सिक्रेट

Trupti Paradkar  |  Dec 20, 2018
New Year Plans: ऊर्मिला निंबाळकरचं ट्रॅव्हलिंग सिक्रेट

‘ऊर्मिला निंबाळकर’ मराठी चित्रपटसृष्टीतील एक फ्रेश चेहरा. ‘दिया और बाती’ या हिंदी मालिकेतून ऊर्मिलाने करिअरला सुरुवात केली. दुहेरी, बनमस्का अशा अनेक मराठी मालिकांमधून तिच्या अभिनयाचं कसब जगासमोर आलं. संगीतसम्राटच्या पहिल्या पर्वातील ‘हटके’ निवेदनकौशल्याने तिने अनेकांची मनं जिंकली. खरंतर ऊर्मिलाला चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख मिळाली ती अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘एक तारा’ या मराठी चित्रपटातून. या चित्रपटात संतोष जुवेकरसोबत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. ऊर्मिला ‘फॅशन आणि इमेज कन्सल्टंट’ देखील आहे. विशेष म्हणजे ती युट्यूबच्या माध्यमातून सतत तिच्या चाहत्यांना फॅशन, ब्युटी, मेकअप आणि ट्रॅव्हलिंग टीप्स देत असते.

ऊर्मिलाला पर्यटनाची प्रचंड आवड आहे

ऊर्मिला दर दोन-तीन महिन्यातून एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जाते. तिला नवनवीन ठिकाणांना भेट देण्याची आवड आहे. आतापर्यंत देश-विदेशातील अनेक ठिकाणं ती फिरली आहे. ऊर्मिला तिच्या या आवडीमागचं सारं श्रेय तिचा लाईफ पार्टनर ‘सुकीर्त’ला देते. त्याच्या सहवासातूनच तिला भटकंतीची आवड निर्माण झाली.

Also Read How to Celebrate New Year in Marathi

ऊर्मिलाचं आवडतं पर्यटन स्थळ

भारताबाहेर ऊर्मिलाला इटलीमधील ‘फ्लॉरेन्स’ आणि बेल्जियममधील ‘ब्रूज’ ही दोन ठिकाणं फार आवडतात. भारतामध्ये तिला ‘गोवा’ सर्वाधिक आवडतं. याचं महत्वाचं कारण ती प्रचंड समूद्रप्रेमी आहे. ‘हिमाचल’मधील उंच डोंगररांगा देखील तिला तितक्याच भुरळ घालतात.

ऊर्मिला तिच्या ट्रॅव्हलचं बजेट कसं मॅनेज करते

ऊर्मिलाचा जन्म बारामतीचा असून ती अनेक वर्षापासून पुण्यात वास्तव्यास आहे. मध्यमवर्गीय कुंटुंबात वाढून देखील ती पर्यटनासाठी सतत एवढा खर्च कसा करू शकते हा प्रश्न तिला अनेकजण विचारत असतात. ऊर्मिला नेहमी फिरण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करते. प्रशस्त घर अथवा महागडी कार घेण्यापेक्षा एखादा नवीन देश फिरुन तिथला अनुभव घेणं तिला जास्त आवडतं. फिरण्याआधी दोन ते तीन महिने आधी ती विमानाचं तिकीट बूक करुन ठेवते. ज्यामुळे सहाजिकच विमानखर्च कमी होतो. बाहेरगावी गेल्यावर शॉपिंगवरदेखील ती अनावश्यक खर्च करत नाही. व्यवस्थित नियोजन केल्यास कमी खर्चातदेखील देश-विदेशात फिरता येतं असं ऊर्मिलाचं मत आहे.

Also Read New Year Quotes In Marathi

नववर्षाच्या स्वागतासाठी काय आहे ऊर्मिलाचा प्लॅन

2018 ला अलविदा करत आपण लवकरच 2019 मध्ये प्रवेश करणार आहोत. या नववर्षाच्या स्वागतासाठी ऊर्मिलाचा काय प्लॅन आहे हे आम्ही तिच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ऊर्मिलाला असं वाटतं की प्रत्येकवर्षी आपल्या आयुष्यात अनेक बऱ्या-वाईट गोष्टी घडून गेलेल्या असतात. वर्षाच्या शेवटी या सर्व कडू-गोड आठवणींना ‘बाय-बाय’ करत आपण मोठ्या उत्साहाने नववर्षाचं स्वागत करत असतो. नवीन वर्षांचे अनेक संकल्प मनात ठरवत असतो. अशा ‘भावूक क्षणी’ आपण प्रियजनांसोबत वेळ घालवणं फार गरजेचं असतं. वर्षभर कामाच्या निमित्ताने ऊर्मिला आणि सुकीर्त खूप बिझी असतात. त्यामुळे हे इमोशनल क्षण कुंटुंबासोबत एन्जॉय करणं त्यांना फार आवडतं. यावर्षी उर्मिला तिच्या कुंटुंबासोबत तिच्या भावाच्या घरी आसामला जाणार आहे. त्यामुळे नववर्षाचं स्वागत करत आसाम, कोलकत्ता अशा ठिकाणी सहकुंटुब भटकंती करण्याचा ऊर्मिलाचा बेत आहे. आसाममधील अगदी ‘जंगलभ्रमंती’ पासून कोलकत्ताच्या ‘स्ट्रीट फूड’पर्यंत अनेक गोष्टींचे बेत तिने आखले आहेत. लवकरच याचे अपडेट ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडिया आणि युट्यूबच्या माध्यमातून देणार आहे.

फोटोसौजन्य-इन्स्टाग्राम

Read More From लाईफस्टाईल