Dating

Valentines Day: नातं प्रेमाचं (Valentines Day Love Relations In Marathi)

Dipali Naphade  |  Feb 5, 2019
Valentines Day: नातं प्रेमाचं (Valentines Day Love Relations In Marathi)

आज 14 फेब्रुवारी, प्रेम करणाऱ्यांसाठी अगदी खास आणि महत्त्वाचा दिवस तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे (Valentines Day). असे कितीतरी मुलं आणि मुली असतील ज्याचं मन आजच्या दिवशी जोडलं जातं आणि अगदी तुटतंही. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की, प्रेमच ते मग त्यासाठी एक दिवस साजरं करायची काय गरज आहे? वर्षभर तुम्ही प्रेम साजरं करू शकता. पण बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार प्रेम जरी वर्षभर साजरा करता येत असलं तरी ती भावना बोलून दाखवण्याचा आणि व्यक्त करण्याचा हा नक्कीच खास दिवस आहे. नातं प्रेमाचं, प्रेम म्हणजे नक्की काय? खरं प्रेम केलं जातं का? ही नाती टिकतात का? नक्की प्रेमाचं नातं म्हणजे काय? हे सगळे प्रश्न आपल्याला असतातच. फार कमी वयामध्ये होतं ते प्रेम नसतं अट्रॅक्शन असतं असं म्हणतात. पण काही जोडप्यांच्या बाबतीत अगदी शाळेपासूनचं प्रेम टिकून लग्नामध्ये रूपांतर झालेलं आणि कायमस्वरुपी टिकलेलंही दिसतं. मग नक्की नातं प्रेमाचंं काय असतं असा प्रश्न तर नक्कीच पडतो. आज या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने नक्की नातं प्रेमाचं काय आहे याविषयी थोडंसं –

केवळ पाडगावकरांची कविता रेटली किंवा काही शायरी ऐकवून दाखवल्या तर ते प्रेम नक्कीच नाही. अर्थात प्रेमामध्ये कविता आणि शायरीलादेखील तितकंच महत्त्व आहे. खरं तर प्रेम म्हणजे सर्व काही. दिवसभर दमून आल्यावर अगदी आपल्या बाळाला मनापासून जवळ घेणं म्हणजे प्रेम. अगदी श्वास घ्यायलाही वेळ नसताना आपल्या आवडत्या माणसाची आठवण काढून जेवला/जेवली का विचारणं म्हणजे प्रेम किंवा कोणाला गरज असताना कोणताही माज न दाखवता गाजावाजा न करता मदत करणे म्हणजे प्रेम. कितीही कामात असो कोणतीही कारणं न देता दुसऱ्याला समजून घेऊन वेळ काढून वेळ देणे म्हणजे प्रेम. परिस्थिती कशीही असो कितीही बदलू दे पण ज्याला आपलं मानलं आहे त्याला कधीही दूर होऊ न देणं म्हणजे प्रेम. कधीही वैयक्तिक हेवेदावे न ठेवता मदतीला धाऊन जाणं म्हणजे प्रेम. तर केवळ कामापुरता आपला उपयोग होत आहे माहीत असूनही मनापासून मैत्री निभावणं हेही प्रेमच. कितीही त्रास देणारं नातं असो पण आपल्या चांगुलपणामुळे जपून ठेवणं हेही प्रेम. कामातून वेळ काढून मरीन ड्राईव्हला फेरफटका मारणं किंवा आवडत्या माणसासह डिनर डेटला जाणं आणि खळखळून हसणं हे पण मिळालेलं आणि दिलेलं प्रेमच आहे. खरंतर लहान लहान गोष्टीतून आनंद घेणं म्हणजे प्रेम. कोणालाही कारणं न देता आयुष्य जगत राहणं म्हणजेच स्वतःवर आणि दुसऱ्यांवर केलेलं प्रेम.

प्रेमाचं नातं कसं जपावं?

