Diet

‘या’ पावसाळी रानभाज्यांची चव तुम्ही चाखली आहे का

Trupti Paradkar  |  Jun 17, 2019
‘या’ पावसाळी रानभाज्यांची चव तुम्ही  चाखली आहे का

पावसाला सुरूवात झाली की अनेक रानभाज्या डोंगराळ भागात उगवू लागतात. विशेष म्हणजे या रानभाज्यांची लागवड न करताही त्या दर पावसाळ्यात नित्यनेमाने उगवतात. जंगलात, डोंगराळ भागात, रानवाटांवर उगवणारा हा रानमेवा स्वादिष्ट तर असतोच पण त्यासोबत आरोग्यासाठी उत्तमही असतो. या भाज्यांची लागवड केली जात नाही. त्यामुळे त्या नैसर्गिक पद्धतीने उगवतात. या भाज्यांवर कोणतीही खतं अथवा कीटकनाशकं फवारलेली नसतात. पावसाळा सुरू झाला की ठाणे आणि वसई-विरार कडील गावठाण भागात या भाज्या सहज उपलब्ध होतात. जर तुम्ही आतापर्यंत कधीच या भाज्यांची चव चाखली नसेल तर यंदाच्या पावसाळ्यात या भाज्या जरूर खा.

instagram

आरोग्यासाठी उत्तम रानभाज्या

टाकळा

टाकळा ही पावसाळ्यात मिळणारी एक रानभाजी आहे. टाकळ्याची भाजी उष्ण असल्याने तिच्या सेवनाने वात आणि कफदोष कमी होतो. यासोबतच ही भाजी इतकी पौष्टिक आहे की त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचारोग होत नाही.  तुरट चवीची टाकळ्याची भाजी पचायला देखील हलकी असते. ज्यामुळे तुमचे पोट चांगले स्वच्छ होते आणि पावसाळ्यात हमखास होणारा अॅसिडिटीचा त्रास दूर होतो.

टाकळ्याची भाजी करण्याची कृती –

साहित्य-  निवडलेली कोवळी पाने, हिरवी मिरची, चिरलेला कांदा, ओले खोबरे, मीठ

टाकळ्याची भाजी स्वच्छ धुवून चिरून घ्या. पाणी निथळून घेऊन भाजी कोरडी करा. कढईत कांदा आणि हिरवी मिरची परतून घ्या. त्यावर टाकळ्याची पाने चिरून टाका.भाजी चांगली शिजल्यावर वरून मीठ आणि ओले खोबरे पेरा.

टाकळ्याची भाजी आणखी विविध पद्धतीने करता येते.

करटोली

करटोलीच्या भाजी ही एक फळभाजी असून काटेरी आणि हिरव्या रंगाच्या कारल्याच्या भाजीप्रमाणे दिसते. करटोलीची भाजी कडवट आणि तुरट चवीची असते. करटोलीची भाजी पावसाळा संपत आल्यावर उपलब्ध होते. चवीला मात्र ही भाजी अतिशय उत्तम असून यामुळे पोट साफ होते, यकृतासाठी उपयुक्त, मधुमेह आणि मुळव्याधीवर गुणकारी असते.

करटोली भाजीची कृती

साहित्य- पाव किलो कोवळी करटोली, भिजवलेली हरभरा डाळ, चिरलेला कांदा, हिंग,हळद,तिखट, मीठ, गुळ आणि ओले खोबरे

करटोली स्वच्छ धुवून स्वच्छ करा आणि चिरून घ्या. कारल्याप्रमाणे या भाजीत देखील बिया असतात त्या काढून टाका. कढईत कांदा परतून घ्या. हिंग, हळद टाकून भिजवलेली हरभरा डाळ आणि  करटोली व्यवस्थित परतून घ्या. भाजी वाफेवर शिजू द्या. शिजल्यावर चवीनुसार मीठ, तिखट आणि ओलं खोबरे टाकून परतून घ्या.

मायाळू

मायाळूची पाने हिरव्या रंगाची, मांसल आणि नाजूक असतात. मायाळूचे वेल पावसाळ्यात झाडाच्या आधाराने वाढते.  या वेलाच्या कोवळ्या पानांची भाजी अथवा भजी करतात. मायाळूची भाजी थंड गुणधर्माची असून पचण्यास हलकी असते. मायाळूच्या भाजीमुळे सांधेदुखी कमी होते. या भाजीमुळे रक्त शुद्ध होत असल्यामुळे त्वचाविकार होत नाहीत. मायाळूची भाजी पित्तनाशक असते. पित्त झाल्यास मायाळूच्या पानांचा रस अंगाला लावतात. ज्यामुळे अंगाची खाज आणि दाह कमी होतो.

