दिवाळी म्हटली की, चमचमीत फराळ आलाच. चिवडा, लाडू, शेव, करंजी, चकली यासोबत एक पारंपरिक असा पदार्थ बनवला जातो तो म्हणजे ‘अनारसा’ हा प्रकार चवीला इतका चविष्ट लागतो पण त्यामागे असलेली मेहनत ही देखील तितकीच आहे. तांदूळ भिजत ठेवून त्यापासून अनारश्याचे पीठ बनवले जाते. अनारसे बनवायची पद्धत ही थोड्या फार प्रमाणात सारखीच असली तरी देखील हल्ली अनारश्याच्या रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. दिवाळीतच नाही तर तुम्ही इतर वेळीही असे खुसखुशीत अनारसे बनवून त्याचा आनंद घेऊ शकता. अस्सल तुपात बनवलेले हे अनारसे तुम्हालाही आवडत असतील तर तुम्ही झटपट अनारसे रेसिपी जाणून घ्यायला हवी. इतकेच नाही तर तुम्ही तांदळाचे अनारसे, गुळाचे अनारसे रेसिपी ही (Anarsa Recipe In Marathi) बनवायला हवेत. चला तर जाणून घेऊया अनारसे बनवण्याची रेसिपी
Table of Contents
- अनारसे रेसिपी मराठी (Traditional Anarsa Recipe In Marathi)
- झटपट अनारसे रेसिपी (Instant Anarsa Recipe In Marathi)
- गुळाचे अनारसे (Jaggery Anarsa Recipe In Marathi)
- साखरेचे अनारसे (Sugar Anarsa Recipe In Marathi)
- तांदळाचे अनारसे (Rice Anarsa Recipe In Marathi)
- दह्याचे अनारसे (Anarsa Recipe In Marathi With Curd)
- केळीचे अनारसे (Banana Anarsa Recipe In Marathi)
- खव्याचे अनारसे (Khavyache Anarsa Recipe In Marathi)
- बेक्ड अनारसे (Baked Anarsa Recipe In Marathi)
अनारसे रेसिपी मराठी (Traditional Anarsa Recipe In Marathi)
पारंपरिक पद्धतीने तुम्ही अनारसे बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अनारश्यांची ही रेसिपी नक्की ट्राय करायला हवी. चला तर जाणून घेऊया अनारसे रेसिपी मराठी.
साहित्य:
1 वाटी तांदूळ, 1 कप किसलेला गूळ, 1 मोठा चमचा तूप, आवश्यकतेनुसार दूध, किंवा दही, अनारश्यांसाठी खसखस, तळणीसाठी तेल किंवा तूप
कृती:
- अनारश्यांसाठी साहित्य हे कमी लागत असले तरी त्यासाठी मेहनत ही फारच आहे. त्यासाठी तुम्हाला तांदूळ स्वच्छ धुवून तो साधारण तीन दिवस भिजत ठेवावा लागतो. असे करताना प्रत्येक दिवशी तुम्हाला तांदुळातले पाणी बदलत राहावे लागते.
- चौथ्या दिवशी भिजवलेल्या या तांदूळातून पाणी काढून टाका आणि ते कॉटनच्या कपड्यावर सुकवत ठेवा. तांदूळ छान कोरडे व्हायला हवे.
- तांदूळ कोरडे झाल्यावर ते कोरडेच मिक्सरमध्ये वाटून घ्या. एका चाळणीतून चाळत ताटात घ्या.
- आता या तयार कोरड्या पीठात गुळ आणि आवश्यकतेनुसार दूध घालून पीठ छान मऊसूत गोळा होईपर्यंत मळून घ्या. अनारश्यांचे पीठ छान मळून झाल्यानंतर ते आंबण्यासाठी आणखी काही दिवस ठेवावे लागते. त्यासाठी तुम्हाला एक प्लास्टिकचा डबा घेऊन त्यामध्ये हे पीठ साधारण 5 ते 6 दिवसांसाठी ठेवायचे आहे. त्यामुळे पीठ छान आंबते.