खरंतर प्रेमामध्ये व्यक्तीला आपलंसं करण्यासाठी आपण जितका प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे ते प्रेम आपल्या आयुष्यात कायमस्वरुपी टिकण्यासाठी जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी सतत खूप मोठे गिफ्ट्स, सोशल मीडीयावर कपल्स कोट्स शेअर करणे किंवा अति पैसे या सगळ्याची आवश्यकता नसते तर नक्कीच त्यासाठी आवश्यकता असते ती एकमेकांना समजून घेत एकमेकांना वेळ देण्याची. अर्थात जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा असतो हे जरी खरं असलं तरीही माणसाला पैशाइतकीच गरज प्रेमाच्या नात्याचीही असते. प्रेमाचं नातं सोबत असेल तर पैसा मेहनतीने नक्कीच मिळवता येतो पण जर प्रेमच नसेल तर मिळवलेल्या पैशाचा उपयोग तरी काय? त्यामुळे प्रेमाचं नातं जपायला हवं. त्यासाठी तुम्ही आपल्या जोडीदाराला योग्य मान, आदर, वेळ या सर्व गोष्टी द्यायला हव्यात. कारण त्याशिवाय तुमचं नातं पूर्णच होऊ शकत नाही.

Also Read Celebrate Valentines Day In Marathi

आयुष्यात ‘ती’ व्यक्ती महत्त्वाची (Importance Of That Person In Your Life)

आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते जिच्याशी आपली जास्त जवळीक असते आणि ती व्यक्ती आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची असते. इतर कोणाच्या असण्यानसण्याने आयुष्यात तितका फरक पडत नसतो. पण या व्यक्तीच्या नसण्याने आयुष्यात उलथापालथ होते आणि असण्याने फक्त आनंद मिळतो. आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रत्येक क्षणी ही तीच व्यक्ती असते जी आपल्याला मनापासून समजून घेत असते असा आपला समज तर असतोच पण तेच सत्यातदेखील असतं आणि याच व्यक्तीवर असतं ते आपलं प्रेम. आयुष्यभर हे प्रेम व्यक्त करता यायला हवं. पण जर कदाचित ते येत नसेल तर हे नातं प्रेमाचं निदान व्हॅलेंटाईनला तरी जपायला हवं. बरेच जण जेव्हा म्हणतात की, या प्रेमाच्या प्रदर्शनाची काय गरज आहे? पण खरं तर हे प्रदर्शन नसतं तर आपल्या जोडीदाराला पुन्हा एकदा आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करून आपला जोडीदार आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे सांगणं असतं. या अशा वागण्यातूनच तुमचं प्रेम फुलतं आणि आयुष्यभर तुम्ही एकत्र राहू शकता. अशावेळी माणूस फारच भावनिक होत असतो. भावना व्यक्त करण्यासाठी Emotional Status चा आधार नक्कीच तुम्हाला घेता येतो.

या प्रेमाच्या नात्यात आपुलकीचीही गरज

असे म्हणतात जगामध्ये कोणतीही गोष्ट शाश्वत नसते. तसेच नात्यांचेही आहे. सुरुवातीला प्रत्येक विशेषतः प्रेमाच्या नात्यामध्ये वाटणारी आपुलकी, काळजी, जिव्हाळा हा वर्षानुसार बोथट होत जातो आणि मग खर्‍या अर्थाने नात्याच्या उलथापालथीला सुरुवात होते. एकमेकांविषयी नात्यात पूर्ण गुंतण्याआधी सतत विचार आणि काळजी केली जाते. ती नंतर नात्याला गृहीत धरून दुर्लक्षित करण्यात येते. पण त्याचवेळी खरं तर गरज असते ती आपुलकीच्या नात्याची. ही आपुलकी अशा प्रेमाच्या दिवशी दाखवली तर नक्कीच त्या व्यक्तीसाठी आनंददायी असते. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अधिक सुंदर करण्यासाठीच कोणत्याही नात्याचा गाभा हा आपुलकीचा असायला हवा. वास्तविक आपुलकीच्या दोन शब्दांनीही एखाद्याशी नाते जोडता येते हे विसरून कसं चालेल? आपुलकीसह फुलावे नाते, जपावे नाते हेच आयुष्याचं सार होऊन जायला हवं. असं झाल्यास, जगात फारच कमी लोक दुःखी दिसतील. कारण सध्याच्या तांत्रिक युगात ही आपुलकी आणि प्रेम सध्या पाहायला मिळत नाही. हे नातं आपल्यापासूनच सुरु होतं आणि तसंच जपायला हवं. हीच तर प्रेमाची परिभाषा आहे.