मायाळूची भाजी करण्याची कृती

साहित्य – मायाळूची कोवळी पाने, भिजवलेली हरभरा डाळ, हळद, हिरवी मिरची, मीठ, गुळ.

मायाळूची पाने स्वच्छ धुवून चिरून घ्या. कढईत मायाळूची चिरलेली पाने टाका. त्यावर भिजवलेली हरभरा डाळ टाका. वरून हिरवी मिरची टाकून वाफेवर भाजी  शिजवून घ्या. भाजी शिजल्यावर त्यात मीठ आणि गुळ टाका.

कुरडू

पावसाळा सुरू झाला की गावठाण भागात कुरडूची भाजी हमखास मिळते. कुरडूची भाजी चवीला छान लागते. या भाजीच्या सेवनामुळे युरीनच्या समस्या कमी होतात. कफप्रवृत्तीच्या लोकांनी पावसाळ्यात कुरडूची भाजी जरूर खावी. कारण या भाजीमध्ये जुनाट खोकला  अथवा कफ कमी करण्याचे सामर्थ्य असते.

कुरडूची भाजी करण्याची कृती

साहित्य – कुरूडूच्या भाजीची पाने, चिरलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची, हिंग, हळद, ओलं खोबरं, मीठ

कुरडूची पानं स्वच्छ धुवून चिरून घ्या. कढईत कांदा आणि मिरचीची फोडणी तयार करा. त्या फोडणीत कुरडूच्या भाजीची पानं टाकून ती चांगली परतून घ्या. भाजी वाफेवर शिजू द्या. शिजल्यावर त्यात मीठ आणि ओलं खोबरं टाका आणि पुन्हा परतून घ्या.

अळू

पावसाळ्यात अळू जवळजवळ प्रत्येकाच्याच घरी केला जातो. काहीजण अळूची कोरडी भाजी करतात तर काही लोकांना पातळ भाजी आवडते. कोकणात या भाजीला अळूंच फदफदं असं म्हणतात. अळूच्या पानांची भजी अथवा वडीदेखील सुरेख लागते. मात्र भाजी आणि वडीसाठी अळूची पाने वेगळी असतात. वडीसाठी लागणारं अळूचं पान बाराही महिने उपलब्ध असतं शिवाय ते थोडं जाडसर असतं. भाजीसाठी मात्र कोवळ्या आणि पातळ अळूची पानं लागतात. अळूच्या पानांना विशिष्ठ प्रकारची खाज येत असल्याने ती तोडताना आणि चिरताना विशेश काळजी घ्यावी लागते. अळूची भाजी मात्र अगदी चविष्ठ लागते. पावसाळ्यात येणाऱ्या अनेक सणांमध्ये नैवेद्याच्या पानात अळूच्या भाजीला महत्त्वाचे स्थान असते.सणसमारंभात अळूवडी देखील केली जाते.  यासोबतच अळूची पाने वात, पित्त, कफ नाशक असतात. अळूच्या भाजीमध्ये भरपूर लोह असल्यामुळे अळू खाण्याने अशक्तपणा कमी होतो.

अळूचं फदफदं

साहित्य- अळूची पाने, भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेली चणाडाळ, हिरवी मिरची, हिंग, मीठ, हळद, चिंच  आणि गुळ

अळूची पाने स्वच्छ धुवून चिरून घ्यावीत. पानांसोबत कोवळे देठंही या भाजीसोबत चिरून घ्यावेत. अळूची भाजी शिजवून घ्यावी. त्यात शिजवलेली चणाडाळ आणि शेंगदाणे टाकावेत मिश्रण चांगले ढवळून घ्यावे आणि वरून भाजीला हिंग, हिरवी मिरचीची फोडणी द्यावी. शिजलेल्यानंतर भाजीत मीठ, गुळ आणि चिंच टाकावे.

अधिक वाचा

जाणून घ्या पोट कमी करण्यासाठी अकुंरित धान्य (Sprouts) कसे आहेत फायदेशीर

कोथिंबीरमध्ये असतात औषधीय गुण (Coriander Benefits In Marathi)

कढीपत्त्याचे फायदे वाचाल तर आजपासूनच कढीपत्त्याचा वापर कराल सुरू

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

 

Read More From Diet