- सहाव्या दिवशी पीठ काढून त्याचे बारीक बारीक गोळे करुन अनारसे थापून त्यावर खसखस लावा आणि छान तेलात किंवा तूपात सोनेरी रंग येईस्तोवर तळा.
- पारंपरिक पद्धतीचे अनारसे तयार
(टीप: ही पद्धत वेळ काढू असली तरी याचे अनारसे हे फारच सुंदर लागतात)
झटपट अनारसे रेसिपी (Instant Anarsa Recipe In Marathi)
सगळ्यांनाच अनारसे अगदी साग्रसंगीत पद्धतीने बनवता येतीलच असे नाही. अशावेळी तुम्ही झटपट अनारसे बनवण्याची रेसिपी जाणून घ्यायला काहीच हरकत नाही. मैद्याच्या रेसिपी ही तुम्ही नक्की ट्राय करायला हव्यात.
साहित्य:
1 वाटी चांगल्या दर्जाचा गूळ, 1 वाटी तांदूळाचे पीठ, केळं, वेलची पूड, तळणीसाठी तेल, खसखस
कृती:
- रेडीमेड तांदूळाचे पीठ (चांगल्या दर्जाचे घ्या) घेऊन ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या. त्यामध्ये थोडा थोडा गूळ घालून वाटा. एक वाटी गूळ घातल्यानंतरही पिठाचा गोळा होत नसेल तर त्यामध्ये केळ्याचे स्लाईस घालून वाटा.
- हे करताना केळ भारंभार घालू नका. पिठाचा गोळा हाताने मळला जात असेल त्यावेळी तो बाहेर काढून मळायला घ्या. पीठ मळताना त्यामध्ये वेलची पूड घाला.
- पिठाचा एकदम मऊसूत असा गोळा व्हायला हवा. यामध्ये पाणी अजिबात घालायचे नाही. त्यामुळे ते हाताच्या उष्णतेवरच मळत राहायचे आहे.
- अनारसे करायला घेताना छोटे छोटे गोळे करुन त्यावरील तडा जाईपर्यंत मळून घ्या. खसखसवर अनारसे नाचवून ते तेलात किंवा तुपात तळून घ्या.
- इन्स्टंट अनारसा तयार.
गुळाचे अनारसे (Jaggery Anarsa Recipe In Marathi)
हल्लीच्या हेल्थ कॉन्शिअस जगात साखरेऐवजी गुळाचा वापर करुनही अनारसे बनवले जातात. जाणून घेऊया गुळाचे अनारसे बनवण्याची सोपी रेसिपी
साहित्य:
2 वाटी तांदुळाचे पीठ, 1 वाटी गूळ, खसखस, तळणीसाठी तेल
कृती:
- तांदूळ तीन दिवस भिजत घाला. चौथ्या दिवशी एका फडक्यावर काढून ते छान कोरडे करुन घ्या. त्यानंतर तांदूळ वाटून घ्या.
- एका मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये तांदूळाचे पीठ आणि त्याच्या निम्मा चिरलेला गूळ घेऊन मिक्सरमध्ये वाटून घ्या.
हे पीठ एका बंद डब्यामध्ये साधारण 4 ते 5 तासांसाठी काढून ठेवा. त्यानंतर आवश्यक तेवढे पीठ काढून तुम्ही त्यामध्ये गरजेनुसार दूध घालून ते छान मळून घ्या. - मऊसूत गोळा झाला की, मग त्याचे अनारसे थापून ते तळून घ्या
(टीप: तयार केलेले हे पीठ फ्रीजमध्ये स्टोअर करुनही ठेवता येऊ शकते.)