वाचा : एकेरीसाठी व्हॅलेंटाईन डे

नाती जपली जाणं महत्त्वाचं

एखादा माणूस आपल्यावर मनापासून प्रेम करत असेल आणि तरीही समोरचा माणूस केवळ त्याचा उपयोग करून घेत आहे हे माहीत असूनही केवळ प्रेमासाठी त्याला अनेक संधी देत असेल तर, तुम्ही सतत त्या माणसाचा विश्वासघात करत आहात हे तुम्हाला माहीत असायला हवं. खरं तर अशावेळी असा एक दिवस येतो, जेव्हा समोरचा माणूस संधी देऊन थकतो आणि कायमस्वरुपी तुम्ही त्या माणसाला गमावून बसता. जीवनात नाती अनेक असतात पण जपणारी लोकं फारच कमी असतात.  काही नाती ही रक्ताची असतात तर काही हृदयानेच जोडली जातात. काही जन्मोजन्मीची तर काही क्षणापुरतीच. काही नाती झाडाच्या मुळासारखी घट्ट जमिनीत रोव्ल्यागत तर काही झाडाच्या फांदीसारखी अलगद तुटणारी. नाती ही अशी सहज रुजली जात नाहीत, तर त्याचा पाया भक्कम करण्यासाठी नियमित खतपाणी आवश्यक असते आणि हे खतपाणी म्हणजेच माणसाचा वेळ, त्याचा एकमेकांवर असलेला विश्वास जपून ठेवणं. विश्वास हा प्रत्येक नात्याचं मूळ आहे. नाते कोणतेही असो, त्यात विश्वास असला तरच ते टिकते. अगदी रक्‍ताच्या नात्यातही आपुलकी, आत्मीयता जपली जाणे महत्त्वाचे असते. खरं तर नाती जपली जाणं महत्त्वाचं आहे आणि आजच्या दिवशी हाच संदेश आणि हाच विश्वास एकमेकांना सांगत नातं प्रेमाचं जपण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात त्यामध्ये काही यशस्वी होतात तर काहींना अपयश मिळतं. पण तरीही प्रेम हे प्रत्येक नात्याचा पाया आहे.

वाचा – बीच हनीमूनसाठी कपडे

प्रेमाची नाती जपताना शेवटी एकच म्हणावं वाटतं –

कोणीतरी आपलं असणं म्हणजे काय…
हातातला मोबाईल बाजूला ठेवून सहज आपल्या हसण्यात मिसळून जाणं म्हणजे कोणीतरी आपलं असणं,
आपण उदास असताना अचानक जोक मारून हलकेच आपलं होऊन जाणं म्हणजे आपलं असणं,
न सांगताही चेहरा वाचून सहज जवळ घेणं म्हणजे आपलं असणं,
कितीही दूर असतानाही आपली गरज त्याच्या मनाला जाणवण म्हणजे आपलं असणं,
नुसतं डोळ्यात पाहूनही अंगावर आलेल्या शिरशिरने तू मला जाणवणं म्हणजे आपलं असणं,
लहानसहान प्रत्येक बाबीत तू माझ्यासाठी जगणं म्हणजेच आपलं असणं….

(कविता – दिपाली नाफडे)

फोटो सौजन्य – Instagram, Giphy

हेदेखील वाचा – 

१० गोष्टींतून मुली व्यक्त करतात प्रेम, जाणून घ्या या गोष्टी

प्रेमात त्याने / तिने ‘गृहीत’ धरणं कितपत योग्य

Love Tips: मुलीचा परफेक्ट ‘बॉयफ्रेंड’ बनायचं असेल, तर काय करायला हवं

Read More From Dating