खुशखुशीत शंकरपाळी रेसिपी मराठीतून (Shankarpali Recipe In Marathi)
साखरेचे अनारसे (Sugar Anarsa Recipe In Marathi)
साखरेचा उपयोग करुनही अनेक जण अनारसे बनववतात. या साखरेचे अनारसे कसे बनवायचे त्याची रेसिपी देखील जाणून घेऊया.
साहित्य:
2 कप बासमती तांदूळ (जूना आणि जाडा), 1 ½ कप पिठीसाखर,खसखस, तूप, तळणीसाठी तेल
कृती:
- बासमती तांदूळ स्वच्छ धुवून त्यात पाणी घालून ठेवावे. दररोज यातील पाणी बदलावे. साधारण तीन दिवस हे तांदूळ ठेवायचे आहे.
- चौथ्या दिवशी तांदुळातील पाणी काढून टाकून त्यातील पाणी निथळून ते सुकवून घ्यावे. उन्हात ठेवू नका.
- आता मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये थोडे थोडे तांदूळ वाटून घ्या. हे पीठ चाळून घ्या. मिक्सरमध्येच पिठीसाखर आणि तांदूळ घालून फिरवून घ्या. आता एका पसरट भांडयात काढून आधी हाताच्या उष्णतेने पिठाचा एक गोळा करुन घ्या.
- आता जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर त्यामध्ये दूध घाला. पीठ पातळ होऊ देऊ नका. आता एक पोळपाट घेऊन त्यावर खसखसीच्या वर अनारसे थापायला घ्या.
- मध्यम आचेवर अनारसे तळून घ्या. हे अनारसे खुसखुशीत होतात.
तांदळाचे अनारसे (Rice Anarsa Recipe In Marathi)
अनारसे हे तांदूळाचे बनवले जातात. पण काही जण यासाठी वेगवेगळ्या क्वालिटीच्या तांदूळाचा उपयोग करतात. पण काही जण यासाठी रेशनचा तांदूळ वापरणे अधिक चांगला समजतात. जाणून घेऊया तांदूळाच्या अनारश्यांची ही रेसिपी
साहित्य:
1 वाटी रेशनचा जाडा तांदूळ, अर्धा वाटी गूळ, वेलची पूड, दूध, तळणीसाठी तेल, खसखस
कृती:
- एका भांड्यात जाड तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून घ्या. तांदूळ धुतल्यानंतर ते साधारण तीन दिवसांसाठी तसेच भिजत ठेवा. रोज त्यामधील पाणी बदलत राहा.
- चौथ्या दिवशी तांदळातील पाणी काढून ते निथळून घ्या. तांदूळ वाळले की, त्याची पूड करुन घ्या.
- एका भांड्यात पीठ काढून त्यामध्ये जमेल तितके तांदूळाचे पीठ घालून घ्या. गूळ चांगले मुरडून घ्या. त्यामध्ये वेलची पूड, दूध घालून पीठाचा छान गोळा करुन घ्या.
- आता एका कढईत तेल गरम करुन घ्या. पोळपाटावर थोडा थोडा गोळा घेऊन खसखस घेऊन त्यावर अनारसे थापा. मध्यम आचेवर अनारसा तळून घ्या.
दह्याचे अनारसे (Anarsa Recipe In Marathi With Curd)
दह्याचा उपयोग करुनही खूप जण अनारसे बनवतात. हे अनारसेही इन्स्टंट आंबण्याची प्रक्रिया करतात.
साहित्य:
1 वाटी तांदुळाचे पीठ, ½ वाटी गूळ, ¼ वाटी दही, खसखस, तळणीसाठी तेल, थोडेसे तूप
कृती:
- इन्स्टंटप्रकाराचे हे अनारसे असून यामध्ये तुम्हाला दह्याचा उपयोग आंबण्यासाठी मदत करणारा आहे. एका भांड्यात तांदूळाचे पीठ घेऊन त्यामध्ये गूळ हळुहळू घालायाचा आहे. दही हे यामध्ये महत्वाचे असल्यामुळे पीठ पातळ होऊ देऊ नका.
- दही घातल्यानंतर जर पीठ पातळ झाले तर तुम्ही थोडीशी काळजी घ्या. कारण त्यामध्ये तुम्हाला थोडे तांदूळ पीठ घालावे लागेल.
- आता तुम्हाला पीठ हे काही काळासाठी तसेच ठेऊन द्यायचे आहे. म्हणजे दही हे आंबण्यासाठी साधारण 3 ते 4 तासांसाठी ठेऊन द्यायचे आहे.
- त्यानंतर हे पीठ काढून याचे अनारसे बनवायला घ्यायचे आहेत. हे अनारसे जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे ते पटकन संपवून टाका.
केळीचे अनारसे (Banana Anarsa Recipe In Marathi)
इन्स्टंट अनारसे करतानाही अनेकदा त्यामध्ये केळीचा वापर केला जातो. केळ्याचा उपयो हा पीठाला थोडासा ओलसरपणा आणण्यासाठी केला जातो. जाणून घेऊया केळ्याचा उपयोग करुन अनारसे नेमके कसे बनवायचे ते. याशिवाय रव्याचे पदार्थ ही देखील तुम्ही ट्राय करायला हवे.
साहित्य:
अनारश्याचे तयार पीठ, केळीचे काप, खसखस, तूप किंवा तेल
कृती:
- अनारश्याचे तयार पीठ बरेचदा कडक होते. अशावेळी पीठ थोडे सैल करण्यासाठी त्यामध्ये तुम्ही पिकलेल्या केळ्याचे काप घालावे. आता हे पीठ छान मळून त्याचे अनारसे थापून घ्यावेत.
- छान तुपात अनारसे तळल्यावर ते अधिक खुसखुशीत आणि छान लागतात.
खव्याचे अनारसे (Khavyache Anarsa Recipe In Marathi)
खव्याचा गोडपणा आणि मऊसूतपणा तुम्हाला अनारश्यामध्ये आणायचा असेल तर खव्याचा उपयोग करुनही तुम्ही अनारसे बनवू शकता.
साहित्य:
तांदूळाचे पीठ, 2 मोठे चमचे खवा, ¼ वाटी गूळ, खसखस, तूप, तळणीसाठी तेल
कृती:
- तांदूळाचे पीठ घेऊन त्यामध्ये दोन मोठे चमचे खवा घाला. आता त्यामध्ये गूळ घालून सगळे साहित्य एकजीव करुन त्याचा एक गोळा करा. पीठ हाताला लागत असेल तर त्यामध्ये थोडेसे तूप घाला.
- आता त्याचे अनारसे थापून त्यावर खसखस लावा. आता मध्यम आचेवर अनारसे तळून घ्या.
बेक्ड अनारसे (Baked Anarsa Recipe In Marathi)
बेक्ड पद्धतीनेही तुम्हाला अनारसा करता येऊ शकतो. हा अनारसा नेमका कसा बनवायचा ते आता जाणून घेऊया.
साहित्य:
1 वाटी तांदूळाचे पीठ, 1 वाटी गूळ, 1 टेबलस्पून दूध, खसखस, तूप
कृती:
- तांदूळाचे पीठ घेऊन त्यामध्ये एक वाटी गूळ घाला. गूळ चांगले एकजीव करुन घ्या. त्यामध्ये दूध घालून पीठ एकजीव करुन घ्या.
- पिठाचा तयार गोळा करुन त्याचे अनारसे थापा. त्यावर खसखस लावून बेकिंग ट्रेमध्ये काढून घ्या. त्याला तुपाचा हात लावून साधारण 15 मिनिटांसाठी 180 डिग्रीवर बेक्ड करायला ठेऊन द्या.
आता यंदाच्या दिवाळीत तुम्ही न चुकता स्वादिष्ट अनारसे नक्की बनवा आणि ते कसे झाले आम्हालाही कळवा.